मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महाराष्ट्र दिन
Written By वेबदुनिया|

पुरोगामी महाराष्ट्रातून धर्मनिरपेक्ष पक्ष वजा

मनोज पोलादे

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून गेल्या ४७ वर्षातील राजकीय पटलावर दृष्टी टाकल्यास पुलोद व सेना-भाजप युती सरकारचा अपवाद वगळता कॉग्रेसने एकछत्री सत्ता गाजवली आहे. राज्यात १९६२ मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून १९७८ पर्यंत कॉग्रेसला शह देणारा प्रमुख विरोधी पक्षच नव्हता.

आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांची संपूर्ण क्रांती व राममनोहर लोहियांच्या कॉग्रेस हटाव मोहिमेने देशभरातील वातावरण घुसळून काढले. या काळात केंद्रात पहिल्यांदाच जनता दलाच्या रूपाने बिगरकॉंग्रेसी सरकार सत्तेवर येऊन आघाडी व युतीच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला.
  हे चित्र पाहिल्यास सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि मुख्यता वैचारिक अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष पक्षास जनाधार मिळू नये, हे आश्चर्यात टाकणारे आहे.      
कॉग्रेसमध्ये फूट पडल्याने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत जनता दल व रेड्डी कॉग्रेसमध्येच लढतीचे अंदाज वर्तवले जात होते. पण जनता दलासोबतच इंदिरा कॉग्रेसनेही चमत्कार घडवला. जनता दल केंद्राप्रमाणेच राज्यातही सत्ता काबीज करण्याच्या ईर्ष्येने निवडणूक आखाड्यात उतरले होते. त्यांनी यावेळी राज्यात सर्वाधिक म्हणजे 99 जागा पटकावल्या. उल्लेखनीय म्हणजे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेची धुरा वाहणाऱ्या शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, प्रजा समाजवादी पक्ष, समाजवादी पक्ष, व भारतीय व मार्क्सवादी डाव्यांनी या निवडणुकीत पूर्वीपेक्षाही सरस कामगिरी बजावून महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, हे प्रथमतः:च ठसवले. मात्र सर्वाधिक जागा मिळूनही नंतर त्यांची वाढ होण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून ते हळूहळू नाहीसे व्हायला सुरुवात झाली. ९० नंतर तर हिंदुत्वाच्या झंझावातासमोर धर्मनिरपेक्ष पक्ष संपुष्टातच आले.

शिवसेना, भारतीय जनता पक्यांचा पाया विशिष्ट धर्म, जात, समाजगट, प्रांतवाद यांवर आधारलेला आहे. त्याचवेळी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसलाही धर्मनिरपेक्ष म्हणणे हास्यास्पद ठरेल. कारण जातीपाती, धर्म यांचा विचार कॉग्रेसइतकाच कुणीच केलेला नाही. तिकीट वाटपावेळीही ते लक्षात येते. राष्ट्रवादी कॉग्रेसला मराठा समाजाचा भक्कम आधार आहे.

हे चित्र पाहिल्यास सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि मुख्यता वैचारिक अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष पक्षास जनाधार मिळू नये, हे आश्चर्यात टाकणारे आहे. एकेकाळी प्रभावी असलेल्या कामगार चळवळी, संघटनांना नव्वदच्या दशकात घसरण लागली. किंवा त्या धर्म, जातवादी राजकारण करणाऱ्या पक्षांच्या कच्छपी लागल्या. एकेकाळी समाजवादी चळवळ चांगलीच रुजली व रूळली होती. मात्र, जागतिकीकरणाच्या झपाट्यात ही चळवळही जवळपास लयाला गेली. धर्मनिरपेक्ष पक्षांचा जनाधारही उखळल्या गेला. शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढून नवीन सामाजिक व्यवस्था, वर्ग, गट व संरचना उदयास आल्याने त्यांच्या प्रश्नांचे संदर्भही बदलले.

नेमके याचवेळेस ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारणाची घोषणा देत मराठी अस्मितेस आवाहन करणाऱ्या शिवसेनेचा उदय व विस्तारही झपाट्याने झाला. जनसंघ, जनता पार्टी ते भारतीय जनता पक्ष असा प्रवास करत संघाच्या राजकीय शाखेनेही शहरी मध्यमवर्गीयांच्या धार्मिक अस्मितेस हात घालत भरारी घेतली. भाजपचे हिंदुत्वाचे धार्मिक राजकारण व सेनेच्या मराठी अस्मितेच्या राजकारणाच्या झपाट्यात धर्मनिरपेक्ष पक्ष केव्हा मैदानाबाहेर फेकले गेले हे कळलेही नाही.

  धर्मनिरपेक्ष पक्षांचा पाया सामाजिक व कामगार चळवळींवर आधारीत होता. ऐंशीपर्यंत भरात असलेल्या चळवळी नव्वदच्या दशकात मोडकळीस निघाल्या त्यामुळे मग धर्मनिरपेक्ष पक्षांचा पाया उखडण्यास सुरुवात झाली.      
नव्वदच्या दशकात देशात कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपचा पाया विस्तारण्यास सुरवात झाली. यामुळे धर्मनिरपेक्षता, विकास यासारखे प्राथमिक मुद्दे बाजूला पडून संपूर्ण देशभर धार्मिक स्तोम माजायला सुरुवात झाली. पण त्याही आधी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून समाजात जातीआधारीत विभागणीस सुरुवात झालीच होती. त्याचा फायदा राजकीय पक्षांनीही वेळीच उचलला होता. भाजपने ही वेळ हेरून हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केला. ९२ मध्ये बाबरी मशीदीचे पतन झाल्यानंतर धार्मिक मतांचे धृवीकरण झाले. धर्मनिरपेक्ष पक्षांना याचा फटका बसून त्यांची झपाट्याने पीछेहाट झाली. शंभर वर्षाचा वारसा असणाऱ्या कॉग्रेससमोरही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.

राज्याराज्यातून प्रादेशिक पक्षांनी यादरम्यानच डोके वर काढून प्रादेशिक अस्मितेच्या आधारावर सत्ता बळकावण्यास सुरुवात केली. दक्षिणेत तेलगू देसमसारख्या पक्षाचा उदय याचवेळी झाला. राज्यभर विस्तारायला ‘मराठी बाण’ फार उपयोगी ठरणार नाही, हे पाहताच शिवसेनेने मराठी बाणा गुंडाळून ठेवत हिंदुत्ववादी भाजपशी मोट बांधून ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली.

धर्मनिरपेक्ष पक्षांचा खात्मा झाल्याने कॉग्रेस व सेना-भाजपशिवाय पर्यायच राहिला नाही. कॉग्रेसमध्ये सरंजामशाही संस्कृतीमुळे सामान्यजनांशी त्यांची नाळ तुटली. यामुळे साहजिकच सेना-भाजपच्या पाठीशी जनाधाराचा रेटा उभा राहिला. ९९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जबरदस्त धडक मारताना ९४ जागा पटकवून भविष्याची चाहूल स्पष्ट केली. १९९४ मध्ये मध्ये जनप्रक्षोभाच्या रेट्यात व पवारांविरूद्धच्या आक्रमक प्रचार मोहिमेद्वारा कॉग्रेसची सत्ता उलथवून राज्यात प्रथमच बिगर कॉंग्रेसी सरकारची स्थापना करून इतिहास घडवला.
  हे पक्ष केवळ विचारधारेवर चालत राहिले, पण सामान्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न त्यांनी फार केला नाही, असे म्हणता येईल. त्याचवेळी पुढे प्रभावी ठरलेल्या पक्षांनी भावनेवर आधारीत राजकारण करून या लोकांना आपल्याकडे खेचून घेतले, हेही एक त्याचे कारण आहे.      
धर्मनिरपेक्ष पक्षांचा पाया सामाजिक व कामगार चळवळींवर आधारीत होता. ऐंशीपर्यंत भरात असलेल्या चळवळी नव्वदच्या दशकात मोडकळीस निघाल्या त्यामुळे मग धर्मनिरपेक्ष पक्षांचा पाया उखडण्यास सुरुवात झाली. पक्ष कार्यकर्तेही चळवळीतून येत असल्याने कार्यकर्त्याचाही ओघ आटला. राजकारणातून पुढे येऊन गब्बर झालेले लोकही त्यांनी पाहिले. मग त्याचे आकर्षण त्यांना पडले नसते तरच नवल. पण विकासाचे मुद्दे राजकारणातून हद्दपार झाल्याने धर्मनिरपेक्ष पक्षांची भूमिकाच उरली नाही आणि त्यांचा राजकीय क्षय झाला.

शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव कोकण व मुंबईचा पट्टा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात कधीच नव्हता. आता तर तो फक्त रायगड जिल्ह्यापुरता आणि स्पष्टच म्हणायचे तर जयतं पाटील यांच्या व्यक्तिगत प्रभावापुरता आहे. पण हा पक्षही मूळ विचारधारेपेक्षा बराच दूर गेला आहे, हे शिवसेनेशी वेळोवेळी केल्या पडद्याआडच्या युतीवरूनही सिद्ध झाले आहे. डाव्या पक्षांचा प्रभावही समुद्रातील बेटांप्रमाणेच राहिला. चळवळींची सक्रियता व रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज भक्कम असणाऱ्या भागातच त्यांचा प्रभाव राहिला. उद्योग, कारखाने, कामगार यासारख्या सामाजिक संरचनेवर त्यांचे राजकारण बेतलेले असल्याने ते सर्वव्यापी नेतृत्व प्रस्थापित करू शकले नाही. शिवाय त्यांच्या बालेकिल्ल्यात आपल्या कामगार आघाड्या उघडून भाजप, शिवसेना यांनी त्यांचा प्रभाव कमी केला. जनता दल अंतर्गत बजबजपुरीने संपुष्टात आला. एकेकाळी सर्वाधिक जागा घेऊन किंग मेकर ठरलेला हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरूनच नाहीसा व्हावा, हे धक्कादायकच आहे.

राज्यातील विभिन्न वर्ग, समाजघटकांमध्ये स्थान निर्माण करून जनाधार निर्माण करण्याची कसरत त्यांना करता आली नाही. याची कारणे शोधल्यास हे पक्ष केवळ विचारधारेवर चालत राहिले, पण सामान्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न त्यांनी फार केला नाही, असे म्हणता येईल. त्याचवेळी पुढे प्रभावी ठरलेल्या पक्षांनी भावनेवर आधारीत राजकारण करून या लोकांना आपल्याकडे खेचून घेतले, हेही एक त्याचे कारण आहे. डाव्यांच्या बाबतीत वेगळे घडले. साम्यवाद, भांडवलशाही, आंतरराष्ट्रीय राजकारण यातून बाहेर निघून वास्तवाचे भान त्यांना जोपासता आले नाही. कालबाह्य सिद्धांत, तत्त्वज्ञान, वैचारिकतेच्या फेऱ्यांत ते गुरफटून पडले. स्थानिक प्रश्वाच्या विश्लेषणातही त्यांना आंतरराष्ट्रीय संदर्भ शोधण्याचा मोह टाळता आला नाही. पक्षांचा पाया आधारीत असलेल्या समाजघटकांनाच त्यांनी सामावून घेऊन पक्ष संघटनेत निर्णय, धोरण ठरवण्याची संधी दिली नाही. थो़डक्यात डाव्यांची विचारसरणीही सरंजामशाही मानसिकतेत अडकून पडल्याने तमाम जनतेला हे पक्ष आपल्या प्रश्नासाठी संघर्ष करत असून त्यांना सत्ता बहाल केली पाहिजे, असे कधी वाटलेच नाही, या सगळ्यातच हे पक्ष निष्प्रभ होण्याची बीजे सापडतील.