महाराष्ट्रकर्ता राजा शिवाजी
|
शिवकालीन राजकीय व सामाजिक स्थित्यंतर
देशाभिमान किंवा देशप्रेम हा गुण आपल्या भारतात माहीत नव्हता. तो गुण महाराजांनी उत्पन्न केला व वाढीस लावला. त्यांनी थंडगोळ्याप्रमाणे अचेतन असलेल्या महाराष्ट्रात चैतन्य ओतले. महाराजांच्या वेळचा समाज जिवंत होता. त्याला स्वत:च्या कर्तव्याची जाणीव होती. म्हणून आलेल्या संकटांना धैर्याने तोंड देऊन त्यांनी महाराष्ट्राचे संरक्षण केले. एखादा गुण अंगी मुरण्यास कालावधी लागतो. सतराव्या आणि अठराव्या शतकात देशाभिमानाचा गुण महाराष्ट्राच्या अंगी मुरला.
महाराष्ट्रावर मोगलांशी युद्ध करण्याचा प्रसंग आल्यामुळे त्याच्या ठिकाणची राष्ट्रीय वृत्ती अतिशय बळकट व चिवट झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना बंधुभावाने एकत्र येऊन काम करण्याची सवय लागली. आणि सहकाराने कामे पार पाडण्याची व परस्परांना साहाय्य करण्याची त्यांची शक्ती आपोआप प्रकट झाली. यापुढे आपण जबाबदारीने महत्कार्ये पार पाडू शकू असा आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाला. त्याच्या भरवशावर त्यांनी पुढे एक शतक भारतावर प्रभुत्व गाजविले. तेव्हा ते जात्याच शूर, साहसी, काटक, धैर्यवान, राजकारणी, उत्साही, त्यागी, आणि निर्भय असल्याचे जगाच्या निदर्शनास आले. मुसलमानांनी सर्वांना जिंकले, परंतु महाराष्ट्रापुढे त्यांना हात टेकावे लागले. त्यांच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घालण्यात एकटे मराठे यशस्वी झाले.
|
महाराजांची लूट केली ती परमुलखात केली. नवीन राज्य स्थापन करताना असा प्रकार व्हावयाचाच. कारण फौजफाट्याचा खर्च भागविणे आवश्यक असते. मात्र या लुटीत महाराजांनी कुराण, मशीद, स्त्रिया, मुले इत्यादिकांना हात लावला नाही.
(महाराष्ट्राच्या जीवनातील स्थित्यंतरे पुस्तकातून साभार)

