शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

आघाडी सरकारच्या राजवटीत पोलीसही असुरक्षित - स्मृती इराणी

राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या राजवटीत जिथे पोलिसही भीतीच्या छायेखाली वावरत आहेत तिथे सर्वसामान्यांची काय कथा असा सवाल सुप्रसिद्ध कलावंत आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी येथील प्रचारसभेत उपस्थितांना केला.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार वसंत बरजुरकर यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. यावेळी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र त्यांनी सोडले.

पोलिसांना देण्यात येणार्‍या बुलेट फू्रफ जॅकीट खरेदीत झालेला गैरव्यवहार आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पोलिसांना उपलब्ध करून न देणारे आघाडी सरकार यांच्यावर जोरदार हल्ला चढवत इराणी म्हणाल्या की, पोलिसांना दहशतवाद्यांविरूद्ध दोन हात करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे उपलब्ध करून दिली नाहीत, परंतु मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांना किंमती नजराणे दिले.

विदर्भात होत असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यास आघाडी सरकारला आलेले अपयशही जनतेच्या समोर उघड झाले आहे. या सरकारच्या राजवटीत शेतकर्‍यांना पिण्याचे पाणीही उपलब्ध होऊ शकत नाही तर पिकांना लागणार्‍या पाण्याची समस्या विसरूनच जा अशी तिखट टीकाही स्मृती इराणी यांनी यावेळी केली. तथापि, राज्यात युतीचे सरकार आल्यास, 'लाडकी लेक' योजनेअंतर्गत मुलगी जन्मल्यानंतर तिच्या नावावर बँकेत ठराविक रक्कम जमा केली जाईल आणि त्यानंतर अठराव्या वर्षी मुलीला एक लाख रूपये देण्याची ही योजना आहे. तसेच वृद्ध शेतकरी आणि महिला बचत गटाशी संलग्न असलेल्या महिलांना दरमहा पाचशे रूपये पेन्शन देण्याची युतीची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, घरा-घरात 'तुलसी' नावाने परिचित असणार्‍या स्मृती इराणी यांनी गेल्या दहा वर्षात वाढलेल्या महागाईकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. आघाडी सरकारच्या राजवटीत तेल-साखर इतकी महाग झाली की सर्वसामान्य नागरिक सण-समारंभही साजरे करू शकत नाहीत. परंतु युतीचे सरकार सत्तेवर येताच जनतेच्या समोर आ वासून उभा ठाकलेला महागाईरूपी अंधार दूर होऊन येणारा प्रत्येक सण नवीन संदेश घेऊन येईल असा विश्वास इराणी यांनी यावेळी व्यक्त केला.