शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By भाषा|

नागपूरला आज सोनियांची सभा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावण्याच्या पूर्वसंध्येला नागपुरात काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेमुळे नागपूर व विदर्भात काँग्रेसमय वातावरण होईल असा विश्वास नेत्यांना आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सोनिया गांधी यांची रामटेक लोकसभा मतदारसंघातील कामठी येथे सभा झाली होती.

येत्या ११ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्‍या पार्श्‍वभूमीवर शनिवारी दुपारी २ वाजता कस्तुरचंद पार्क मैदानावर होणारी ही सभा ऐतिहासिक व्हावी यादृष्टीने काँग्रेस नेते, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसचे गतवैभव परत मिळेल अशी आशा असल्याने हायकमांडने विदर्भावर नजर रोखली आहे. नागपूर शहरातील ६ व जिल्ह्यातील सहा याप्रमाणे १२ उमेदवारांसह पूर्व विदर्भाचे उमेदवार सोनिया गांधी यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. युवानेता खासदार राहुल गांधी यांनी आज यवतमाळ,अमरावती,चंद्रपूर जिल्हयांचा दौरा केला. सोनिया गांधी या कोल्हापूरची सभा आटोपून थेट नागपूरला येतील. कस्तुरचंद पार्कची सभा होताच त्या मुंबईच्या जाहीर सभेसाठी प्रयाण करतील. पार्किंग व्यवस्था दरम्यान, उद्या होणार्‍या जाहीर सभेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस आयुक्तांनी पार्किंगसंबंधी काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार एमईसीबी- टी पॉइंट- लिबर्टी टॉकीज मार्गे, बिशॉप कॉटन शाळा ते बाटा चौक, आकाशवाणी चौक ते सायन्स कॉलेज, देशपांडे हॉल ते फॉरेस्ट ऑफीस चौक, पटवर्धन मैदान ते व्हेरायटी चौक आणि आरबीआय चौक ते आंबेडकर पुतळापर्यंत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.