बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

'ना'तु'ला ना मला, विजय राष्ट्रवादीला

सेना-भाजप युतीला एक-एक जागा महत्वपूर्ण असतानाच खुर्चीची आस आणि स्वार्थ साधण्याचे परिणाम शिवसेनेसह भाजपला भोगावे लागले. दोघांचे भांडणा अन्‌ तिसर्‍याचा लाभ अशी स्थिती येथे झाली असून रामदास कदम आणि डॉ. विनय नातू यांच्या वादात राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी बाजी मारली. कदम, नातूंपैकी कोणीही माघार घेतली असती तर जिल्ह्यातील युतीला एक हक्काची जागा गमवावी लागली नसती.

रत्नागिरी जिल्हा हा १९९० पासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे १९९५ ला मिळालेल्या सत्तेत कोकणचा सहभाग महत्वाचा होता. सातही जागांवर सेनेचेच वर्चस्व होता. पहिला सुरुंग राष्ट्रवादीने २००४ च्या निवडणुकीत चिपळूण आणि रत्नागिरीत लावला. त्यानंतर संगमेश्वर व राजापूरात काँग्रेसने जागा बळकावून दुसरा धक्का दिला. जिल्ह्यात खेड, गुहागर आणि दापोली या तीन जागांवरच वर्चस्व होते.

मतदारसंघ फेररचनेनंतर खेड, संगमेश्वर दोन मतदारसंघ रद्द झाले. त्यात विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्या गडांतर आले. त्यामुळे पाच जागांवर उमेदवार निवडताना सेना-भाजपमध्ये कलगी-तुरा रंगला होता. २००९ च्या निवडणुकीत सेनेचे वर्चस्व राहील असा अंदाज होता. मात्र गुहागरने सेना-भाजपला जबरदस्त हादरा दिला. भाजपचा परंपरागत मानला जाणारा गुहागर मतदारसंघ रामदास कदम यांच्यासाठी सेनेला सोडण्यात आला. हक्काची जागा सुटल्याने भाजपच्या डॉ. विनय नातूंनी बंडाचा झेंडा फडकविला. एकेकाळचे सहकारी कदम-नातू या निवडणुकीत आमने-सामने उतरले. राष्ट्रवादीचे भास्कर जाधव रिंगणात असल्याने या मतदारसंघातील चुरस वाढली. निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता होती.

सेना-भाजपचे हे दोन्ही खंदे समर्थक एकमेकाच्या निर्णयावर ठाम राहिले. दोघांनाही खुर्ची सोडवीत नसल्याने आणि भविष्यात आपली राजकीय कारकीर्द संपविण्याची भीती असल्याने ते निवडून येण्यासाठी धडपडत होते. रामदास कदम यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. तर डॉ. नातू यांनी परंपरागत मतांवर भर दिला होता. या चित्रात भास्कर जाधव लांबच होते. त्यामुळे विजयाचे दावेदार म्हणून नातू-कदम यांची नावे घेतली जात होती. पण निवडणूक निकाल अखेर धक्कादायक लागला. भास्कर जाधव यांनी बाजी मारत कदम-नातूंची राजकीय कारकीर्दच धोक्यात आणली आहे. तर दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ अशी स्थिती झाली येथे झाली आहे. ङङ्गखुर्ची'ने केला गुहागरात सेना-भाजपचा घात अशाच प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून उमटत आहेत.