भुजबळांना बनायचेय मुख्यमंत्री
विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीस अवघे 24 तास शिल्लक असतानाच आता मुख्यमंत्री कोण बनणार यावर मंथन सुरू झाले असून, उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आधी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पद देण्याची मागणी करत आपण या स्पर्धेत पुढे असल्याचे संकेत दिले आहेत. उद्या (ता. 22) सकाळी सात वाजल्यापासून राज्यात मतमोजणीस सुरुवात होत आहे. राज्यात पुन्हा एकदा आघाडीचेच सरकार येणार असल्याचा दावा अनेक संस्थांनी एक्झीट पोलच्या माध्यमातून केला आहे. या दाव्यानंतर कॉग्रेस राष्ट्रवादीत सरकार स्थापनेसाठी फिल्डिंग लावण्याची तयारी सुरू झाली असून, ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री या धोरणानुसारच मुख्यमंत्री ठरवण्यात येणार असून, आधी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी भुजबळ यांनी केली आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यांनंतर आबांना उप मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. आता पुन्हा एकदा त्यांना हे पद मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीतील एक गट सक्रिय झाला असून, त्यांना भुजबळ समर्थकांचे आव्हान पेलावे लागत आहे. राष्ट्रवादीत गृहमंत्रालयापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत अनेक नेते इच्छुक असून, कॉग्रेसमध्येही मुख्यमंत्री पदाविषयीची तयारी सुरू झाली आहे.