मनसे हा मनोरंजनासाठीचा पक्ष- नीलम गोर्हे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा केवळ मनोरंजनासाठी काढलेला पक्ष असून काही शहरे वगळली तर या पक्षाचा राज्यात कुठेही प्रभाव नसल्याची टीका शिवसेनेच्या आमदार डॉ. निलम गोर्हे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. या पत्रकार परिषदेला युतीचे उमेदवार पप्पू कुलकर्णी, पक्ष निरिक्षक दीपक कंटक, ऍड. प्रदीप मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.कोकणात अतिवृष्टी सुरू असताना तिकडे लक्ष देण्याऐवजी नारायण राणे राज्यात काँग्रेसचा प्रचार करीत फिरत आहेत. प्रचारादरम्यान ते भाजप-सेनेवर केवळ प्रसिध्दीसाठी आरोप करीत आहेत. प्रत्येक निवडणुकीत नारायण राणे नरबळी घेतात, असे सांगून, त्यांच्या धोरणांमुळेच रमेश गोवेकर, अंकुश राणे यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांची निष्काळजी व बेजबाबदार वागणुकीला जनता कंटाळली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात बेजार असून पद्मसिंह सारख्या नेत्यांमुळे राष्ट्रवादीची बदनामी झाली आहे. त्यामुळे राज्यात भाजप-सेना युतीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वासही शेवटी आमदार डॉ. निलम गोर्हे यांनी व्यक्त केला.यावेळी बोलताना गोर्हे म्हणाल्या की, युतीचा वचननामा सर्व घटकांचा विचार करून बनविण्यात आला आहे. युतीचे सरकार आल्यास महाराष्ट्र भारनियमन मुक्त करू, शेतकर्यांचा सात-बारा कोरा करू, लेक लाडकी योजना अशा महत्वांच्या बाबींवर आम्ही भर देणार आहोत.