शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

शिवशाही येणार, रिमोट माझ्या हातातच- बाळासाहेब

ऐन निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ज्वलंत मुलाखत पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनात छापून आली आहे. यात बाळासाहेबांनी राज ठाकरेंसह, महाराष्ट्रात येणाऱ्या अमराठी नेत्यांवरही तोफ डागली आहे. मराठी माणसाला फुटीचा शापच लागला असल्याचे सांगतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवशाही अवतरणार असून, रिमोट आपल्याच हातात असणार असल्याचे त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

शिवसेनेने मराठी माणसासाठी जीवाचे रान केले. आता मराठी माणसात फूट पाडून स्वार्थ साधला जात असून, 'मराठी' मतं फोडण्याची सुपारी घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी यात केला आहे.

केंद्रातील मंत्रिमंडळात अनेक महाराष्ट्रीयन मंत्र्यांचा समावेश असतानाही याचा काडीचाही फायदा मराठी माणसाला होत नसल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही बाळासाहेबांनी तोंडसुख घेतले असून, कॉग्रेसने लाथाडल्यावरही ते पुन्हा कॉग्रेसकडेच जात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना काहीही करण्यास तयार असून, गरज भासल्यास मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्यांचे हात छाटण्यात येतील असा इशारा या मुलाखतीत देण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे, मग मराठी जनता पुन्हा कॉग्रेसला कशी काय निवडून देणार असा प्रश्नही यात बाळासाहेबांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेचे तुफान आले असून, उद्धव ठाकरे स्वतः जिवाचे रान करत असल्याचे सांगत बाळासाहेबांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

मुंडे आणि गडकरी वादावर बोलण्यास मात्र बाळासाहेबांनी यात नकार दिला आहे. त्यांचं कसं चाललंय हे त्यांनाच विचारा असे त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा सरकारचा निर्णय मूर्खपणा असल्याचे सांगतानाच गेटवे ऑफ इंडियावर आधीच एक पुतळा असल्याने समुद्रात पुतळा उभा करण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे.

निवडणूक प्रचारात न उतरता आपण सेनेचा विजय झाल्यानंतर विजयाची सभा घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर मुख्यमंत्री कोण हे सांगण्यास मात्र बाळासाहेबांनी नकार दिला आहे.