बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (09:29 IST)

आचारसंहिता लागू झाली आता मोदींचे पोस्टर हटाव - काँग्रेस

विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता राज्यात लागू झाली आहे. त्यामुळे  राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढले जात आहेत. तर विरोधी पक्षांच्या फलका प्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपावर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलक लगेच काढावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून केलीय.
 
याबद्दल  सावंत म्हणाले की, निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आता जाहीर केलाय, तर निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने विविध राजकीय पक्षांचे परवानग्या घेऊन लावलेले फलक आता काढलेत, आचारसंहितेनुसार फलक काढण्यावर कुणाचाही आक्षेप नाहीये, मात्र नियमानुसार सर्वच राजकीय फलक निवडणूक आयोगाने काढणे अपेक्षित आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक आजही राज्यातील बहुतांश पेट्रोलपंपांवर दिसतात. सर्व राजकीय पक्षांसाठी एकच नियम असताना या फलकांबद्दल प्रशासन बोटचेपी भूमिका का घेत आहे? आचारसंहितेच्या नियमानुसार प्रशासनाने विरोधी पक्षांच्या नेत्यांचे सर्व फलक काढले आहेत. पण  सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिराती पेट्रोलपंपांवर लावलेल्या आहेत, त्या तात्काळ काढून टाकाव्यात, असे सावंत म्हणाले आहेत.