शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (10:10 IST)

मकर संक्रांती पूजा विधी

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला हे गोड शब्द कानात पडले की सुगड, हळद कुंकु, तिळाच्या पदार्थांचा खमंग सुवास, पतंग हे सर्व डोळ्यापुढे येऊ लागतं. या दिवशी दान देण्याचे देखील खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या दिवशी बायका काळ्या रंगाचे कपडे परिधान सुगडाची पूजा करुन सौख्य-समृद्धीची प्रार्थना करतात. 
 
पूजा विधी
संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते. सुगड हे काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीचे असतात. यात शेतात पिकलेलं नवं धान्य ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे. 
 
सुगडाला हळद-कुंकुवाच्या उभ्या रेषा लावल्या जातात. सुगडात खिचडी, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ हे साहित्य भरलं जातं. देवासमोर चौरंग मांडून छान रांगोळी काढली जाते. त्यावर रेशीम वस्त्र पसरवून तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर सुगड ठेवून त्यांची पूजा केली जाते आणि देवाला सुगडाचे वाण दिलं जातं. तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवला जातो.
 
अनेक ‍ठिकाणी सुवासिनी हळद कुंकु समारंभ करत सुगड दान करतात. दे वाण घे वाण करतात. तिळगूळ देतात आणि आवा लुटतात म्हणजे भेटवस्तू एकमेकांना देतात. नात्यात गोडवा निर्माण व्हावा म्हणून हा सण साजरा केला जातो.