शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2011
Written By वेबदुनिया|

सही आणि व्यक्तीचा स्वभाव!

ND
व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख विविध माध्यमांतून करता येऊ शकते. व्यक्तीचा स्वभाव, त्याच्यावरील झालेले संस्कार, परिस्थिती तसेच वातावरणानुसार ठरत असतो असे मानले जाते. व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेताना अनेक बाबींचे अध्ययन केले जाते. सही अर्थात सेलीब्रिटींचा ऑटोग्राफ यावरूनही त्यांच्या स्वभावाची ओळख करता येऊ शकते. व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या सहीवरून ओळखणे सहज शक्य आहे.

सही आणि स्वभाव
1. अनेकांना आपल्या सहीचे अप्रूप असते. काही जण तर सतत आपल्या सहीचा सराव करत असतात. अशा व्यक्ती आत्मकेंद्री मानल्या जातात. अशा व्यक्तींमध्ये अहंपणा अधिक असतो.आपल्या शिवाय इतर कोणीही ज्ञानी नाही अशी त्यांची धारणा असते.

2. ज्या व्यक्तींची सही छोटी असते, अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कमी असतो असे समजावे. अशा व्यक्तींना स्वतः:वर विश्वास नसल्याने या व्यक्ती हात आखडता घेत आपली सही करत असतात. काही प्रसंगी आळशीपणाही त्यांच्यात दिसून येतो.

3. आपल्या नावात झाड, फुले, हसरा चेहरा काढणार्‍या व्यक्ती या दुसर्‍यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा व्यक्तींचा स्वभाव भयंकर मुडी असतो.

4. अनेकांना आपल्यासहीमध्ये गोलाकार काढण्याची सवय असते. अशा व्यक्ती आपल्या निर्णयावर ठाम असतात. काही प्रसंगी त्यांच्यात अतिआत्मविश्‍वास दिसून येतो.

5. काही व्यक्ती आपल्या नावाऐवजी आडनाव अधिक गडद करण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तींना आपल्या कुटुंबाचा गर्व असतो. आपण कुठल्या कुटुंबात जन्माला आलो हे दाखवण्याचा त्यांचा अट्टहास असल्याचे दिसून येते.

6. काही व्यक्ती आपल्या सहीमध्ये मध्येच इंग्रजी किंवा मध्येच आपल्या मातृभाषेतील शब्दांचा वापर करतात. अशा व्यक्तींचे ध्येय अनिश्चित असते. त्यांना कोणतीही गोष्ट करताना प्लॅनिंग करायला आवडत नाही. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांच्या करियरवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.

7. काही व्यक्ती आपल्या सहीमध्ये देवाचे नाव घुसवण्याचा प्रयत्न करत असतात, किंवा त्यात गणपती किंवा इतर इष्ट देव काढण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तींचा देवावर तसेच दैवावर अधिक विश्वास असल्याचे दिसून येते. अशा व्यक्ती नशिबावर अधिक विश्वास ठेवणार्‍या असतात.

8. काही व्यक्तींना सही करताना तुटक-तुटक सही करण्याची सवय असते, अशा व्यक्ती प्रचंड एकलकोंड्या असतात. त्यांना जगाचे काही घेणेदेणे नसते. मी आणि माझे आयुष्य यावर त्यांचा विश्वास असतो.

9. काही व्यक्तींना सहीखाली रेषा काढण्याची सवय असते. अनेक जण सहीखाली दोन रेषा तर काही जण एक रेषा ओढतात. ज्या व्यक्तींच्या सहीखालील रेषा सरळ असते त्या व्यक्ती अत्यंत परखड मताच्या असतात. अशा व्यक्ती आपल्या मतावर ठाम असतात. ज्या व्यक्तींची रेषा तिरकस किंवा तुटक असते अशा व्यक्ती मुडी असतात.

10. काही व्यक्तींना आपल्या सहीला गोल करण्याची सवय असते, अशा व्यक्ती इतरांचा विचार न करता, केवळ स्वार्थी वृत्तीने जगत असतात.

अशा प्रकारे व्यक्तींची ओळख करून आयुष्यात आपण अनेक मित्र जमवू शकतो. व्यक्तींचा स्वभाव जरी त्यांच्या सहीवरून पूर्णपणे ठरवता येत नसला तरी त्यांचा स्वभाव ओळखण्यासाठी सहीचा आधार घेता येऊ शकतो.