महान व्यक्तिमत्वाला मुकलो
--अजित पवार
थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या निधनामुळे देश एका महान व्यक्तिमत्वाला मुकला आहे, असे जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. बाबा आमटे यांच्या निधनाचे वृत्त समजताच आपल्याला तीव्र दु:ख झाल्याचे श्री. पवार यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे. श्री. पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात,` बाबा आमटे यांनी आपल्या कृतीतून अवघ्या देशापुढे एक आदर्श घालून दिला. त्यांनी कुष्ठरुग्णांसाठी केलेले कार्य अतुलनीय असेच आहे. कुष्ठरुग्णांना समाजात मानाने जगता यावे, यासाठी त्यांनी केलेल्या विधायक कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. कुष्ठरुग्णांसाठी त्यांनी वसवलेले आनंदवन कुष्ठरुग्णांच्या जीवनात खराखुरा आनंद देणारे आणि जीवनाप्रती आशा पल्लवित करणारे आहे. बाबा आमटे यांनी सामाजिक सलोखा, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी काढलेली भारत जोडो यात्रा देशांतील प्रत्येक नागरिकांच्या स्मरणात कायम राहील. त्यांच्या निधनामुळे देशाच्या सामाजिक जीवनात भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे श्री. पवार यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.