मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (13:24 IST)

कॉफीने उजळवा सौंदर्य

Brighten
एक कप कॉफी प्यायली की कसं अगदी ताजंतवानं वाटतं. जगभरात कॉफीच्या चाहत्यांची कमी नाही. कॉफीचा तो सुगंध दरवळला की कॉफीवेड्याला राहावत नाही. कॉफीचे अनेक ब्रँड्‌स लोकप्रिय आहेत. तर अशी ही कॉफी फक्त पिण्यासाठीच योग्य आहे असं नाही तर त्या व्यतिरिक्तही कॉफीचे बरेच फायदे आहेत. कॉफी त्वचेसाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. कॉफीच्या सेवनाने लाभ होतातच पण कॉफीचा वापर सौंदर्यवर्धनासाठीही करता येतो.  
 
* फेशियल स्क्रब म्हणून कॉफीचा उपयोग केला जातो. कॉफीचे कण त्वचेतील मृत कोशिकांना हळुवारपणे दूर करतात. कॉफी स्क्रब बनवणं अगदी सोपं आहे. एक चमचा कॉफीमध्ये थोडं ऑलिव्ह ऑईल मिसळा की झालं स्क्रब तयार ! हे स्क्रब त्वचेवर हलक्या हाताने चोळा. सर्व मृत पेशी निघून जातील.
 
* केसांच्या मुळाशी असलेल्या मृत कोशिकांमुळेही त्रास होऊ शकतो. टाळूवरील त्वचेच्या स्वच्छतेविषयी खूप काही बोललं जात असलं तरी त्याकडे तितकं लक्ष दिलं जात नाही. याच कारणास्तव केस कोरडे होतात आणि कोंड्याच्या प्रमाणातही वाढ होते. टाळूवरील मृत कोशिकांचं प्रमाण कमी करण्यासाठी कॉफीचे कण या त्वचेवर घासावेत. त्याने डोक्याच्या त्वचेवरील मृत कोशिका निघून जातात. अर्थात टाळूवरील त्वचा खूप नाजूक असल्यामुळे ही कृती हलक्या हातांनी करायला हवी.
 
* अतिथकव्याने बरेचदा डोळे सुजतात. अशा वेळी आईस ट्रेमध्ये कॉफीमिश्रित पाणी घाला. ते फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्या. या बर्फाने सूज आलेल्या भागावर शेक द्या. यामुळे डोळ्यांची सूज उतरेल आणि डोळ्यांना थंडावा मिळेल.
 प्राजक्ता जोरी