बुधवार, 4 ऑक्टोबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 19 डिसेंबर 2020 (10:45 IST)

केसांसाठी लिंबाचा वापर...

केसांच्या समस्या सोडवायच्या तरी कशा, असा प्रश्न प्रत्येकीला पडलेला असतो. महिलांना केस पांढरे होणं, गळणं, कोंडा यापैकी एक तरी समस्या सतावत असते. यासाठी तुम्ही घरात नेहमी असणारं लिंबू वापरू शकता. लिंबू केसांसाठी खूपच गुणकारी आहे. यातल्या ब आणि क जीवनसत्त्वामुळे केसांना बळकटी मिळते. यात जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे टाळूवरील संसर्ग कमी व्हायला मदत होते. लिंबू आणि इतर घटकांचा वापर करून हेअर पॅक्स तयार करू शकता. केसांसाठी लिंबाचा वापर कसा करायचा? पाहू या.
 
लिंबाचा रस आणि कोरफडीचा गर यांचं मिश्रण केसांसाठी खूपच लाभदायी ठरू शकतं. केस वाढवण्यासाठी हा पॅक लावता येईल. लिंबाचा रस आणि कोरफडीचा गर केसांना लावा. अर्ध्या तासाने धुवून टाका. त्यानंतर शँपू आणि कंडिशनर लावा. आठवड्यातून एकदा हा उपाय करायला हरकत नाही.
 
कोंडा घालवण्यासाठी टाळूवरील त्वचेला आणि केसांच्या मुळांना लिंबाचा रस लावा. दहा मिनिटांनी धुवून टाका. नियमितपणे लिंबू लावल्यास कोंडा लवकर निघून जाईल.
 
केसांची मुळं बळकट करण्यासाठी लिंबू, मध आणि कोरफडीचा गर वापरून पॅक तयार करा. केस आणि टाळूला लावा. 20 मिनिटांनी धुवून टाका. या मास्कमुळे केसांना आवश्यक पोषण आणि जीवनसत्त्वं मिळतील. केसांमधली पोषक घटकांची कमतरता लिंबामुळे भरून निघू शकते.