शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019 (16:48 IST)

बँक कर्मचारी संघटनांकडून संपाचा इशारा, ४ दिवस बँका बंद

सप्टेंबर महिन्याच्या अखेरिस बँक कर्मचाऱ्यांच्या चार संघटनांनी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी संपाचा इशारा दिला आहे. चौथा शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांना जोडून हा संप पुकारण्यात आल्यानं बँकेचे कामकाज चार दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 10 सरकारी बँकांच्या विलिनिकरणाच्या निर्णयाविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. 
 
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही बँक कर्मचारी अनिश्चित कालावधीसाठी संपावर जाऊ शकतात, असं बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून सांगण्यात आलं आहे. कामाचा आठवडा सहा ऐवजी पाच दिवसांचा करण्याची मागणीही संघटनांकडून करण्यात आली आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक आफिसर्स असोसिएशन (AIBOA), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस (INBOC) आणि नॅशनल ऑर्गेनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स (NOBO) या संघटनांनी संपाची घोषणा केली आहे.
 
26 सप्टेंबर रोजी गुरूवार आणि 27 सप्टेंबर रोजी शुक्रवार आहे. या दिवशी संप पुकारल्यामुळे बँकांचं कामकाज ठप्प राहणार आहे. तर 28 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आणि 29 सप्टेंबर रोजी रविवार असल्यामुळे बँकांचं कामकाज बंद असेल. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरिस सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत.