…मार्च महिन्यात सलग सहा दिवस बँका बंद
सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात तीन दिवसीय संपाची हाक दिली आहे. त्यानुसार ११ ते १३ मार्च अशा तीन दिवस संपाची घोषणा बँक कर्मचारी संघटनेने केली आहे. हा संप झाल्यास मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सलग सहा दिवसांसाठी बँका बंद राहतील.
सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे कर्मचारी ११ ते १३ मार्च दरम्यान तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. त्यापूर्वी १० मार्च रोजी धुलिवंदनानिमित्त सुट्टी आहे. तर संपानंतर १४ मार्चला दुसरा शनिवार असून १५ मार्चला रविवार आहे. त्यामुळे बँका सलग सहा दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे ऐन होळीच्या सणासुदीत ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागेल.
दर पाच वर्षांनी वेतनाचा आढावा घेऊन त्यामध्ये वाढ करण्यात यावी, ही बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. २०१२मध्ये वेतनवाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुढील वेतनवाढ २०१७मध्ये होण्याची अपेक्षा होती. मात्र ती झाली नाही. या शिवाय आठवड्यात दोन दिवस सुट्टी देण्याचीही मागणी संघटनांनी केली आहे. तसेच विशेष भत्त्यांना मूळ वेतनाशी जोडले जाण्याचीही मागणी करण्यात आली आहे. नवीन पेन्शन योजना संपुष्टात आणून कौटुंबिक पेन्शनमध्ये सुधारणा घडवून आणण्याची सूचना करण्यात आली आहे.