देशात करदात्यांची संख्या वाढली
देशात १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असल्याचे जाहीर करणाऱ्या करदात्यांची संख्या गेल्या ४ वर्षात ६० टक्क्यांनी वाढून ती १.४० लाख इतकी झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) दिलेल्या माहितीनुसार या कालावधीमध्ये इनकम टॅक्स रिटर्न दाखल करणाऱ्यांची संख्या ८० टक्क्यांनी वाढली आहे.
सीबीडीटीचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात थेट कराचे जीडीपीमधील प्रमाण ५.९८ टक्के इतके आहे. हे प्रमाण गेल्या १० वर्षातील सर्वात चांगले आहे. गेल्या चार वर्षात जीएसटी रिटर्न फाईल करणाऱ्यांची संख्या ८० टक्क्यांनी वाढली आहे. ही संख्या २०१३-१४मध्ये ३.७९ कोटीवरून २०१७-१८मध्ये ६.८५ कोटी झाली आहे.
त्याच बरोबर एक कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या वैयक्तीक करदात्यांच्या संख्येत ६८ टक्के वाढ झाली आहे. या एक कोटीमध्ये कॉर्पोरेट, फर्म, हिंदू अविभाजित कुटुंब व अन्य लोकांचा समावेश आहे. गेल्या चार वर्षात कायद्यात झालेल्या सुधारणा, इनकम टॅक्स विभागाकडून करण्यात आलेले विविध प्रयत्न यामुळे कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चंद्रा यांनी सांगितले.