1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 17 डिसेंबर 2018 (09:30 IST)

नाफेडला कांदा साठवणूकीचे आदेश

केंद्र सरकारने नाफेडला कांदा साठवणूक क्षमतेत वाढ करण्याचे आदेश दिले आहे. पाच हजार ते २५ हजार मेट्रिक टन कांदा साठवणूक क्षमतेचे उद्दिष्टे केंद्राने नाफेड या एजन्सीला दिल्याचे समजते. दरवर्षी कांद्याच्या दरामध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे कांदा हा नेहमीच चर्चेत राहणारा विषय बनला आहे. सध्या मिळत असणाऱ्या कांदा दरात उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे.
 
गेल्यावर्षी देशातील अनेक राज्यासह महाराष्ट्र समाधानकारक पाऊस झाल्याने कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले. तर यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे नवीन लाल कांद्याचे उत्पादन कमी येणार असल्याचे गृहीत धरून शेतकऱ्यांनी मागील वर्षीचा उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत साठवून ठेवला. मात्र इतर राज्यातून लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाल्याने कांदा कवडीमोल भावात मिळाल्याने शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर ओतून देत तर पंतप्रधान मोदी यांना मनीऑर्डर पाठवून आपला रोष व्यक्त केला. यावर लासलगांव बाजार समितीच्या शिष्टमंडळाने खा. हरिश्चंद्र चव्हाण निफाडचे आमदार अनिल कदम, चांदवडचे आमदार राहुल आहेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाकडून नाफेडच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून कांदा साठवण क्षमतेत वाढ करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.