जगातील सर्वात श्रीमंत 10 लोकांच्या यादीत मुकेश अंबानी
गेल्या 8 वर्षांपासून देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आता जगातील सर्वात श्रीमंत 10 लोकांच्या यादीतही जागा मिळवली आहे. ब्लूमबर्ग बिलिअनेअर इंडेक्सनुसार, 64.5 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 5 हजार कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह मुकेश अंबानी या यादीत 9 व्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी हे एकमेव आशियायी उद्योगपती आहेत ज्यांनी या यादीत स्थान मिळवले .
रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये 42 % भागीदारी असलेल्या मुकेश अंबानींना सर्वाधिक फायदा हा कंपनीच्या डिजीटल युनिट जियो प्लॅटफॉर्म लिमिटेडमुळे झाला. कोरोनामुळे जगभरातील कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. मात्र, मार्च महिन्यानंतर रिलायन्सच्या शेअर्सचा बाजारभाव दुप्पट झाला.रिलायन्स कर्जमुक्त कंपनी झाली. रिलायन्स इंडस्ट्री पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे, अशी माहिती मुकेश अंबानींनी दिली.
गेल्या दोन महिन्यात राइट्स इश्यू आणि जागतिक गुंतवणूकदारांकडून 1.69 कोटी रुपये जमा केल्यावर कंपनीचे कर्ज शून्यावर आले आहे. रिलायन्सने निश्चित काळाच्या 9.5 महिन्यांपूर्वीच आपले कर्ज फेडले. फेसबुक, सिल्व्हर लेक पार्टनर, केकेआर यासारख्या 10 बड्या जागतिक कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. एका अभ्यासानुसार, 2025 पर्यंत भारतीय दूरसंचार बाजारातील 48 टक्के भाग जियोने व्यापलेला असेल.