लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद पाडले
नाशिक : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी लासलगाव बाजार समितीची ओळख आहे. यात बाजार समितीचे उपबजार विंचूर बाजार समितीमध्ये गुरुवारी सकाळी शेतकऱ्यांचा उद्रेक पहायला मिळाला. सकाळी कांद्याचे लिलाव सुरू झाला. मात्र, कांद्याला लिलावात अवघे ६०० ते ७०० रुपये इतका कमी भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी तत्काळ लिलाव बंद पाडले. त्यानंतर बाजार समिती कार्यालयाला घेराव घातला.
तेलंगणात महाराष्ट्रातील कांद्याला १९०० रुपये भाव मिळत असताना महाराष्ट्रात कमी भाव का असा प्रश्न उपस्थित करत लिलाव प्रक्रिया बंद पाडली. त्यानंतर एक तास लिलाव बंद राहिल्यानंतर अखेर पोलिसांच्या उपस्थिती लिलाव पुन्हा पूर्वत सुरू करण्यात आले. गेल्या काही दिवसापासून कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतक-यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दोन दिवसापूर्वीच एका तरुण शेतक-यांने मालेगावमध्ये रस्त्यावर कांदा फेकून आपला संताप व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे कांद्याच्या प्रश्नावर आंदोलनही होत आहे. पण, त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतक-यांमध्ये संताप आहे.