1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2023 (22:15 IST)

नाशिक : 75 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापकासह तीन जण ताब्यात

Bribe
बदली रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्याच्या मोबदल्यात तब्बल 75 हजार रुपयांची लाच घेताना जळगाव येथील श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या एरंडोल येथील महात्मा फुले हायस्कूलचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन यांच्यासह मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव आणि लिपिक नरेंद्र उत्तम वाघ हे तिघे जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
 
यातील तक्रारदार हे श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलित महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत आहेत. सदर संस्थेने तक्रारदार व सहकारी उपशिक्षक अशा दोघांची बदली दि.01/04/2023 रोजी एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कुल, धरणगाव येथे करण्यात आल्याबाबतचा मंजुरीसाठीचा प्रस्ताव दि. 02/05/2023 रोजी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांचे कडे पाठविलेला होता. नंतरच्या काळात दोघांच्याही बदलीस स्थगिती मिळाली.
 
यासाठी अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांचे नावे देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक विनोद जाधव, लिपिक नरेंद्र वाघ यांनी तक्रारदार यांच्याकडे व त्यांचे सहकारी उप शिक्षक यांचेकडे पंचासमक्ष अध्यक्षांसह दोघांसाठी दोन्ही शिक्षकांचा पूर्ण महिन्याचा एक पगार म्हणजेच तक्रारदार यांना 75 हजार रुपये चेक स्वरूपाने लाचेची मागणी करून ती चेक स्वरूपात घेणार असल्याचे सांगितले. संस्थेच्या अध्यक्षांनी लाच देण्यासाठी दोघा शिक्षकांना प्रोत्साहन दिले व मागणी केल्याप्रमाणे 75 हजार रुपयांचा मुख्याध्यापक यांचे नावे असलेला चेक मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव (वय 42) यांनी महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
 
या प्रकरणी कनिष्ठ लिपिक नरेंद्र उत्तम वाघ (वय 44) व संस्थेचे एरंडोलचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन (वय 56) यांना सहआरोपी त्यांच्याविरुद्धही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा नोंदविला आहे.
 
हा सापळा यशस्वी करण्यासाठी जळगावचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव आणि हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील, रवींद्र घुगे, पोलीस नाईक ईश्‍वर धनगर, कॉन्स्टेबल सचिन चाटे यांनी परिश्रम घेतले. या पथकास पोलीस निरीक्षक एस. के. बच्छाव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, महिला हेडकॉन्स्टेबल शैला धनगर, पोलीस नाईक किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. सापळा यशस्वी केल्याबद्दल नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षिका श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार आदींनी या पथकाचे अभिनंदन केले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor