शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (12:15 IST)

पेट्रोलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्यास सुरवात झाल्यानंतर इंधनाचे दर कमी होण्याऐवजी हळूहळू वाढतच असून आता तर ते चक्क प्रतिलिटर ऐंशी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे रोज दर बदलल्यामुळे ग्राहकांचा फायदा होईल हा सरकारचा दावा फोलच ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
इंधनाचे दर दररोज बदलण्यास 16 जुनपासून सुरुवात झाली आहे. त्यावेळी जर आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर उतरले तर आपल्याकडील इंधनाचे दर सुद्धा उतरतील असा प्रचार करण्यात आला होता. सुरवातीच्या काळात पन्नास पैसे किंवा एक रुपयाने इंधनाचे दर कमी देखील झाले होते. पण त्यानंतर इंधनाचे दर हळूहळू वाढतच आहेत. सुरुवातीच्या काळात 75.50 रुपये प्रतिलिटर असणारे पेट्रोलचे दर आता चक्क ऐंशीच्या घरात पोहोचले असून यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याशिवाय पेट्रोलपंपचालकांनीही या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
 
शहरांनुसार इंधनाचे हे दर एक ते दोन रुपयांनी कमी-जास्त होत असत. पण आता मात्र ही वाढ सगळीकडेच होताना दिसत आहे. हा रोजचा चढ-उतार ग्राहकांच्या सहसा अद्याप लक्षात आला नाही. गेले दोन महिन्यात पाच ते सहा रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहे. कंपन्यांनी ही रक्कम एकदम वाढविली असती तर त्यांना नागरिकांच्या रोषाला थेट बळी पडावे लागले असते. त्यापेक्षा दोन महिन्यात हळूहळू पद्धतीने दर वाढ केल्याने वाहन चालकांच्या लक्षात सुध्दा येणार नाहीत. पेट्रोल-डिझेलच्या दरांमधील चढ-उतार 2002 सालापासून प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला म्हणजेच दर 15 दिवसांनी जाहीर होत असे. मात्र, 16 जुनपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांची ही 15 वर्षे जुनी व्यवस्था बंद करुन दररोज दर ठरविण्यास सुरुवात झाली आहे.त्याचा फायदा हा ग्राहकांना होण्यापेक्षा पेट्रोलियम कंपन्यांनाच होत असल्याचे लक्षात येत आहे.