गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (16:49 IST)

रेल्वेने केल्या ४८ एक्स्प्रेस गाड्या सुपरफास्ट, भाडे वाढले

भारतीय रेल्वेने ४८ एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे या ट्रेनमधून प्रवास करताना आता ३० ते ७५ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. या ४८ गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केल्याने ७० कोटी रुपयांची कमाई होईल, अशी अपेक्षा रेल्वेला आहे. रेल्वेने ४८ गाड्यांचा समावेश सुपरफास्ट प्रकारात केल्याने आता सुपरफास्ट गाड्यांची एकूण संख्या १ हजार ७२ झाली आहे.

या गाड्यांमधील स्लिपर कोचचे तिकीट ३० रुपयांनी, सेकंड आणि थर्ड एसीचे तिकीट ४५ रुपयांनी आणि फर्स्ट एसीचे तिकीट ७५ रुपयांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे पुणे-अमरावती एक्स्प्रेस, पाटलीपुत्र-चंदिगढ एक्स्प्रेस, विशाखापट्टणम-नांदेड एक्स्प्रेस, दिल्ली-पठाणकोट एक्स्प्रेस, कानपूर-उधमपूर एक्स्प्रेस, छपरा-मथुरा एक्स्प्रेस, रॉक फोर्ट चेन्नई-तिरुचिलापल्ली एक्स्प्रेस, बंगळुरु-शिवमोगा एक्स्प्रेस, टाटा-विशाखापट्टणम एक्स्प्रेस, दरभंगा-जालंधर एक्स्प्रेस, मुंबई-मधुरा एक्स्प्रेस आणि मुंबई-पाटणा एक्स्प्रेसचा प्रवास महागणार आहे.