शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 2 जुलै 2020 (09:13 IST)

रेल्वे खासगीकरणाच्या तयारीत, 109 मार्गांवर धावणार खासगी ट्रेन

रेल्वेने बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. 109 मार्गांवर खासगी सेवा सुरू करण्याची तयारी रेल्वेने दाखवली असून यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. या ठराविक मार्गांवर दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या आधुनिक 151 रेल्वेगाड्या खासगी तत्त्वावर चालवण्यात याव्यात अशी योजना आहे. 
 
प्रत्येक रेल्वे कमीतकमी 16 डब्ब्यांची असेल. तर या ट्रेनचा सर्वाधिक वेग हा 160 किलोमीटर प्रति तास असेल. या ट्रेनचा रोलिंग स्टॉक खासगी कंपनी खरेदी करेल. तसंच देखरेखीचा खर्चही संबंधित कंपनी करेल. रेल्वे केवळ गार्ड आणि मोटरमन पुरवणार आहे.
 
रेल्वे मंत्रालयाने यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की यातून भारतीय रेल्वेला 30 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. भारतीय रेल्वे नेटवर्कवर प्रवासी गाड्या चालवण्याचा हा खासगी गुंतवणुकीचा पहिला उपक्रम आहे. 
 
यामुळे ट्रान्झिट टाईम कमी होणार आहे. तसंच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, सुरक्षेचीही योग्य ती काळजी घेतली जाईल आणि प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्या जातील, असं रेल्वेचं म्हणणं आहे.
 
रेल्वेत खरं तर गेल्या वर्षीच खासगीकरणाचा शिरकाव झाला आहे. गेल्या वर्षी भारतीय रेल्वेने RCTC च्या माध्यमातून लखनौ-दिल्ली तेजस एक्स्प्रेस ही आलिशान प्रवासी गाडी सुरू केली आहे.
 
या गाड्यांच्या निर्मितीपासून, देखभाल आदी सेवा पूर्णपणे Make in India अर्थात भारतीय बनावटीच्या असतील. या गाड्यांच्या निर्मितीचा खर्च, दररोजचा खर्च आणि इतर खर्च खासगी संस्था करेल आणि प्रवाशांसाठी अत्याधुनिक आणि वेगवान प्रवासाची सुविधा निर्माण करणं हा उद्देश यामागे आहे, असं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे. दरम्यान, सवलतीचा कालावधी 35 वर्षांपर्यंत असू शकतो.