शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 8 मार्च 2020 (15:37 IST)

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक

आर्थिक संकटात आलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना ईडीनं शनिवारी रात्री अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कपूर यांची तब्बल ३० तास चौकशी केली. त्यानंतर मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपात त्यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
 
शनिवारी दिवसभर यंत्रणांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीनंतर शनिवारी मध्यरात्री कपूर यांना अटक करण्यात आली. बँकेतील संशयित घोटाळ्याचा तपास ईडीने तातडीनं स्वत:कडे घेतला होता. कारवाईचे आदेश येताच शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महल या घरावर छापा टाकण्यात आला. कर्जे थकीत झाली व त्यामुळेच बँक संकटात आली, या संशयावरुन ईडीने छापा टाकला होता.
 
यावेळी 600 कोटी रूपयांच्या कर्जप्रकरणी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. डीएचएफएल संबधित असलेल्या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीकडून कपूर कुटुंबाशी सबंधित असलेल्या डूइट अर्बन व्हेंचर प्राईव्हेट लिमिटेड कर्ज देण्यात आलं होतं. त्याचवेळी डीएचएफएलकडे येस बँकेचे 3 हजार कोटींच कर्ज होतं. राणा कपूर येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असताना या आर्थिक घडामोडी घडल्या होत्या.