मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जोरदार चकमकीनंतर पाच नक्षलवादी जेरबंद

पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या जोरदार चकमकीनंतर पाच नक्षलवाद्यांना जेरबंद करण्यात गडचिरोली पोलीसांना यश मिळाले आहे. भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्यांतर्गत ही मोठी कारवाई यशस्वी करण्यात आली. 
 
पोलीस दलाच्या 'सी-६०' च्या जवानांना हे मोठे यश मिळाले आहे. चकमकीनंतर पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत काही शस्त्रदेखील जप्त करण्यात आली. अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोनजण कुटूल नक्षल दलम सदस्य आहेत. तर, तिघे जनमिलिशिया म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून ३ बंदुका आणि अन्य साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या पेरिमिलीभट्टी जंगल परिसरात सी-६० पथकातील जवानांची नक्षलवाद्यांविरोधातील शोध मोहीम सुरू होती.पेरमिलभट्टीचे जंगल हे छत्तीसगड राज्यातील घनदाट अबुजमाड जंगल परिसराला लागून आहे. या परिसरात बुधवारी सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देताच नक्षलवादी  जंगलातून पळून जात होते. मात्र, पोलिसांनी पाठलाग करुन ५ जहाल नक्षलवाद्यांना पकडण्यात यश  मिळविले. त्यांच्याकडून ३ शस्त्रे व अन्य साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे.