शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (15:25 IST)

ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या भावात झाली वाढ

गणरायाच्या आगमनाबरोबरच सणासुदीचे दिवस सुरू असताना साखरेतील दरवाढीने गोडवा कमी झाला आहे. गेल्या १५ दिवसात साखरेच्या दरात किलोमागे चार ते सहा रुपयांनी वाढ झाली. सध्या किरकोळ बाजारात साखरेचे भाव चाळिशीपार पाेहाेचले आहेत. श्रावण संपताच साखरेच्या भावात अधिक वाढ झाली.
 
गेल्या दीड वर्षांपासून सर्वांना कोरोना संकटाचा सामना करावा लागत आहे.  सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट असून नियमही शिथिल करण्यात आले असले, तरी करोनाचे संकट कायम आहे. एकीकडे या संकटाचा सामना, त्याचे परिणामाचा सामना करावा लागत असतानाच दुसरीकडे महागाईमुळे नागरिकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यात ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरचे भाव मात्र वाढत आहे. साखरेच्या भावातील वाढीने सामान्य ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिक, चहाटपरी चालक यांना फटका बसला आहे.
 
गेल्या चार-पाच वर्षांपासून साखरेचे चांगले उत्पादन झालेले आहे. त्यामुळे यापूर्वी ४२ रुपयांपर्यंत प्रतिकिलाेचे गेलेले दर ३४ रुपयांपर्यंत उतरले हाेते. पण आता सणोत्सवाला सुरुवात झाली अन‌् मागणी वाढली. त्यामुळे साखर व साखरेचे पदार्थ, प्रक्रिया वस्तूंचे भाव वाढले आहेत. आता साखरेचे दर ३४ रुपयांवरून प्रतिकिलाे ३८ ते ४१ रुपयांपर्यंत वाढलेले आहेत.
 
पॅकबंद ब्रँडेड साखरेचे दर ४५वरून ५० ते ५२ रुपयांवर गेले आहेत. गेल्या काही वर्षांत दुष्काळामुळे मराठवाड्यात ऊस लागवडीवर परिणाम झाला होता. यामुळे बाजारात मागणी व पुरवठ्याचे संतुलन बिघडून प्रथमच साखरेचे दर ४२ रुपये किलो उच्चांक पातळीवर जाऊन पोहोचले होते. शहरात दररोज १५० ते २०० क्विंटलपेक्षा अधिक साखर विक्री होत आहे. सणासुदीच्या दिवसांत मागणी वाढते. विक्रमी उत्पादन होऊनही मागणीचे रूपांतर नफ्यात करून घेण्यासाठी प्रतिकिलो सहा रुपयांपर्यंत साखर दरात वाढ झाल्याचे दिसून येते.