गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आशियातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत मिळाणार शेतकरी वर्गाला रोख रक्कम

देशातील आणि आशियातील सर्बावात  मोठी असलेली कांदा बा जार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर कांदा हा शेतीमाल विक्री करणा-या शेतक-यांना वजनमापानंतर व्यापारी वर्गाच्या अडत दुकानातच हिशोबपावती तयार करून रोख चुकवती करण्याचा निर्णय बाजार समिती पदाधिकारी व व्यापारी वर्गाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी दिली.
 
केंद्र शासनाने प्राप्तीकर कायदा, 1961 चे कलम 194 एन मध्ये केलेल्या बदलामुळे दि. 01 सप्टेंबर, 2019 पासुन रू. 01 कोटीपेक्षा अधिक रक्कम बँकेतुन रोख स्वरूपात काढल्यास 02 टक्के उद्दमकर (टीडीएस) लागणार असल्याने बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापारी वर्ग यांची दि. 02 सप्टेंबर, 2019 रोजी संयुक्त बैठक होऊन लासलगांव मुख्य बाजार आवारावर बाजार समितीमार्फत दि. 04 सप्टेंबर, 2019 पासुन संगणकीय हिशोबपावती तयार करून शेतक-यांना त्यांची शेतीमाल विक्रीची रक्कम NEFT / RTGS सेवेद्वारे त्यांच्या बँक खात्यात वर्ग करावी असा निर्णय घेतला होता.
 
परंतु केंद्र शासनाच्या सदर निर्णयामुळे शेतकरी बांधवांची होणारी आर्थिक निकड विचारात घेऊन लासलगांव बाजार समितीने यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर केंद्र शासनाने दि. 20 सप्टेंबर, 2019 पासुन व्यापारी वर्गास शेतकरी बांधवांची शेतीमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात देण्यासाठी बँकेतुन काढण्यात येणा-या रोख रकमेवर 02 टक्के उद्दमकर (टीडीएस) लागणार नाही अशी अधिसुचना प्रसिध्द केली आहे. त्यामुळे शुक्रवार, दि. 08 नोव्हेंबर, 2019 रोजी बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापारी वर्ग यांची संयुक्त बैठक होऊन लासलगांव मुख्य बाजार आवारावर कांदा हा शेतीमाल विक्री करणा-या शेतकरी बांधवांना त्यांची शेतीमाल विक्रीची रक्कम बुधवार, दि. 13 नोव्हेंबर, 2019 पासुन व्यापारी वर्गाच्या अडत दुकानातच हिशोबपावती तयार करून रोख स्वरूपात अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
तरी शेतकरी बांधवांनी आपला कांदा हा शेतीमाल लासलगांव मुख्य बाजार आवारावर विक्रीस आणावा तसेच विक्रीनंतर त्याची हिशोबपावती व रोख चुकवतीची रक्कम पुर्वीप्रमाणे संबंधित अडत्यांच्या अडत दुकानातुन घेऊन जावी असे आवाहन सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी केले.