शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By भाषा|

'रिलायन्स' आता मराठी चित्रपटनिर्मितीत

मराठी चित्रपटांचे क्षितिज आता बड्या कंपन्यांना खुणावू लागले आहे. म्हणूनच एकापाठोपाठ एक कंपन्या मराठीकडे वळत असून रिलायन्सनेही आता आपल्या बिग पिक्चर्स या कंपनीद्वारे मराठी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या कंपनीतर्फे 'समांतर' हा चित्रपट लवकरच पडद्यावर झळकत असून प्रख्यात दिग्दर्शक अमोल पालेकर हे तब्बल २२ वर्षांनी अभिनेता म्हणून पुनरागमन करीत आहेत. चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री शर्मिली टागोर याही प्रथमच मराठीत काम करत आहेत.

हा चित्रपट म्हणजे स्त्री-पुरूष संबंधांचे वेगवेगळे कंगोरे दाखविणारा आहे, असे श्री. पालेकर यांनी यासंदर्भातील पत्रकार परिषदेत सांगितले. स्त्री-पुरूष संबंध हे नेहमीच गूढ, आश्चर्यमुग्ध आणि आव्हानात्मक असे आहेत. त्याचीच वेगवेगळी रूपे यात टिपली आहेत, असे ते म्हणाले.

शर्मिला टागोर यांना या चित्रपटात घेण्याची कारणमीमांसा करताना ते म्हणाले, की मी स्वतः शर्मिला यांचा मोठा चाहता आहे. त्यांच्याबरोबर बंगाली चित्रपटात कामही केले आहे. याशिवाय त्या उत्तम अभिनेत्री आहेत. त्यामुळे चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला त्या आपल्या नैसर्गिक अभिनयाने वाव देतील अशी मला आशा वाटते.

मराठी सिनेमाने गेल्या काही वर्षात कात टाकली आहे, याकडे लक्ष वेधले असता पालेकरांनी त्याच्याशी सहमती दर्शवली. ते म्हणाले, की बॉलीवूडच्या अतिप्रभावामुळे भाषक चित्रपटसृष्टी झाकोळली गेली होती. इतर कोणत्याही चित्रसृष्टीवर असा विपरीत परिणाम झाला नाही. त्याचबरोबर चांगले मार्केटिंग व वितरणाचाही अभावही होता. पण आता सुभाष घईंची मुक्ता आर्टस, झी ग्रुप आणि आता रिलायन्सची बिग पिक्चर्स या कंपन्या उतरल्याने मराठी सिनेमा केवळ महाराष्ट्रापुरताच नव्हे तर इतरही राज्यात जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मराठी नाटकांना चांगला प्रेक्षकवर्ग आहे. आता पिढीही बदलली आहे. त्यामुळे त्यांना चांगला मराठी चित्रपट हवा आहे, असेही ते म्हणाले.