1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 मे 2022 (08:38 IST)

धर्मवीर ट्रेलर : प्रसाद ओक सांगतो, आनंद दिघे लोकांना हंटरने का मारायचे ते सिनेमातून कळेल...

prasad oak
-प्राजक्ता पोळ
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमाचा ट्रेलर सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा सिनेमा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आणण्यात आला आहे का? आनंद दिघे यांच्या कामाबरोबरच वादग्रस्त घटनांचाही या सिनेमात समावेश करण्यात आला आहे का? अशा अनेक प्रश्नांवर धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका करणारा अभिनेता प्रसाद ओकने बीबीसी मराठीशी संवाद साधला.
 
प्रश्न- सध्या राज्याच्या राजकारणात ध्रुवीकरण झालेलं बघायला मिळतंय. अशावेळी शिवसेनेकडे झुकणारा हा सिनेमा तुझ्याकडे आला. त्यातल्या प्रमुख भूमिकेबद्दल तुला विचारण्यात आलं. तेव्हा तुझ्या मनात काय विचार आले?
प्रसाद ओक - या सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी मला लूक टेस्टसाठी बोलवलं. तेव्हापर्यंत मला माहिती नव्हतं की हा सिनेमा हा कोणता सिनेमा आहे? कशाबद्दल आहे? लूक टेस्ट देताना मी म्हटलं अरे मला सांग तरी की कशाबद्दल हा सिनेमा आहे? मी कशी ऑडिशन द्यायची आहे. तेव्हा त्याने मला सांगितलं की आनंद दिघेंवर 'धर्मवीर' नावाचा सिनेमा करतोय. आनंद दिघेंची भूमिका तुला साकारायची आहे. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
 
मंगेश म्हणाला तुला टेन्शन येईल म्हणून मी सांगितलं नव्हतं. पण इतक्या मोठ्या माणसाची भूमिका करायची तेव्हा मला जबरदस्त टेन्शन आलं होतं. पण पक्षाचा विचार ती भूमिका करताना माझ्या मनात एक अभिनेता म्हणून कधीही आला नाही. दिघे साहेब हे शिवसेनेचे नेते होते हे उघड आहे. पण आताच जे राजकारण सुरू आहे त्यानुसार काही वादविवाद होणार नाहीत ,याची काळजी दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांनी घेतली आहे. त्यामुळे याची झळ माझ्यापर्यंत आली नाही.
 
प्रश्न -या सिनेमामधला 'लूक' खूप हुबेहुब झाला आहे. ही भूमिका साकारताना काय आव्हानं होती?
प्रसाद ओक- आम्हीच शेकडो माणसांशी बोललो जे साहेबांबरोबर राहत होते. कितीतरी तासांचे ऑडिओ रेकॉर्डिंग प्रवीण तरडेकडे आहे. ते मी ऐकत होतो. ते कसे चालायचे, कसे बोलायचे, कसे वागायचे या सगळ्याचा एक अभ्यास केला. गेला दुर्दैवाने त्यांचे व्हिडीओज खूप कमी आहेत. कारण ते कधी भाषण करायचे नाहीत. त्यामुळे फोटोवरून अनेक गोष्टी त्यांच्या माझ्या भूमिकेत आणण्याचा प्रयत्न केला. लूक तर विद्याधर भट्टेंनी अप्रतिम केला आहे. पण सर्वात महत्त्वाचे त्यांचे डोळे होते. अनेकदा ते काहीच बोलायचे नाहीत. ते फक्त बघायचे त्यावरून त्यांना काय हवं हे कळायचं असं कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे डोळ्यांवर खूप अभ्यास केला. ही भूमिका करणं कठीण होतच पण मी खूप एन्जॉय केलं.
 
प्रश्न - हा सिनेमा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर येतो आहे. दक्षिण भारतात विशेषतः निवडणुकीच्या आधी असे सिनेमे येतात. त्याचा लोकांवर सकारात्मक परिणाम होतो. या सिनेमाचा निवडणुकीत काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का?
प्रसाद ओक- निवडणुकीत फायदा होईल की नाही याचा विचार आमच्या दिग्दर्शक किंवा लेखक यांनी केला आहे असं मला वाटत नाही. हा सिनेमा अत्यंत शुद्ध हेतूने प्रेक्षकांच्या समोर येतोय. मंगेश देसाईचं असं म्हणणं होत की, इंटरनेटवर आनंद दिघे सर्च केलं की, सिंघानिया हॉस्पिटलची दुर्दैवी घटना येते. ती घटना खरंच दुर्दैवी होती. परंतु आनंद दिघे यांचं काम हे अत्यंत मोठं आहे आणि ते लोकांसमोर आलं पाहिजे या शुद्ध हेतूने हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणतोय. जर यातून निवडणुकीला फायदा होत असेल तर तो तर ते या सिनेमाचं 'बाय-प्रॉडक्ट' आहे असं मला वाटतं.
 
प्रश्न- या सिनेमाच्या ट्रेलरवरून दिघेंच्या व्यक्तिमत्वाचं एक उदात्तीकरण केल्याचं दिसतय. प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या दोन बाजू असतात. आनंद दिघेंचंही तसंच होतं. ते हंटरने लोकांना मारायचे, त्यांच्यावर टाडासारखा गुन्हा दाखल होता. त्यांच्या निधनानंतर सिंघानिया हॉस्पिटल जाळलं गेलं. या घटना सिनेमात दाखवल्या गेल्या आहेत की नाही?
प्रसाद ओक- आनंद दिघेंबाबत काय वादविवाद झाले होते याकडे लक्ष न देता त्यांच्या चांगल्या बाजू यामध्ये दाखवण्यात आले आहेत. जसं आता तू म्हणालीस, की ते हंटर ने लोकांना मारायचे. पण का मारायचे? त्याच्यामागे काय हेतू होता? किंवा त्यांच्यावर टाडा लागला. तो का लागला? टाळी एका हाताने वाजत नसते. त्याला काहीतरी दुसरी बाजूही असते. दिघेंची आतापर्यंत काळी बाजूच समोर आली आहे. त्यामुळे आता चांगली बाजू दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. ती प्रचंड काम करत असत अनेक कार्यकर्ते सांगतात की, ते एका दिवसात दोन दिवस जगायचे. इतकं काम ते करायचे. त्यामुळे त्यांची चांगली बाजू आहे ही लोकांच्या समोर आली पाहिजे.
 
प्रश्न- आनंद दिघेंचं काम हे निश्चित मोठं असेल. पण इंग्रजी सिनेमांमध्ये जर एखादा 'बायोपिक' येत असेल तर ते पात्र त्यांच्याकडून दाखवलं जातं. उदाहरणार्थ विस्टन चर्चीलवर सिनेमा काढला तर त्यांच्या दोन्ही बाजू दाखवल्या जातात. त्याचं उदात्तीकरण केलं जात नाही. तू सुद्धा एक दिग्दर्शक आहेस. तुला याबाबत काय वाटतं?
प्रसाद ओक- या सिनेमामध्ये आनंद दिघे यांची काय तत्व होती आणि त्यांची लोकप्रियताही कशी वाढत गेली हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. जसे तू म्हणतेस की ते हंटरने मारायचे तर ते कोणाला मारायचे? ते कशासाठी मारायचे? त्यामागे काय हेतू होता? हे सगळं सिनेमामध्ये बघायला मिळेल आणि मला असं वाटतं की हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.
 
प्रश्न- तू अभिनेता म्हणून ही भूमिका जरी करत असलास तरी तुझ्या मनात शिवसेना आहे का?
प्रसाद ओक- माननीय हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शतश: वंदन करणारा मी माणूस आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी किंवा आनंद दिघेंसारख्या नेत्यांनी अनेक मराठी माणसांचे संसार उभे केले आहेत. घरं सावरली आहेत. या कामाला मी वंदन करतो.