रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

पाचशे वर्षे येथे होतात कॅशलेस व्यवहार

भारतात कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक मार्ग चोखाळत असतानाच देशातील मागास मानल्या जाणार्‍या आसाम राज्यातील एका छोट्या गावात गेली पाचशे वर्षे कॅशलेस व्यवहार केले जात आहेत हे ऐकून नवल वाटेल. पण हे सत्य असून गोवाहाटीपासून ३२ किमीवर असलेल्या एका छोट्या गावात दरवर्षी लागणार्‍या मेळ्यात तिवा जमातीचे लोक सर्व व्यवहार कॅशलेस पद्धतीने करतात व ही परंपरा १५ व्या शतकापासून सुरू असल्याचे समजते.
 
मध्य आसाम व मेघालय मधील तिवा समाज मोरी गावांत दरवर्षी जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून सुरू होणार्‍या तीन दिवसांच्या मेळ्यासाठी किंवा जत्रेसाठी उपस्थित असतो. हा मेळा नुकताच पार पडला व यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल हेही या मेळ्यात आले होते. या मेळ्याला जुनबील मेळा असे नांव आहे. मेळ्याच्या समितीचे सचिव जरसिंह बोरदोलाई म्हणाले येथे येणारे व्यापारी व ग्राहक खरेदीविक्रीसाठी पैसा वापरत नाहीत तर वस्तू देवाणघेवाणीतून हे व्यवहार केले जातात. म्हणजे एखादी वस्तू खरेदी करताना दुकानदाराला आपल्याजवळची त्या किमतीची दुसरी वस्तू द्यायची.
 
मुख्यमंत्री सोनोवाल यांनी या मेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भविष्यात हा मेळा कायम सुरू राहू शकेल व पर्यटनाला चालना मिळेल अशी अ्रपेक्षा आहे. या समाजाच्या लोकांकडून भारतवासियांनी शिकावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.