PLANET MARATHI प्लॅनेट मराठी, एनसीपीएसोबत 'प्रतिबिंब - मराठी नाट्य उत्सव २०२३’ संपन्न
प्लॅनेट मराठीने नेहमीच सर्वोत्कृष्ट कलाकृती देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दरवेळी एक नवीन उपक्रम घेऊन प्लॅनेट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येते. नुकताच प्लॅनेट मराठीने दि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए)सोबत असोसिएट होऊन 'प्रतिबिंब - मराठी नाट्य उत्सव २०२३' हा उत्सव राबवला. तीन दिवसांच्या या उत्सवात नाटकं, वाचन, कॅम्पस टूर, नाट्य तज्ज्ञांसोबत बातचीत, कार्यशाळा यांचा समावेश होता. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या उत्सवात लेखक, दिग्दर्शक, अभिनेता मकरंद देशपांडे यांच्या 'सैनिक' या एकांकिकेचा प्रिमिअरही आयोजित करण्यात आला होता. सचिन शिंदे दिग्दर्शित कलगीतुरा, आलोक राजवाडे दिग्दर्शित प्रस्थान उर्फ एक्झिट, अनुपम बर्वे दिग्दर्शित उच्छाद, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित चारचौघी या नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले. तर अमित वझे दिग्दर्शित प्रिय भाई... एक कविता हवी आहे, हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी रोहिणी हट्टंगडी, मकरंद देशपांडे, अमृता सुभाष, प्रतिमा कुलकर्णी, अनिता दाते, मुग्धा गोडबोले, सायली पाठक, आलोक राजवाडे, पर्ण पेठे, कादंबरी कदम यांच्यासह अनेकांच्या या उत्सवात मुलाखती घेण्यात आल्या ज्या लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत.
या उत्सवाबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' नाट्यसृष्टीतील लोकप्रिय तसेच प्रायोगिक नाटकांचा या उत्सवात सहभाग होता. महाराष्ट्रातील रंगभूमीच्या जिवंत परंपरेचे प्रतिबिंब या 'प्रतिबिंब - मराठी नाट्य उत्सव २०२३'मधून दिसले. या उत्सवात अनेक दिग्गजांचा सहभाग होता. या उत्सवाला मोठ्या संख्येने रसिकांचा प्रतिसाद लाभला. आम्हाला आनंद आहे की, एनसीपीएसह आम्ही अशा उत्सवासोबत जोडले गेलो.''