कुमार महाजन नियतीचा फेरा चुकणार?
तुमचे भविष्य तुमच्या हाती आले तर? भविष्यात घडणाऱ्या घटना तुम्हाला आधीच कळल्या तर? किंवा मग अगोदरच जगलेल्या व्यक्तीचे कर्म तुमचे भविष्य आहे तर तुम्ही काय कराल? असेच काहीसे झालेय एमएक्स प्लेअरच्या समांतर-२ मधील कुमार महाजन (स्वप्नील जोशी) आणि सुदर्शन चक्रपाणी (नितीश भारद्वाज) यांच्यासोबत. त्यांच्या भविष्यरेखा एकमेकांना अगदी समांतर आहेत.
एखाद्याला त्याचे सगळे भविष्य अगोदरच कळले तर कदाचित स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो त्याला थोडाफार बदलण्याचा प्रयत्न करेल पण ते पूर्णपणे बदलणे शक्य आहे? सिझन २ च्या सुरुवातीला कुमार चक्रपाणीने दिलेल्या डायरीतील रोज एक पान वाचत असतो जे त्याचे भविष्य असते. कुमार त्याचे भविष्य नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. काही प्रमाणात तो यशस्वी होतोही परंतु डायरीतील एका भविष्यानुसार एक स्त्री (सई ताम्हणकर) त्याच्या आयुष्यात येते आणि कुमार हळूहळू नियतीच्या फेऱ्यांमध्ये गुंतला जाऊ लागतो. सर्व गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात.
भविष्य किंवा आपण ज्याला नियती म्हणतो त्याबद्दल स्वप्नील सांगतो 'मेहनत आणि चिकाटीने तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता, असे मी मानतो पण कधी कधी काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरील असतात त्याला आपण काहीच करू शकत नाही. चक्रपाणी यांचे कर्म जे आता कुमारचे भविष्य आहे. कुमार त्याला आव्हान देतो मात्र त्यात तो यशस्वी होईल का? हे प्रेक्षकांना १ जुलैलाच पाहायला मिळेल.''
ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज याविषयी म्हणतात,'' नियती ही आपल्या कृती आणि निर्णयाचे गणित आहे; म्हणूनच आपल्या कर्मावर निर्विकारपणे लक्ष केंद्रित करा आणि नियतीला तिचे काम करू द्या.''
ती स्त्री नक्की कोण? कुमार नियतीचा फेरा मोडणार की त्यात गुंतत जाणार? चक्रपाणीच्या डायरीतील भाकीत कुमारच्या बाबतीत खरे ठरणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं समांतर-२ च्या १० भागांमध्ये दडली आहेत.
'समांतर-२' मराठी सोबतच हिंदी, तमिळ, तेलगू या भाषांमधून एमएक्स प्लेअर एक्सक्लुझिव्हवर १जुलैपासून प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहे.