शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By वेबदुनिया|

एक डाव धोबीपछाड २ जूनला प्रदर्शित

PRPR
मराठीतील अष्टपैलू कलावंत म्हणून ओळखला जाणारा अशोक सराफ आता नव्या भूमिकेत त्याच्या चाहत्यांसमोर येत आहे. ही भूमिका आहे, निर्मात्याची. त्याच्या श्री मंगेश फिल्म्स या बॅनरचा पहिला मराठी चित्रपट 'एक डाव धोबीपछाड' येत्या दोन जूनला झी टॉकीजच्या सहकार्याने अवघ्या महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

'झी टॉकीज'चा पहिला चित्रपट असलेल्या 'साडे माडे तीन'मध्येही अशोक सराफ यांची मध्यवर्ती भूमिका होती. त्यानंतर आता त्यांच्याच सहकार्याने त्याचा नवीन चित्रपटही येतो आहे. हा चित्रपट विनोदी असून त्यात अशोकचीच मध्यवर्ती भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचे असून गिरीश जोशी यांनी त्याची पटकथा लिहिली आहे. संवाद किरण यज्ञोपवित यांचे आहेत. अशोक सराफ यांच्याव्यतिरिक्त प्रसाद ओक, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, मधुरा वेलणकर, मुक्ता बर्वे, संजय मोने, विनय येडेकर हे कलावंतही यात आहेत.

मराठी चित्रपटांचा एका काळ गाजविणारे अशोक सराफ गेल्या काही दिवसांपासून मोजकेच काम करीत आहेत. त्यातही चित्रपटांपेक्षा ते मालिकांमध्ये गेल्या काही काळात रमले होते. पण साडेमाडेतीनच्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या नव्या लाटेत तेही सहभागी झाले. आता त्यांनीच निर्मिती केलेला नवा चित्रपट येतो आहे. त्यामुळे त्याच्याविषयी रसिकांमध्येही मोठी उत्सुकता आहे.