बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (14:02 IST)

पॅट कमिन्स : मुस्लीम सहकाऱ्यासाठी सेलिब्रेशन टाळणारा, भारताला 50 हजार डॉलर्सची देणगी देणारा वादग्रस्त कर्णधार

Pat Cummins
"अहमदाबादच्या स्टेडियममध्ये आलेल्या लाखो चाहत्यांना शांत करून मला समाधान मिळेल."
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं भारताच्या विरोधातील वर्ल्ड कप फायनलच्या काही दिवसांपूर्वी हे वक्तव्य केलं होतं.
 
कमिन्सच्या या शब्दांची तुलना एखाद्यावर दबाव टाकण्याच्या मानसिकतेशी करता येणार नाही. कमिन्स हा काही सर्वसामान्य कर्णधार नाही.
 
त्याचं कारण या रिपोर्टमधून स्पष्ट होईल.
प्रतिस्पर्ध्यांच्या मानसिकतेशी खेळणारे कर्णधार
1990 ते 2000 च्या दशकापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संघात आलेले मार्क टेलर, अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग आणि मायकल क्लार्क हे कर्णधार केवळ प्रतिस्पर्धी खेळाडूंबरोबरच नव्हे तर त्यांच्या मानसिकतेबरोबरही खेळण्यात सक्षम होते.
 
तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्णधारांमध्ये यांचा समावेश होता.
 
सामन्यात एखाद्या ठरावीक खेळाडूवर किंवा चांगली फलंदाजी करणाऱ्या फलंदाजावर ओरडणे किंवा तसं काही तरी ते करायचेच.
 
कमिन्स वेगळा कसा?
पण पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी दुर्मिळ कर्णधार ठरला.
 
"मला विरोधकांवर विनाकारण टोमणे मारण्यावर वेळ वाया घालवायचा नसून, जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. मला घाणेरडी कृत्य करायची नाही," असं म्हणत, पॅट कमिन्सनं मुलाखतीत पत्रकारांना आश्चर्यचकित करून सोडलं होतं.
 
क्रिकेटच्या वर्तुळातून पॅट कमिन्सबाबत आतापर्यंत कधीही तक्रार आली नाही, यावरूनच हा मुद्दा स्पष्टपणे लक्षात येतो.
 
अगदी अखेरच्या सामन्यातही सुरुवातीच्या 15 ओव्हरमध्ये पॅट कमिन्स नेहमीप्रमाणे नेतृत्व करत होता.
 
पण जेव्हा विराट कोहली इनसाइज एजनं आऊट झाला आणि राहुल बरोबरची पार्टनरशिप तुटली तेव्हा त्याचा आनंद सर्वोच्च पातळीवर पोहोचला आणि त्यानं तो जाहीर केला. तोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर अनेक विचारांचं जाळंच दिसत होतं.
 
पाँटिंग-कमिंस
2007 मध्ये वर्ल्ड कप सेमिफायनलदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेल्या रिकी पाँटिंगनं एका मुलाखतीत म्हटलं होतं की,
 
"दक्षिण आफ्रिका आमच्या विरोधात खेळणार आहे. जॅक कॅलिस एक महान खेळाडू आहे, त्याचा रेकॉर्ड चांगला आहे आणि तो चांगला ऑलराऊंडरही आहे. पण तो आमच्या विरोधात काहीही करू शकणार नाही. आमचं नियोजन पक्कं असेल तर आम्ही कॅलिसला पराभूत करू."
 
पाँटिंगचं हे भाषण विरोधी खेळाडूंना हीनपणा दाखवणारं वाटलं.
 
पण, सध्याचा कर्णधार कमिन्सनं भारतीय संघाच्या सदस्यांविरोधात एकही अपमानास्पद शब्द वापरला नाही. भारतीय फलंदाज बाद होतानाही, कमिन्स काहीही न बोलता फक्त आनंदानं हसत त्यांच्याजवळून निघून गेला.
 
योगा-योगाचं कर्णधारपद
कमिन्सला ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद मिळणं हा एक अपघात होता.
 
कमिन्स कर्णधार बनला त्यावेळी टीम पेन वादात अडकला होता. कमिन्सच्या नेतृत्वात अॅशेस सिरीजमध्ये मोठा विजय मिळवून परतल्यानंतर त्यानं ऑस्ट्रेलियाला टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही पोहोचवलं.
 
रे लिंडवालनंतर 65 वर्षांनंतर एखाद्या वेगवान गोलंदाजानं ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व केलं.
 
टीका आणि टोमणे
कमिन्सला वर्ल्ड कपसाठी कर्णधार बनवण्यात आलं त्यापूर्वी त्यानं फक्त 4 वन डे सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलं होतं.
 
त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थापनानं वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अनुभव नसलेल्या खेळाडूला कर्णधार बनवल्याची टीका झाली होती.
 
त्यात साखळी फेरीतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पराभवानं कमिन्सच्या नेतृत्वावर आणखी दबाव निर्माण झाला.
 
पण त्यानंतर प्रत्येक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या योग्य नियोजन आणि मैदानावरील कामगिरीचं श्रेय कमिन्सला देण्यात आलं.
 
या स्पर्धेच्या 11 सामन्यांमध्ये फायनल वगळता कमिन्सनं फार चांगली गोलंदाजी केली नाही. पण फायनलमध्ये त्यानं जी गोलंदाजी केली त्यात लाईन आणि लेंथमध्ये तो जराही चुकला नाही.
 
कर्णधार आणि गोलंदाज दोन्ही बाबतीत त्यानं जबाबदारी स्वीकारली आणि इतरांपेक्षा चांगली कामगिरी केली.
 
कमिन्सने जाळं विणलं
ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारताच्या प्रत्येक खेळाडूसाठी वेगळी तयारी केली होती, असं म्हटलं जातं.
 
रोहित शर्माची कमकुवत बाजू काय, त्याला गेममधून कसं बाहेर करायचं. कोहलीच्या रन रेटवर कसा ब्रेक लावायचा आणि राहुलवर कसा दबाव निर्माण करायचा, यासर्वासाठी त्यांच्याकडे वेगळे प्लान होते.
 
पण अशा योजना आखल्यानंतर त्या मैदानावर उतरवणाऱ्या कर्णधाराचीही गरज असते. कमिन्सनं ते काम अगदी चोखपणे निभावलं. रोहित शर्माला मोठे फटके खेळायला लावत त्याला जाळ्यात अडकवलं.
 
कोहलीच्या चौकारांच्या दिशेला जास्तीचे फिल्डर ठेवत त्याच्यावर दबाव आणला, अशाप्रकारे सर्वांसाठी त्यांनी योजना आखल्या होत्या.
 
तुम्ही पहिल्या 10 ओव्हर म्हणाल तर सामना भारतीय संघाच्या बाजूनं गेला असता. पण नंतरच्या 40 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचाच दबदबा होता.
 
बॅटनेही कमाल करणारा कमिन्स
कमिन्स गोलंदाजीच नव्हे तर वेळ पडल्यास फलंदाजीतही चांगली कामगिरी करू शकतो हे नाकारता येणार नाही.
 
विशेषत: अॅशेस सिरीजच्या पहिल्या कसोटीत संघासमोर 281 धावांचं लक्ष्य होतं आणि 8 बाद 221 धावा अशा अडचणीच्या स्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ होता.
 
त्यावेळी नुकताच कर्णधार बनलेला कमिन्स मैदानावर आला आणि 44 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
 
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये अफगानिस्तानच्या विरोधातील वर्ल्ड कप सामन्यातही कमिन्सनं मॅक्सवेलला ती अविस्मरणीय खेळी करण्यासाठी चांगली साथ दिली.
 
ऑस्ट्रेलियाचा त्या सामन्यात पराभव झाला असता तर त्यांना सेमिफायनल गाठणं कठिण गेलं असतं. कर्णधार म्हणून आणि त्याचबरोबर गोलंदाज आणि फलंदाज म्हणूनही कमिन्सनं संघाला बरंच काही दिली.
 
कमी वयात संघात स्थान
कमिन्सला 2011 मध्ये 18 व्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या संघात समाविष्ट करण्यात आलं होतं. कमी वयातच दारात अडकल्यानं कमिन्सनं उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग गमावला होता.
 
पण त्या बोटासह दृढनिश्चयानं तो जगातील वेगवान गोलंदाजांमध्ये चमकत राहिला आणि आघाडीच्या गोलंदाजांमध्ये पोहोचला.
 
रेयान हॅरीसनं निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या जागी आणखी एका वेगवान गोलंदाजाची गरज होती. ती जागा भरून काढण्यासाठी कमिन्स आला होता. त्यानंतर जवळपास 6 वर्षांनी 2017 मध्ये त्याचा पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला.
 
वेगळ्या धाटणीचा कर्णधार
 
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनल्यानंतर कमिन्सनं आधीच्या कर्णधारांच्या तुलनेत वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा चेहरा मैदानावर कधीही स्टिव्ह वॉ, रिकी पाँटिंग, क्लार्क आणि टीम पेन यांच्यासारखा नसायचा.
 
कायम हसत आणि शांत चेहरा असणाऱ्या कमिन्सनं सहकाऱ्यांबरोबर मिसळून राहण्याची वृत्ती अंगिकारली. त्यानं गोलंदाजांना त्यांच्या योजनांनुसार क्षेत्ररक्षण सजवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं.
 
"कमिन्सचं हास्य खूप सुंदर आहे. तो त्यानंच सर्वांना मंत्रमुग्ध करतो. त्यामुळं तो चॅम्पियन ठरतो," असं मत कमिन्सच्या पेनरिथ माऊंटेन क्लबचा कोच मायकल होलोगन म्हणाला.
 
मैदानावर तो क्वचितच कधी ओरडून किंवा आनंद जाहीर करताना दिसला असेल. इतर ठिकाणी त्याचं हास्यच उत्तर देतं. कमिन्सला प्रतिस्पर्धी खेळाडूंबरोबर वाद घालणं आवडत नाही.
 
मुस्लीम सहकाऱ्यासाठी शॅम्पेन सेलिब्रेशन टाळलं
 
कसोटी आणि वन डे सामन्यांत पराभवानंतरही कमिन्स नेहमी त्याच्या सहकाऱ्यांच्या पाठिशी समर्थपणे उभा राहतो. कमिन्स कर्णधार म्हणून पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, त्याचा दोष इतरांवर थोपवणं त्याला आवडत नाही.
 
कमिन्स सहकाऱ्यांच्या धार्मिक भावनांचाही आदर करतो. ऑस्ट्रेलियाच्या संघानं अॅशेस जिंकल्यानतर सेलिब्रेशन दरम्यान शॅम्पेन उडवली जात होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात मुस्लिम सदस्य उस्मान ख्वाजाही होता.
 
शॅम्पेन उडवून सेलिब्रेशन सुरू झाल्यानंतर ख्वाजा त्यात सहभागी झाला नाही. इस्लाममध्ये दारु वर्ज्य असल्यानं तो सहभागी झाला नाही. त्यावेळी कमिन्सनं सहकाऱ्यांना सांगितलं आणि शॅम्पेनचं सेलिब्रेशन थांबवलं.
 
त्यानंतर त्यांनी पुन्हा ख्वाजाला त्यांच्याबरोबर सेलिब्रेशनसाठी बोलावलं आणि शॅम्पेन टाळून सेलिब्रेशन केलं. कमिन्सच्या या कृत्याच्या सगळीकडूनच मोठं कौतुक करण्यात आलं होतं.
 
कोरोनासाठी मदत
 
भारतात कोरोनामुळं हाहाकार उडाला होता त्यावेळी पॅट कमिन्सनं मदत करत माणुसकीचं उदाहरण दाखवून दिलं होतं.
 
पॅट कमिन्सनं त्यावेळी कोरोनामुळं निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी 50 हजार डॉलरस ची देणगी दिली होती.
 
क्षमता सिद्ध करून दाखवली
कमिन्सच्या कर्णधारपदाबाबत बोलताना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मुथ्थू कुमार यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की,
 
"कमिन्स वर्ल्ड कपमध्ये कमी अनुभव असलेला कर्णधार म्हणून आला होता. वर्ल्ड कप पूर्वी त्याला दक्षिण आफ्रिका आणि भारताविरोधात कठिण मालिकांना सामोरं जावं लागलं होतं.
 
पण ऑस्ट्रेलियाला अॅशेस जिंकवून देत त्यानं सर्वांना वेगळा विचार करायला भाग पाडलं. तेव्हाच त्याच्यात नेतृत्व गुण असल्याचं लक्षात आलं होतं.
 
या वर्ल्ड कप फायनलमध्ये तर कमिन्सच्या प्रतिभेला अधिक चकाकी मिळाल्याचं दिसून आलं. कमिन्सनं भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूसाठी वेगळी रणनिती आखली. ती मैदानावरस यशस्वी करून विश्वचषक जिंकल्यानं तो महान कर्णधार ठरला.
 
7 मुख्य खेळाडूंंचं योगदान
"रिकी पाँटिंग, स्टिव्ह वॉ आणि टेलरसारख्या यापूर्वीच्या कर्णधारांनी भरपूर अनुभवासह वर्ल्ड कपमध्ये संघाचं नेतृत्व केलं होतं. पण कमिन्स एकमेव असा कर्णधार होता ज्यानं कमी अनुभवासह संघाचं नेतृत्व केलं आणि विश्वविजेता बनला."
 
"पण कमिन्सचं नेतृत्व हेच एकमेव कारण नव्हतं. तर ऑस्ट्रेलियाच्या संघात 7 खेळाडू असे होते ज्यांनी 2015 चा वर्ल्डकप खेळला होता. संघातील अनुभवी खेळाडू हेच त्यांच्या विजयाचं मुख्य कारण होतं," असंही ते म्हणाले.
 
आयपीएल मुख्य कारण
मुथ्थू कुमार म्हणाले की, आयपीएलमुळेच ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू भारतीय पिचवर सहज खेळू लागले आहेत.
 
"ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतीय उपखंडात चांगलं खेळण्याचं मुख्य कारण आयपीएल स्पर्धा आहे. या स्पर्धेत खेळून भारतीय खेळपट्ट्यांचा चांगला अभ्यास झाल्यानं ते सहज याठिकाणी खेळतात. त्यामुळंच ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप जिंकला," असंही ते म्हणाले.
 
दबाव टाकण्याची मानसिकता नाही
एख लाख चाहत्यांना शांत करू हे कमिन्सचं वक्तव्य दबाव टाकण्याच्या मानसिकतेतून नव्हतं, असंही मुथ्थू कुमार म्हणाले.
 
"कमिन्सनं जे म्हटलं त्याचा आपण चुकीचा अर्थ काढायला नको. ही दबाव टाकण्याची मानसिकता नाही. ऑस्ट्रेलियामध्ये मूळ रुपानं क्रीडा परंपरा आहे. त्याठिकाणचे खेळाडू प्रतिस्पर्ध्यांशी बोलताना असंच बोलतात. कमिन्स हा ऑस्ट्रेलियन लोकांच्या मानसिकतेचं प्रतिक आहे. त्यामुळं मला यात काही वाईट हेतू आहे वाटत नाही," असंही ते म्हणाले.
 
Published By- Priya Dixit