1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 10 जून 2023 (22:41 IST)

शुबमन गिलला कॅचआऊट देण्यावरुन वाद का झालाय?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताच्या शुबमन गिलला झेलबाद देण्यावरुन वादाला तोंड फुटलं आहे. इंग्लंडमध्ये लंडन शहरातील ओव्हल मैदानात हा मुकाबला सुरू आहे. चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान हा प्रकार घडला.
 
स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर शुबमनने मारलेला फटका स्लिपमध्ये कॅमेरुन ग्रीनच्या दिशेने गेला. सहा फूटांपेक्षा उंच ग्रीनने डावीकडे खाली झेपावत झेल टिपला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ग्रीनचं कौतुक करत विकेट साजरी करायला सुरुवात केली पण शुबमनला झेल स्पष्टपणे टिपला गेल्याची खात्री नव्हती. मैदानावरील पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला.
 
तिसरे पंच रिचर्ड केटलबरो यांनी सर्व रिप्ले पाहिले. झेल टिपताना ग्रीनची बोटं चेंडूच्या खाली होती हे पडताळून पाहिलं. ग्रीनच्या बोटांचा जमिनीशी स्पर्श होतो आहे का ते पाहिलं. ग्रीनने डाव्या हातात झेल टिपला. मात्र काही कॅमेरा अँगलमध्ये त्याची बोटं जमिनीला स्पर्श करत असल्याचं दिसलं. परंतु ग्रीनच्या डाव्या हातात चेंडू घट्ट येऊन बसला होता. मैदानातल्या प्रेक्षकांना शुबमनला बाद दिलं जाणार नाही असं वाटलं. पण तिसरे पंच केटलबरो यांनी शुबमनला बाद दिलं आणि मैदानात चीट चीट चीट अशी हुर्यो उडवण्यात आली.
 
शुबमन पॅव्हेलियनच्या दिशेने परतला. कर्णधार रोहित शर्माने मैदानातील पंचांशी चर्चा केली. जायंट स्क्रीनवर आऊट असे शब्द उमटताच रोहित शर्माच्या तोंडून नो असे उद्गार बाहेर पडले. रोहित पंचांच्या निर्णयाशी सहमत नव्हता. मैदानावर हे नाट्य घडताच सोशल मीडियावर नोबॉल हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.
 
भारतीय चाहत्यांना ग्रीनने झेल नीट घेतला नसल्याचं वाटलं. ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांना मात्र ग्रीनने तो झेल व्यवस्थित घेतल्याचं वाटलं. ग्रीनने खेळभावनेला साजेसं वर्तन केलं नसल्याचं अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे. काही चाहत्यांच्या मते तिसऱ्या पंचांनी फ्रेम झूम करून पाहिली असती तर त्यांना चेंडू जमिनीला लागल्याचं दिसलं असतं.
 
444 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची मदार कर्णधार रोहित शर्मा आणि दमदार फॉर्मात असलेल्या शुबमन गिलवर होती. गिलला बाद देण्यात आलं तेव्हा भारताच्या 41 धावा झाल्या होत्या.
 
ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ यांच्या शतकांच्या बळावर पहिल्या डावात 469 धावांची मजल मारली. हेडने 163 तर स्मिथने 121 धावांची खेळी केली.
भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने शुबमन गिलला बाद देण्यावरून भाष्य केलं आहे.
 
भारतातर्फे मोहम्मद सिराजने 4 विकेट्स पटकावल्या.
 
प्रत्युत्तारादाखल खेळताना भारतीय संघाने 296 धावा केल्या. अजिंक्य रहाणेने 89 धावांची दिमाखदार खेळी साकारली. शार्दूल ठाकूरने 51 धावा करत त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 3 तर मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि कॅमेरुन ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
 
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 270 धावांवर डाव घोषित केला. अलेक्स कॅरेने नाबाद 66 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मिचेल स्टार्क आणि मार्नस लबूशेन यांनी 41 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 444 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतीय संघाने 91/1 धावा केल्या आहेत.
 


Published By-Priya Dixit