राम जन्मला ग सखी राम जन्मला
- स्वाती प्रकाश दांडेकर
तसं पाहिलं तर जेव्हा पृथ्वीवर राक्षसांच्या अन्यायाचा अतिरेक झाला तेव्हा तेव्हा देवाला अवतार घेऊन पृथ्वीवर यावं लागलं. जीवनाचा आदर्श, सत्य व धर्म अशा अनेक गोष्टींना अजरामर करायला श्रीरामाचा अवतार झाला आणि त्याच अवताराची पूजा आम्ही आज ही करत आहोत. आणि |
|
|
स्व ग. दि. माडगूळकर यांची अमर शब्दरचना. श्री सुधीर फडके यांच्या सुमधुर गळ्यातून स्वरलहरी निघतात आणि दुपारी बाराच्या सुमारास कथेकरीबुवाचं कीर्तन अगदी रंगात आलेलं असतं. यज्ञ कुण्डातून विष्णू अवतीर्ण होऊन पायसदान देतात. कौसल्येची गर्भावस्था व प्रसव वेदनेचं वर्णन जेव्हा काव्य रूपात येणाऱ्या स्वरलहरीवंर लहरत येत तेव्हा, 'राम जन्मला ग सखी राम जन्मला' म्हणताना अगदी असं वाटतं जणू आताच रामजन्म झालाय. बाळा जो जो रे ची अंगाई म्हणताना तर आनंदाला पारावरच उरत नाही. असं वाटत जणू आम्ही कलियुगात नसून त्रेता युगातच आहोत. नऊ दिवसाच्या नवरात्रानंतर आलेली चैत्र शुद्ध नवमी, नवीन शालिवाहन वर्षाचा आनंद घेऊन येते. आदर्श शांत मर्यादा पुरुषोत्तम राम अवतरतात.खरचं धीरगंभीर रामाची मूर्ती समोर असली की मन कसं शांत होतं. अंतर्मनाचा कोलाहल थांबून मन प्रभू-चरणी लीन होतं. जीवनाची सत्यता त्याच्या डोळ्यात दिसते आणि मानवाला आपल्या चुका आपोआप कळायला लागतात. हे जीवन किती क्षण भंगुर आहे हे उमजू लागतं. डोळे अश्रूंनी भरून येतात. मनातले दु:ख ओठावाटे बाहेर येत अन श्रीरामाचे चरण धरावे, ह्या ओळी आठवू लागतात. भगवान रामाला शरण गेल्यावर दु:खाचा तर मागमूसच राहत नाही. मन कसं ओहोटी आल्यावर शांत होणाऱ्या समुद्राप्रमाणे होतं खरंच रामचंद्रांची हीच विशेषता आहे. हे रूप मनात कोरताना 'जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे' हा विश्वास मनात जागतो अन पुन्हा नवीन उमेद घरून नवीन गोष्टींचा सामना करण्याची इच्छा मनात जागृत होते. तसं पाहिलं तर जेव्हा पृथ्वीवर राक्षसांच्या अन्यायाचा अतिरेक झाला तेव्हा तेव्हा देवाला अवतार घेऊन पृथ्वीवर यावं लागलं. जीवनाचा आदर्श, सत्य व धर्म अशा अनेक गोष्टींना अजरामर करायला श्रीरामाचा अवतार झाला आणि त्याच अवताराची पूजा आम्ही आज ही करत आहोत. आणि करत राहू.
श्रीराम एक आदर्श पुत्र, भ्राता, शिष्य, पती, अशा सर्व सांसारिक नात्यात श्रेष्ठ होते. श्री राम चक्रवर्ती राजा असून सुद्धा त्यांच्या वागण्यात एक साधेपणा होता. यांचे श्रेष्ठ उदाहरण आम्हाला केवट व शबरी यांच्याशी वागण्यात दिसून येते. गरीब अशिक्षित केवट गंगेला म्हणतो, 'नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे उर भरू. श्रीरामाचे नाव घेत या श्रीरामाला पार करू. ' जो राम आपलं जीवन तरणारा त्याला आपण काय पार करणार? तरी ही श्री रामांनी त्याच हे साधं रूप स्वीकार केलं. तसंच शबरीची उष्टी बोरं खायलाही रामाला काही संकोच वाटला नाही. पत्नीच्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी वानरांची सेना घेऊन, समुद्रा पार जाऊन रावणाला दंड दिला. आपली मर्यादा पार न करता कसं वर्तन करावं हे रामचं चरित्र सांगतं. जीवनाच्या प्रत्येक नात्याशी कर एकरूप राहावं, कर्तव्याची जाणीव कशी ठेवावी हे रामचरित्र सांगतं.आपण या रामासारखे कां वागत नाही किंवा वागू शकत नाही? कारण हे कलियुग आहे, म्हणून संभव नाही अस आपल्या सर्वांना वाटत. पण अस नाहीये, आपण आपल्या मनातला राम कधी जागवायचा प्रयत्न केला आहे का? कधी-कधी आत्मचिंतन जीवनाचा मार्ग प्रशस्त करून योग्य ती वाट दाखविते. रामासारखं वागणं ह्या जगात अशक्य नाहीये. कधी छोट्या भावा बहिणीचं शिक्षण व लग्न ही जबाबदारी घेऊन तर बघा. आश्रित माता-पित्यांना वृद्धाश्रम न दाखविता आपल्या जवळ ठेवायचा प्रयत्न तर करा. गुरुसमोर नक्कल न करता योग्य रीतीने परीक्षा तर द्या, छोट्या अनाथ लोकांना मदत तर करा. पाहा जीवन केवढं सुखमय होईल. जीवन सार्थक झाल्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्याल. आपल्यासाठी तर जनावर सुद्धा जगतात पण मानवाला आज आपला परिवार सुद्धा जड होतोय.आजकालची तरुण पिढी व्यक्तित्व विकासासाठी वेगवेगळे वर्ग लावते कारण आजच्या काळाची ही गरज आहे पण आजी-आजोबां सोबत आपला इतिहास, पुराण, वीर पुरुष व ऋषी मुनींचे चरित्र वाचावे. त्यात संपूर्ण जीवन दर्शन मिळेल, त्याच बरोबर स्वाभिमान, आत्मसन्मान, शांती, प्रेम, विश्वास हे गुणही मिळतील अन तुमचं जीवन हिऱ्याच्या पैलू प्रमाणे चमकेल.