lumpy virus what exactly गेल्या महिन्याभरापासून अहमदनगरमध्ये लम्पी व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
डॉ. मुकुंद राजळे हे अहमदनगरमध्ये जिल्हा पशुसर्वचिकित्सालयात सहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगरमध्ये 1,174 जनावरांना लम्पी व्हायरसची लागण झाली असून आतापर्यंत 53 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 424 जनावरे बरी झाली असून 19 जनावरे गंभीर जखमी आहेत.
गोचीड, गोमाशी आणि डास यांच्या माध्यमातून लम्पी व्हायरसचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्याच्या दिवसांत गोचीड आणि डासांचं प्रमाण वाढल्यामुळे लम्पीचा प्रादुर्भाव वाढायला लागतो.
लम्पी व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून काही उपाय सांगितले जात आहेत. त्यामध्ये, शेतकऱ्यांनी जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणं, गोठ्यात धूर करणं गरजेचं आहे.
ग्रामपंचायतीनं वाड्या-वस्त्यांमध्ये सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करावी.
लम्पी व्हायरसची लागण झालेलं जनावरं आढळलं तर तत्काळ सरकारी दवाखान्यात त्याला दाखल करावं.
लंपी रोग माणसांना होत नाही. तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातून हा संक्रमित होत नाही. म्हशींना हा आजार होत नाही. त्यामुळे त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही. हा आजार प्रामुख्याने गाय आणि बैलाला होतो.
माध्यमांमधून प्रसारित होणाच्या बातम्यांमुळे पशुपालकांमध्ये अनावश्यक भीती बाळगण्याचे कारण नाही, परंतु आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन सरकारने केलं आहे.
लंपी विषाणू काय आहे आणि तो कसा पसरतो?
युरोपियन अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या मते लंपी हा एक त्वचारोग आहे आणि तो प्राण्यांमध्ये आढळतो. तो रक्तपिपासू कीटकांद्वारे पसरतो.
ज्या प्राण्यांना हा रोग आधी झालेला नाही त्यांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावर ताप येतो आणि त्वचेवर फोड येतात. यावर पीडित प्राण्यांचं लसीकरण हाच एक उपाय आहे.
गुजरातमध्ये लंपी विषाणू दोन वर्षांपूर्वी सापडला आहे. आणंद आणि खेडा जिल्ह्यांत या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.
तर दुग्धजन्य पदार्थांचा उद्योग करणाऱ्या लोकांनी अनेक प्राण्याचं लसीकरण केलं आहे.
विषाणू पसरण्याची कारणं
पहिलं कारण असं की शहरात आणि खेड्यात गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याबद्दल बोलताना गुजरात सरकारच्या पशुपालन विभागाचे उपसंचालक डॉ. अमित कयानी म्हणतात, "रक्तपिपासू माशा आणि डासांमुळे हा विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरतो. जर एखाद्या रस्त्यावरच्या प्राण्याला हा रोग झाला तर तो एका जागी स्थिर थांबत नाही. त्यामुळे या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो. या विषाणूविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे सध्या हा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे."
अज्ञान हे विषाणू पसरण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे. याबद्दल बोलताना पांजरापोळ या संस्थेचे प्रवीण पटोलिया म्हणाले, "अनेक शेतकऱ्यांना या रोगाची माहिती नाही. लोकांना राजकीय रॅलीसाठी ट्रक भरून भरून घेऊन जातात. मात्र इतक्या महत्त्वाच्या विषयावर शेतकऱ्यांना माहिती दिली नाही. तसं केलं असतं तर हजारो प्राण्यांचा जीव वाचला असता."
पटोलिया यांच्यामते शासनाकडे फक्त एका विशिष्ट भागाची माहिती आहे. 30,000 पेक्षा अधिक गुरांचा मृत्यू झाला आहे. बेवारस गुरांच्या मृत्यूची संख्या मोजलेलीच नाही, असा त्यांचा दावा आहे.
जिथे प्राणी राहतात तिथे माशा आणि डासांना हाकलणं अतिशय गरजेचं आहे.
लम्पी व्हायरसची लक्षणं
प्राण्यांच्या अंगावर पुरळ उठतं. तसंच त्यांना ताप येतो. त्यांना दूध कमी येतं. काही गुरांचा गर्भपातही झाला आहे. तसंच ते नपुंसक होण्याचीही शक्यता असते.
ज्या प्राण्यांना हा रोग झाला आहे त्यांच्या डोळ्यातून, नाकातून आणि थुंकीतून स्राव गळतो.
अनेक शेतकऱ्यांच्या मते गेल्या दोन वर्षांपासून गुजरातमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव आहे. मात्र राज्य सरकारने याबाबत काहीही केलं नसल्याचा आरोप केला आहे.
उत्तर गुजरात आणि सौराष्ट्र भागात या विषाणूचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. सौराष्ट्र भागातील जामनगर आणि देवभुमी भागात या विषाणूच्या अनेक केसेस सापडल्या आहेत. जवळपास 20 जिल्ह्यांना या विषाणूचा फटका पडला असून 54,000 गुरांना या विषाणूची लागण झाली आहे.
कच्छ जिल्ह्यात या विषाणूने कहर केला असून तिथल्या 37,000 गुरांना या विषाणूचा फटका बसला आहे.
जामनगर येथील आरोग्य अधिकारी अनिल विराणी बीबीसीशी बोलताना म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी लंपी त्वचा रोग गुजरातमध्ये आढळून आला. या रोगासाठी गॉट पॉक्स नावाची लस अतिशय परिणामकारी आहे. त्याचा प्रभाव दिसायला 15 ते 20 दिवस लागतात. तर या रोगामुळे होणारा मृत्यूदर 1 ते पाच टक्के आहे. या विषाणूचा माणसांवर काहीही परिणाम होत नाही."
गुजरातचे कृषीमंत्री राघवजी पटेल यांनीही या विषाणूच्या प्रादुर्भावाबदद्ल माहिती दिली. लंपी विषाणूचा प्रभाव राज्यातील 1935 गावांमध्ये दिसून आला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली आहे. गांधीनगर येथील कामधेनू विद्यापाठीचे कुलगुरू या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे कृषीमंत्री म्हणाले, "आतापर्यंत सरकारने तीन लाख गुरांचं लसीकरण केलं आहे. सध्या आमच्याकडे दोन लाख गॉट पॉक्स लसी आहेत. जास्त डोसेजची शक्यता लक्षात घेता आणखी दहा लाख लशींची मागणी नोंदवण्यात आली आहे."
सरकारकडून मार्गदर्शक सूचना
केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्या ठिकाणी गुरांना या रोगाची लागण झाली आहे त्याच्या पाच किलोमीटर हद्दीतच लसीकरण करावं असं सरकारचं म्हणणं आहे.
ज्या ठिकाणी विषाणूची लागण झाली तो स्वच्छ करावा. तसंच निरोगी जनावरांना Ectoparasiticide हे औषध द्यावं.