1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (19:06 IST)

गाढविणीचं दूध 7,000 रुपये प्रती लिटर विकलं जातंय, हा दावा किती खरा? - फॅक्ट चेक

मोहम्मद शाहिद
कुणाला गाढव म्हणणं एकप्रकारे त्या व्यक्तीला मूर्ख असं संबोधण्यासारखं मानलं जातं. तसेच सलग काम करणाऱ्यांना अनेकदा गाढवासारखं काम करणारा, असं म्हटलं जातं.
 
भारतात ओझं वाहण्यासाठी गाढवांचा उपयोग करण्यात येतो. पण, गाड्यांची संख्या जसजशी वाढत गेली, तसंतशी गाढवांची संख्या कमी होताना दिसत आहे. पण, आता गाढवांविषयी अशी गोष्ट समोर आली आहे ज्यामुळे लोकांना गाढवांमध्ये अधिक रुची वाटू शकते.
 
टाईम्स ऑफ इंडियानं मंगळवारी एका बातमीत सांगितलं की, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, हिसार (हरयाणा)स्थित राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र (NRCE) लवकरच गाढविणीच्या दूध डेअरीची स्थापना करणार आहे.
 
या डेअरीत हलारी जातीच्या गाढवांना ठेवलं जाईल आणि दूध काढलं जाईल, असंही या बातमीत म्हटलं आहे.
 
याशिवाय एबीपी न्यूज, नवभारत टाईम्स आणि नॅशनल हेराल्डसारख्या माध्यमांनीही ही बातमी छापली आणि म्हटलं की, गाढविणीचं दूध प्रती लिटर 7,000 रुपयांना विकू शकतं.
 
या बातम्यांत गाढविणीच्या दुधाचे अनेक उपयोग सांगितले आहेत.
 
आता आपण बीबीसीच्या फॅक्ट चेकमध्ये गाढविणीच्या दुधाचे काय फायदे आहेत आणि हे दूध प्रती लिटर 7,000 रुपयांना कशाप्रकारे विकलं जाऊ शकतं, याविषयी माहिती पाहू.
गाढविणीच्या दूधाचे फायदे
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या खाद्य आणि कृषी क्षेत्राशी संबंधित संघटनेच्या निष्कर्षात असं आढळलं की बहुतांश प्राण्यांचं दूध गुणात्मकदृष्ट्या कमी लेखलं जातं. यामध्ये गाढविणीचं आणि घोडीच्या दुधाचा समावेश आहे
 
संघटनेचं म्हणणं आहे की, ज्या लोकांना गायीच्या दुधाची अलर्जी असते, त्यांच्यासाठी हे दूध लाभदायक ठरतं. कारण गाढवीण आणि घोडीच्या दूधात अशाप्रकारचं प्रोटीन असतं, ज्यामुळे हा लाभ होतो. हे दूध मानवी दूधासारखं असतं, ज्यात प्रोटीन आणि चरबीचं प्रमाण कमी असतं, पण लॅक्टॉस मोठ्या प्रमाणावर असतं.
 
हे दूध लवकर नासतं आणि त्यापासून पनीर बनवता येत नाही, असंही म्हटलं आहे.
 
या दूधाचा वापर सौंदर्य प्रसाधनं आणि औषध निर्माण क्षेत्रातही होतो. कारण पेशींना ठीक करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठीचे गुण या दुधात असतात.
प्राचीन इजिप्रची महिला शासक क्लियोपॅट्रा आपलं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी गाढविणीच्या दूधानं अंघोळ करायची, अशी आख्यायिका आहे.
 
NRCE माजी निर्देशक डॉ. मुक्ती साधन बसू सांगतात की, "गाढविणीच्या दूधाचे दोन प्रमुख फायदे असतात. एक म्हणजे हे दूध महिलेच्या दूधासारखं असतं आणि दुसरं म्हणजे यात अँटी-एजिंग, अँटि-ऑक्सिडेंट और रीजेनेरेटिंग कंपाउंड्स असतात. यामुळे त्वचा मऊ बनण्यास मदत होते."
 
ते पुढे सांगतात, "भारतात गाढविणीच्या दुधावर अद्याप संशोधन करणं बाकी आहे, कारण लोकांना या दूधाच्या फायद्याविषयी माहिती नाहीये. युरोपात मात्र या दूधाविषयी अनेकांना माहिती असते. तिथं वर्किंग वुमेन आपल्या नवजात बालकांसाठी गाढविणीच्या पाश्चरयुक्त दूधाचा (Pasteurized Milk) वापर करत आहेत. आता तर अमेरिकेनंही याला परवानगी दिली आहे."
 
"यात लॅक्टॉज़, व्हिटामिन ए, बी-1, बी-2, बी-6, व्हिटामिन-डी और व्हिटामिन-ई यांचाही समावेश असतो. गाढविणीच्या दूधापासून बनलेलं साबण, क्रीम आणि मॉइश्चरायझरला बाजारात मागणी असते. आज भारतात अनेक महिला गाढविणीच्या दूधापासून बनलेल्या वस्तूंचा वापर करत आहेत."
 
बसू सांगतात, "असं असलं तरी भारतात अद्याप गाढविणीच्या दूधापासून खूपच कमी वस्तूंचं उत्पादन होत आहे. यात वाढ झाल्यानंतर गाढविणीच्या दुधाचं प्रमाण कमी होईल. कारण भारतात गाढवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे."
 
गाढवीण किती दूध देते?
गाढविणीच्या दूधासाठी NRCE गुजरातहून हलारी जातीचे गाढव आणत आहे. आनंद कृषी विद्यापाठीच्या पशू आनुवांशिकी आणि प्रजनन विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. एन. रांक सांगतात की, भारतात गाढवांच्या प्रजननाविषयी संबंधित पहिल्यांदाच असं काम होत आहे.
ते सांगतात, "भारतात यापूर्वी गाढवांच्या स्पीति प्रजातीलाच तेवढी मान्यता होती. आता गुजरातमधील जामनगर आणि द्वारकामध्ये आढळणऱ्या हराली प्रजातीलाही मान्यता देण्यात आली आहे. हे गाढव सामान्य गाढवांपेक्षा अधिक उंच आणि घोड्यांपेक्षा थोडे छोटे असतात. त्यांचा रंग पांढरा असतो. आतापर्यंत भारतात रस्त्यांवर हिंडणाऱ्या गाढवांच्या प्रजातीची ओळख पटलेली नव्हती, पण आता दोन प्रजातींची माहिती मिळाली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे."
 
रांक पुढे सांगतात, गाढवांकडे लक्ष न दिल्यास आणि त्यांच्याकडून जास्तीचं काम करून घेतल्यास दूध कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता असते. एक गाढवीण दिवसभरात जास्तीत जास्त अर्धा लीटर इतकं दूध देते आणि गाढविणीचा सांभाळ कसा केला जातो, यानुसार त्यात कमी-जास्तपणा येऊ शकतो.
 
7,000 रुपये लीटर?
गाढविणीच्या दूधाचा व्यापार करण्यास भारतात आता सुरुवात झाली आहे. हे दूध महाग जरी असलं आता ते 7,000 रुपये प्रती लीटर या दरानं विकलं जात नाहीये, असं रांक सांगतात.
 
वेगवेगळ्या माध्यम संस्थांनी 7,000 रुपये प्रली लिटरचा आकडा विदेशी दराला स्रोत मानून दिल्याचं ते सांगतात.
 
डॉ. बसू सांगतात, "एखाद्या फार्मध्ये गाढवांचं पालन करण्यास तामिळनाडू, केरळ आणि गुजरातमधील काही जणांनी केलं आहे आणि या गाढवांची खरेदी-विक्री बहुतेकदा ऑनलाईन पद्धतीनं होते."
 
सलीम अब्दुल लतीफ दादन मुंबईमध्ये वेरी रेयर ऑनलाईन डॉट कॉम नावाची वेबसाईट चालवतात. ते उंट, मेंढी, गाय याबरोबरच गाढविणीच्या दूधापासून बनलेलं तूप आणि दूध पावडर विकतात.
 
ते सांगतात, "गाढवाच्या दूधाची किंमत निश्चित नसते आणि ते काही एखाद्या फार्ममधून येत नाही. आम्ही आमच्या लोकांकडून त्यांच्या त्यांच्या गावातून हे दूध मागवतो. सौंदर्य प्रसाधनं आणि औषधांसाठीच या दूधाला अनेक जण खरेदी करतात."
 
ते पुढे सांगतात, "ज्यावेळी तुम्ही या दूधाला दूर अंतरावर पाठवणार असाल तरच ते 7,000 रुपये प्रती लिटर या किंमतीला विकलं जाऊ शकतं. कारण ते लवकर खराब होतं. पण, तुम्ही मुंबईतच ते खरेदी करणार असाल तर 5,000 रुपये प्रती लीटर इतक्या दरानं ते मिळतं."
 
साबण आणि सौंदर्य प्रसाधनांऐवजी ते पोटाच्या बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठीही वापरता येतं.
गाढविणीच्या दूधाचा स्टार्टअप
गाढवांच्या माध्यमातून मजूरी करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशानं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून एमए केल्यानंतर दिल्लीतल्या पूजा कौलनं ठरवलं. यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये अशा शेतकऱ्यांना एकत्र केलं, ज्यांच्याकडे गाढव होते.
 
त्यांनी गाढविणीचं दूध सामान्य माणसांना विकण्यासाठी एक मॉडेल विकसित केलं आहे. सुरुवातीला ते अपयशी ठरलं, पण त्या थांबल्या नाहीत. त्यांनी काही मित्रांसोबत ऑर्गेनिको नावाचं स्टार्टअप सुरू केलं. त्या माध्यमातून ते गाढविणीच्या दूधापासून त्वचाशी संबंधित उत्पादनं बनवून विकतात.
 
पूजा सांगतात, "दिल्लीत 2018मध्ये या स्टार्टअपची सुरुवात झाली. आम्ही गाझियाबाद आणि शेजारील परिसरातल्या मजुरांशी संपर्क साधला. ते गाढवांच्या माध्यमातून दररोज 300 रुपये कमावतात, आम्ही दूध विकण्यासाठी त्यांचं मन वळवलं. सुरुवातीला त्यांच्या घरातील महिलांनी याला विरोध दर्शवला. त्यांना वाटायचं की जादू-टोणा करण्यासाठी आम्ही या दूधाचा वापर करत आहोत आणि यामुळे त्यांची गाढवीण मरेल. पण काही काळानंतर त्या दूध विकायला लागल्या. आता अनेकांना माहिती झालं की आम्ही गाढविणीचं दूध विकतोय, तर अनेक जण फोन करून विचारणा करतात."
 
पूजा सांगतात, "त्या 2000 ते 3000 रुपये प्रती लीटर दरानं दूध खरेदी करतात आणि सध्या तरी 7000 रुपये दरानं दूधाची विक्री कुठेच होत नाहीये. कारण एखाद्या फार्ममधून या दूधाची विक्री होत नाही."
 
गाढविणीच्या दूधापासून बनलेलं साबण, मॉइश्चरायझर आणि क्रीम यासारखी उत्पादनं तुम्हाला अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑमलाईन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर दिसतील. पण, तिथं त्यांची किंमत पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
 
त्या सांगतात, "आमच्या 100 ग्रॅम साबणाची किंमत 500 रुपये आहे आणि ती खरेदी करणारा एक वर्ग आहे."
 
भारतातील गाढवांची संख्या
गाढविणीच्या दूधाची किंमत प्रती लीटर हजार रुपयांहून अधिक असली तरी गाढवांची संख्या एक लाखाइतकी मर्यादित आहे.
 
2012च्या तुलनेत गाढवांच्या संख्येत 61टक्क्यांनी घट झाली आहे. 2012मध्ये पशुगणना झाली, तेव्हा गाढवांची संख्या 3.2 लाख इतकी होती. आता 2019मध्ये ती 1.2 लाख झाली आहे.
 
एकीकडे गाढवांची संख्या कमी होत आहे आणि दुसरीकडे गाढविणीच्या दूधाची मागणी वाढल्यास दूधाच्या किमतींतही वाढ होऊ शकते. सध्या तरी गाढविणीच्या दूधाची किंमत 7,000 रुपये प्रती लीटर नसल्याचं बीबीसीच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलं आहे.