मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

Father's Day Special : पिढीजात अंतर असणारच!

आम्ही लहान असताना वडिलांसमोर नुसतं बसायचीसुध्दा आमची हिंमत नव्हती. तो काळच वेगळा होता. आपली मुलं कितवीत शिकतायत हेसुध्दा त्यांना धडपणे ठाऊक नसायचं. मुलं वडिलांसमोर दबून असायची. घरातल्या ग्रामोफोनला किंवा रेडिओला हात लावण्याची आमची हिंमत नसायची. त्यांनी रेडिओ लावला तरच त्यावर गाणी ऐकायला मिळायची. प्रेम होतं पण वचकही तितकाच होता.
 
आमच्या पिढीतली मंडली जेव्हा वडील झाली तेव्हा परिस्थिती बदलली होती. आम्ही मुलांकडे जातीने लक्ष देऊ लागलो. त्यांना शाळेत आणणं-नेणं, त्यांच्या अभ्यास घेणं हे सगळं 'बाप' मंडली करू लागली. अभ्यास केला नाही, मस्ती केली, शाळेतून तक्रार आली तर मारही दिला जायचा. खूप लाड होत नसेल तरी मुलांबरोबरचं नातं हे थोडंसं मित्रत्वाचं हूऊ लागलं होतं. मोजके सिनेमे बघणं, क्वचित कधीतरी हॉटेलमध्ये जेवायला जाणं होत होतं.
 
शिक्षणाच्या निमित्ताने मुलं घरापासून लांब गेली की बापाचं हृदयही विरघळायचं. माझा मुलगाही शिक्षणासाठी नाशिकला राहिला होता. तेव्हा मी महिन्यातून एकदा तरी त्याला भेटायला भेटायला जायचो. होस्टेलवर जाऊन हवं-नको ते पाहायचं, प्राध्यापक मंडलींकडे त्याच्या अभ्यासाबद्दल चौकशी केली जायची.
 
सुट्टीत त्याच्या येण्याकडे माझं लक्ष लागून राहायचं. आमच्या पिढीतल्या अनेक बापांच असं झालं असेल. काहीजणांची मुलं परदेशी शिकण्यासाठी गेली. त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी कष्ट उपसणारे बाप त्यानंतर काही वर्षानी आपल्या वडिलांना आवर्जून परदेशवारी घडवणारी मुलं असं चित्रंही पाहायला मिळालं. मुलाची झालेली प्रगती पाहून त्या बापाची छाती गर्वाने फुलुन जाते. पण मुलांची मित्रमंडळी हा तर बापमंडळींच्या दृष्टीने काळजीचा विषय असायचा. पण अनेकांनी मुलांच्या मित्रांबरोबर मैत्री केली.
 
आजची पिढी मुलांच्या बाबतीत आणखी सजग झाली आहे. पण आताचे बाप मुलांच्या बाबतीत आणखीनच हळवे झाले आहेत. मुलांकडे जरा जास्तच लक्ष दिलं जातं. मुलांच्या मित्र मैत्रिणीवर विशेष लक्ष दिल्या जाते. त्यांच्या वागण्यावर त्याच्या फिरण्यावर नजर ठेवल्या जाते.
 
मुलांना जे हवयं ते चटकन त्यांच्यासमोर हजर केलं जातं. पण त्यामुळे मुलांना एखाद्या गोष्टीची किंमत कळत नाही असं आम्हाला वाटतं. हल्ली मुलं वडिलांच्या खांद्यावर बिनधास्त हात टाकून त्यांच्याशी गप्पा मारतात, वडिलांना 'ए बाबा.....' अशी एकेरी हाक मारली जाते. त्यातून नात्यात मोकळेपणा जरूर येत असेल. पण बाप म्हणून असलेला एक प्रकारचा धाक मात्र जराही राहिलेला नाही हे कुठेतरी खटकतं.
- सुभाष दास्ताने