1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : गुरूवार, 6 जानेवारी 2022 (11:58 IST)

पत्रकार दिन: मराठी माणसाच्या माध्यमं आणि पत्रकारांकडून काय अपेक्षा आहेत?

अमृता कदम
'सध्या भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता गायब होत आहे आणि आजूबाजूला सर्वकाही आलेबल आहे असंच दाखवलं जात आहे,' असं मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं.
 
"भूतकाळात शोध पत्रकारितेतून वेगवेगळे घोटाळे उघड व्हायचे, गैरव्यवहार समोर यायचे आणि त्यामुळे देशभरात पडसाद पडलेले आम्ही पाहिले आहेत. मात्र, सध्याच्या काळात एखाद दुसरा अपवाद सोडता अशा ताकदीची शोध पत्रकारिता पाहायला मिळत नाही," असंही त्यांनी म्हटलं होतं.
 
रमण्णा यांचं विधान हे शोध पत्रकारितेसंदर्भातलं असलं तरी त्यातून पत्रकारितेचं बदलतं स्वरूपही व्यक्त होत आहे.
स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी, अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणारी ते आताची 24 बाय 7 पत्रकारिता…पेन ते काँप्युटर, खिळे जुळवण्यापासून ते डिजिटल प्रिंटिंग, मुद्रित माध्यमं, टीव्ही चॅनेल्स ते हातातल्या मोबाईलवर वेळोवेळी येणारे अपडेट्स… पत्रकारिता बदलत राहिली आहे. मराठी माध्यमंही या बदलांना अपवाद नाहीयेत.
 
या बदलांबद्दल राजकारण, साहित्य, नाटक-चित्रपट, सामाजिक चळवळ अशा विविध क्षेत्रातील जाणकारांना काय वाटतं? मराठी पत्रकारितेत असलेली चांगली गोष्ट जी पूर्वी पाहायला मिळायची, पण आता लोप पावतीये असं त्यांना वाटतं? त्यांच्या मराठी माध्यमांकडून, पत्रकारितेकडून काय अपेक्षा आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही आज (6 जानेवारी) पत्रकार दिनानिमित्त केला.
 
'बातम्यांची विश्वासार्हता कमी होतीये'
सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी याविषयी बोलताना म्हटलं की, "पूर्वी बातम्यांची विश्वासार्हता होती. एखादी बातमी मिळविण्यासाठी पत्रकार जी मेहनत करायचे त्यातून त्या बातमीच्या सत्यतेबद्दल विश्वास निर्माण व्हायचा. पण आता असा विश्वास वाटत नाही. अनेकदा काही बातम्या जाणीवपूर्वक पेरल्यासारख्या वाटतात."
 
"सध्या पत्रकारितेत निर्भीडपणा कमी झाला आहे. मतं व्यक्त करण्याच्या ज्या जागा आहेत, जी सदरं चालवली जातात त्यामध्ये परखडपणा नाहीये. त्यामुळे ते वाचताना यामागचा बोलवता धनी कोण आहे, असाही प्रश्न पडतो," असं उल्का महाजन यांनी म्हटलं.
 
सध्याच्या परिस्थितीत पत्रकारितेतील खटकणाऱ्या गोष्टींबद्दल सांगताना उल्का महाजन यांनी म्हटलं, "सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या बातम्या आता गायबच झाल्या आहेत. सामाजिक मुद्द्यांना तुकड्यातुकड्यांमध्ये स्थान दिलं जातं, त्याबाबतचा समग्र दृष्टिकोन मांडला जात नाही. अगदी आताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर कृषी कायद्यांचा विषय आहे. खरंतर याचे खूप वेगवेगळे पैलू आहेत. पण त्यासगळ्याबद्दल किती मांडलं गेलं?"
 
"सध्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांच्या स्थानिक आवृत्त्याही निघाल्या आहेत...म्हणजे नवी मुंबई, पुणे वगैरे. त्यामुळे काय होतंय की स्थानिक पातळीवरील महत्त्वाचे प्रश्न तेवढ्यापुरतेच मर्यादित राहत आहेत, त्यांचं मुख्य प्रवाहात येण्याचं प्रमाण कमी झालं आहे," असंही निरीक्षण उल्का महाजन यांनी नोंदवलं.
 
पण या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत मूल्यांशी एकनिष्ठ होऊन पत्रकारिता करणारेही लोक आहेत, ही सकारात्मक गोष्ट असल्याचं उल्का महाजन म्हणतात.
 
'महिला अत्याचाराच्या घटनांचा सातत्याने पाठपुरावा व्हायला हवा'
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, पूर्वीच्या आणि आताच्या पत्रकारितेत फार ठळक फरक जाणवत नाही.
 
पण दोन बदल त्यांनी नमूद केले.
 
त्यांनी म्हटलं, "व्यवस्थापकीय किंवा व्यावसायिक निर्णय म्हणून असेल, पण सध्याच्या काळात आवृत्त्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे स्थानिक बातम्यांचं प्रमाण वाढलं आहे. दुसरं म्हणजे बातम्यांचा वेग वाढला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमं, डिजिटल माध्यमांमुळे घडलेल्या घटना त्वरित लोकांपर्यंत पोहोचतात."
 
महिलांवरील अत्याचारांच्या बातम्यांसंबंधीच्या वार्तांकनाबद्दल नीलम गोऱ्हे यांनी एक खंत आणि त्याचबरोबर अपेक्षाही व्यक्त केली.
 
"बऱ्याचदा अशा घटना घडतात, तेव्हा त्यांना ठराविक काळापर्यंत खूप प्रसिद्धी मिळत जाते आणि मग त्यानंतर हळूहळू त्यांची स्पेस कमीकमी होते. कोपर्डी किंवा तसा एखादा गाजलेला खटला असेल, ज्यासंबंधी सामाजिक पातळीवरही खूप चर्चा झाली आहे, अशाच खटल्यांचा फॉलोअप घेतला जातो. किंवा एखादं राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असेल, तर त्याला अधिक प्रसिद्धी मिळते. असं न करता महिला अत्याचारांच्या घटनांचा पाठपुरावा हा व्हायला हवा," असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं.
 
अनेकदा ऑनलाइन आवृत्त्यांमध्ये महिलांचे जे आक्षेपार्ह फोटो असतात, त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
 
'समाजमाध्यमांवरील चर्चा हेच वास्तव समजण्याचा काळ'
सध्याच्या पत्रकारितेवर समाजमाध्यमांचा मोठा प्रभाव दिसत असल्याचं मत अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीशी फोनवरुन संवाद साधताना व्यक्त केलं.
 
"स्वतःचं एक विशिष्ट मत तयार करून म्हणणं मांडलं जात आहे. पूर्वी पत्रकार स्वतःला वेगवेगळ्या राजकीय विचारधारांपासून वेगळं ठेवून पत्रकारिता करायचे, तशी पत्रकारिता आता अभावाने आढळते. साक्षेपी विश्लेषण, सर्वांगीण, समाजहिताचा विचार करून दीर्घकालीन दृष्टिकोन दिसून येत नाही," असं गिरीश कुलकर्णी यांनी म्हटलं.
 
सोशल मीडियावरील वक्तव्यांना दिल्या जाणाऱ्या महत्त्वाबद्दलही गिरीश कुलकर्णी यांनी भाष्य केलं.
"समाजमाध्यमांवर होणारी चर्चा हेच वास्तव असं आकलन मांडलं जात असल्याचं चित्र दिसतंय. कोणीतरी एक व्यक्ती उठते, काहीतरी महत्त्व देऊन पत्रकारिता केली जातीये. जे अनुल्लेखानं मारलं तरी चालणार असतं, त्याला महत्त्व दिलं जातंय.
 
एकूणच समाजमाध्यमांच्या युगात आपण आभासी वातावरणात राहतोय. प्रतिक्रियावादी झालो आहे. अशा परिस्थितीत खरंतर लोकांसमोर काय घेऊन जावं याचा संयम माध्यमांनी बाळगणं खूप गरजेचं आहे.पत्रकारांनी निष्पक्ष राहून वेगवेगळ्या बाजू मांडून सत्याची मांडणी करणं अपेक्षित आहे," असं गिरीश कुलकर्णी यांनी म्हटलं.
 
समाजमाध्यमांच्या पलिकडेही जग आहे, ज्यामध्ये प्रगल्भ, सम्यक विचार करणारे लोक आहेत, याचा कुठेतरी विसर पडतोय असं वाटत असल्याचंही गिरीश कुलकर्णी यांनी म्हटलं.
 
माध्यमांचा विस्तार आणि समाजमाध्यमांमुळे घडत असलेली एक सकारात्मक गोष्ट त्यांनी आवर्जून नमूद केली.
 
त्यांनी म्हटलं की, या सगळ्या वातावरणात एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे ज्या गोष्टींची किंवा घटकांची दखल घेण्याची शक्यता अतिशय कमी होती, त्यांना मुख्य प्रवाहात स्थान मिळत आहे. एरव्ही दुर्लक्षित राहणाऱ्या प्रश्नांना वाचा फुटण्याचा अक्सेस तयार झाला आहे.
 
अगदी दूरवरच्या खेड्यापाड्यातल्या गोष्टींनाही वार्तांकनात स्थान मिळत आहे, मुख्य धारेशी जोडलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं.
'हिंदी मीडियाच्या तुलनेत मराठी माध्यमं अजूनही समतोल'
लेखक प्रणव सखदेव यांनी प्रिंट मीडियाचा काळ आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे बदललेलं पत्रकारितेचं स्वरूप यावर भाष्य केलं.
 
प्रणव यांनी म्हटलं, "प्रिंट माध्यमांचा काळ जेव्हा होता, त्यावेळी घाई नसायची. बातम्या प्रत्यक्ष जाऊन, तथ्यं जाणून घेऊन केल्या जायच्या. कष्ट घेण्याची तयारी होती. त्यामुळे पत्रकारितेला विश्वासार्हता होती.
 
प्रिंट माध्यमं आणि न्यूज चॅनेल्सच्या सुरुवातीच्या काळाचा विचार केला तर समाजाप्रति बांधिलकी होती. जे काम आपण करत आहोत; ते लोक पाहात आहेत, वाचत आहेत, त्यार विश्वास ठेवणार आहेत याचं भान पत्रकारांमध्ये होतं."
"पण आता माध्यमांमध्ये विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये वास्तवापेक्षाही भीतीला अधिक महत्त्व दिलं जातं. आताच्या काळात तर ते प्रकर्षानं दिसून आलं. भीती विकली जाते, हे वास्तव बनत चाललंय," असं निरीक्षणही प्रणव सखदेव यांनी नोंदवलं.
 
प्रिंट माध्यमांमधली कार्यशैलीही कशी बदलत आहे याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, प्रिंट माध्यमांमध्ये आता टेबल स्टोरीचं प्रमाण वाढलं आहे. बातमी मिळवण्यातली गंमत कमी झाली आहे.
 
प्रणव सखदेव यांनी मराठी माध्यमांमधील दोन सकारात्मक बाबींचा उल्लेखही केला.
 
"मराठी पत्रकारितेमध्ये एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे हिंदी मीडियाच्या तुलनेत मराठी माध्यमं समतोल आहेत.
 
"दुसरं म्हणजे मराठी वर्तमानपत्रांमधील पुरवण्या. आजही या पुरवण्यांनी दर्जा राखला आहे. अनेक चांगली सदरं त्यामाध्यमातून वाचायला मिळतात. सध्याच्या आर्थिक गणितात कदाचित पूर्वीप्रमाणे पुरवण्या बसवता येत नसतीलही, पण तरीही पुरवण्यांमध्ये आजही चांगले कॉलम वाचायला मिळतात," सखदेव यांना वाटतं.