शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2019 (15:47 IST)

भगतसिंह यांच्या जेल नोटबुकची कहाणी

भगतसिंह व त्यांच्या सुखदेव, राजगुरू या साथीदारांच्या शहीद दिनानिमित्त भगतसिंहच्या जेल डायरीची थोडक्यात माहिती या लेख मध्ये घेऊया. ही शाळेच्या वहीच्या आकाराची नोंदवही १२.०९.१९२९ रोजी जेल अधिकाऱ्यांकडून भगतसिंह यांना ‘भगतसिंह साठी ४०४ पानं’ असं लिहून देण्यात आली. या वहीत भगतसिंह यांनी जेल बंदी जीवनाच्या त्याकाळात वही मिळाल्यानंतर १०८ लेखकांच्या ४३ पुस्तकांतून घेतलेल्या टिप्पण आहेत. ज्यात कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगल्स आणि लेनिन प्रामुख्याने आहेत. इतिहास, दर्शनशास्त्र आणि अर्थशास्त्रावर त्यांनी अनेक टिपा घेतल्या आहेत. वसाहतवादाविरुद्ध संघर्ष या विषयबरोबरच त्यांचा लक्ष्य समाजाच्या विकासाशी संलग्न सामान्य प्रश्नांवर होता. त्यांनी पाश्चिमात्य विचारकांचा लेखन वाचण्याकडे बराच लक्ष्य दिला. भगतसिंह राष्ट्रवादी संन्कीर्णतेच्या पलीकडे जाऊन जागतिक अनुभवांतून आधुनिकतेच्या पद्धतीने प्रश्न सोडवल्या जाण्याचे बाजूचे होते. ही वैश्विक दृष्टी त्याकाळच्या महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर अश्या मोजक्याच नेत्यांमध्ये होती.
 
१९६८साली भारतीय इतिहासकार जी. देवल यांना भगतसिंहचे बंधू कुलबीर सिंह यांच्याकडे भगतसिंह यांच्या जेल नोंदवहीची मूळप्रत पहिली होती. त्यावरून त्यांनी टिपा घेऊन ‘पिपल्स पाथ’ नावाच्या एका पत्रिकेत भगतसिंह वर एक लेख लिहिले. या लेखात त्यांनी भगतसिंह यांच्या २०० पानी वहीचा उल्लेख केला होता. त्या लेख मध्ये जी. देवल यांनी ह्या वहीत भांडवलशाही, समाजवाद, राज्याची उत्पत्ती, मार्क्सवाद, साम्यवाद, धर्म, दर्शन, क्रांतींचा इतिहास आदी विषयांवर अनेक पुस्तके वाचून भगतसिंह यांनी टिप्पण काढल्याचे लिहिले होते. जी. देवल यांनी ही वही प्रकाशित करावी असे मत व्यक्त केले परंतु तसे काही झाले नाही. १९७७ साली रशियन विद्वान एल.व्ही. मित्रोखोव यांना या डायरीची माहिती मिळाल्यावर कुलबीर सिंह यांच्याकडून माहिती घेऊन एक लेख लिहिला ज्याचा समावेश पुढे त्यांच्या ‘लेनिन एंड इंडिया’ या पुस्तकात एक अध्याय म्हणून १८८१ वर्षी समाविष्ट केला. १९९० साली प्रगती प्रकाशन मास्को ने हेच पुस्तक ‘लेनिन और भारत’ म्हणून हिंदीत प्रकाशित केला.
 
दुसरीकडे गुरुकुल कांगडीचे त्यावेळचे कुलगुरू जी.बी.कुमार हूजा यांनी १९८१ साली दिल्ली जवळच्या तुकलगाबाद येथील गुरुकुल इंद्रप्रस्थच्या दौर्यावर गेले. अधिष्ठाता शक्तीवेश यांनी गुरुकुलच्या तळघरात ठेवलेले हे ऐतिहासिक दस्तऐवज दाखवले. या नोटबुकची एक प्रतिलिपी जी.बी.कुमार हूजा यांनी काही दिवसांसाठी मागून घेतली. काही दिवसांनी शक्तीवेश यांची हत्या झाल्याने ही प्रत त्यांना परत करता आली नाही. १९८९ मध्ये २३ मार्च शहादत दिनानिमित्त काही लोकांनी हिंदुस्तानी मंचाच्या काही बैठका झाल्या. त्या बैठकीसाठी जी.बी.कुमार हूजा गेले होते. तिथे त्यांनी या नोंदवहीची माहिती दिली. प्रभावित होऊन ‘हिंदुस्तानी मंच’ ने डायरी प्रकाशित करायचे निर्णय जाहीर केले. ‘इंडियन बुक क्रॉनिकल’ (जयपूर) पत्रिकेचे संपादक भूपेंद्र हुजा यांना ही जबाबदारी देण्यात आली आणि हिंदुस्तानी मंचाचे सरचिटणीस सरदार ओबेरॉय, प्रा.आर.पी. भटनागर आणि डॉ आर.सी. भारतीय यांना सहकार्य करण्याचे ठरवले. परंतु आर्थिक अडचणीमुळे ते छापले गेले नाही असे सांगितले जाते. ज्यात तथ्य वाटत नाही. त्यावेळच्या स्वस्ताईच्या काळात वर नमूद उच्च शिक्षित मध्यवर्गीय गृहस्थांना त्याच्या काही प्रती आर्थिक कारणाने छापून आणणे शक्य नव्हते असं होऊ शकत नाही. मुळात त्यांना त्याचा महत्व कमी वाटल्याने किंवा रस नसल्याने तसे झाले असावे.
 
याच दरम्यान डॉ. प्रकाश चतुर्वेदी यांनी मास्को अभिलेखागारातून एक टंकलिखित फोटोकॉपी घेऊन आणून डॉ आर.सी. भारतीय यांना दाखवली. मास्को तून आणलेली प्रत आणि गुरुकुल इंद्रप्रस्थच्या तळघरातून आणलेली हस्तलिखित प्रतिलिपी शब्दशः सारखी आढळून आली. काही महिन्यांनी १९९१ साली भूपेंद्र हूजा यांनी ‘इंडियन बुक क्रॉनिकल’ मध्ये या नोंद्वाहीचे अंश छापायला सुरुवात केली. या मासिक पत्रिकेतून पहिल्यांदा शहीद भगतसिंह यांची जेल नोटबुक वाचकांपर्यंत पोहोचली. याच्याच जोडीला प्रा. चमनलाल यांनी दिल्लीच्या नेहरू संग्रहालयात अशीच एक प्रतिलिपी त्यांनी देखील पाहिल्याचे हुजा यांना कळवले. वर्ष १९९४ साली पहिल्यांदा ही जेल नोंदवही ‘इंडियन बुक क्रॉनिकल’ कडून भूपेंद्र हूजा आणि जी.बी. हुजा यांनी लिहिलेल्या भूमिकेसह पुस्तक स्वरुपात प्रकाशित झाली. या दोघांना याची कल्पना देखील नव्हती कि या पुस्तकाची मूळ प्रत भगतसिंह यांचे भाऊ कुलबीर सिंह यांच्या कडे आहे. त्यांना जी.देवल यांचा लेख (१९६) आणि मित्रोखिन यांच्या पुस्काची (१९८१) देखील माहिती नव्हती.      
 
तिसरीकडे भगतसिंह यांच्या बहिण बिवी अमर कौर यांचे पुत्र डॉ. जगमोहन सिंह यांनी देखील या जेल नोंद्वाहीचा उल्लेख केला नाही. त्यांचे दुसरे भाऊ कुलतार सिंह यांच्या वीरेंद्र संधू या मुलीने देखील भगतसिंह यांच्यावर २ पुस्तके लिहिली त्यात देखील या नोंदवहीचा उल्लेख नाही. त्यावरून त्यांच्या कुटुंबियांना या वहीची माहिती नव्हती किंवा त्यात रस नव्हते अशी शक्यता वाटते. कुलबीर सिंह यांच्याकडे भगतसिंह यांची नोंदवही असून ही त्यांनी ते इतिहासकारांना दाखवून, पुस्तकाच्या स्वरुपात किंवा वृत्तपत्रात प्रकशित करण्याचे प्रयत्न केले नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी खालावलेली नव्हती कि त्यांना ते स्वतः छापून आणणे शक्य झाले नसते. भारतीय इतिहासकारांची अनास्था म्हणावी कि हा ऐतिहासिक दस्तऐवज रशियन लेखकाने सर्वप्रथम छापला. सत्तेवर सर्वाधिक काळ राहिलेल्या कॉंग्रेस पक्षाला स्वातंत्र्य इतिहासात भगतसिंह यांच्या कार्यात्मक व विचाधारात्मक योगदानाबद्दल उत्सुकता नव्हती. त्यांचे वैचारिक मतभेद हा कारण असल्याने त्यांनी भगतसिंह वर कधी संशोधन करण्यात लक्ष्य घातले नाही.
 
भगतसिंह शोध समिती स्थापन करून भगतसिंग यांचा भाचा डॉ. जगमोहन सिंह आणि जेएनयूच्या भारतीय भाषा केंद्राचे प्रा.चमनलाल यांनी ‘भगतसिंह और उनके साथियों के दस्तावेज’ नावाने भगतसिंह व त्यांच्या सहकार्यांचा साहित्य शोधून पहिल्यांदा १९८६ साली प्रकाशित केला. त्यात देखील या जेल नोटबुकची माहिती नव्हती. १९९१ साली प्रकाशित दुसर्या आवृत्तीत त्याचा उल्लेख करण्यात आला. सध्या या पुस्तकाची तिसरी आवृत्ती उपलब्ध असून त्यात बर्याच दुर्मिळ माहितीची भर टाकून ती पाठ्कांसमोर आणण्याचे अत्यंत मोलाचे काम त्या दोघांनी केले आहे.
 
भगतसिंह यांनी या वहीत घेतलेया नोंदी त्यांच्या दृष्टीकोन स्पष्ट करतात. स्वतान्त्र्याठी ते बेचैन होते म्हणून त्यांनी बायरन, व्हीटमॅन आणि वर्डसवर्थ यांचे स्वातंत्र्य विषयक विचार आपल्या वहीत उतरवले. इब्सनचे नाटक, फ्योदोर दोस्तोवस्की यांचा प्रख्यात ‘अपराध आणि दंड’ ही मोठी कादंबरी आणि ह्युगो यांचा ‘पददलित’ कादंबरी वाचली. चार्ल्स डिकन्स, मक्सिम गोर्की, जे एस मिल, वेरा फिग्नर, शार्लोट पर्किन्स गिलमन, चार्ल्स मैके, जॉर्ज डी हेरसन, ऑस्कर वाईल्ड, सिंक्लेयर यांच्या कथा कादंबर्या त्यांनी वाचल्या. जुलै १९३० मध्ये त्यांनी लेनिन यांची ‘दुसर्या इंटरनॅशनलचा पतन’, ‘डावा कम्युनिस्म: एक बालरोग’ क्रोपोत्कीन यांची परस्पर सहायता, कार्ल मार्क्स यांची ‘फ्रान्सचा गृहुयुद्ध’ ही पुस्तके बंदिवासात वाचून काढली. रशियन क्रांतिकारक वेरा फिग्नर व मोरोजोव यांच्या आयुष्यावर बेतलेल्या प्रसंगांच्या टिप्पण घेतल्या. त्यात उमर खय्याम यांच्या ओळी देखील आहेत. पुस्तकांसाठी त्यांनी जयदेव गुप्ता, भाऊ कुलबीर सिंह आदींकडून आग्रहाने पत्र लिहून मागवून घेतले.
 
आपल्या वहीत २१व्या पानावर त्यांनी अमेरिकन समाजवादी युजीन वि. डेब्स यांचा वाक्य, ‘जो वर खालचा वर्ग आहे, मी त्यात आहे, जो वर गुन्हेगारी तत्व आहेत, मी त्यात आहे, जो कोणी बंदिगृहात आहे, मी स्वतंत्र नाही.’ लिहिला आहे. त्यांनी रुसो, थॉमस जेफरसन, पॅट्रीक हेनरी यांचे स्वातंत्र्य संघर्ष व मानवाच्या जन्मसिद्ध अधिकारांवर टिपा काढल्या आहेत. लेखक मार्क ट्वेनचे प्रसिद्ध वाक्य, ‘आम्हाला लोकांचा शिरच्छेद किती भयानक हे शिकवला गेला आहे. पण सर्व लोकांवर आयुष्यभरासाठी लादली गेलेली गरिबी आणि हुकुमशाहीचं मरण हे त्याहून भयानक असतं हे शिकवला गेलेला नाही.’
 
भांडवलशाही समजून घेण्यसाठी भगतसिंह यांनी केलेली बरीच आकडेमोड या वहीत आहे. त्यावेळी ब्रिटेनच्या विषमतेवर त्यांनी नोंद घेतली आहे – ब्रिटेनच्या लोकसंख्येचा एक नऊवा भाग अर्धा उत्पादन ताब्यात घेतो आणि झालेल्या उत्पादनाचा फक्त ७वा (१४ टक्के) भाग दोन तृतीयांश (६६.६७ टक्के) लोकांच्या वाटेत येतो. अमेरिकेच्या १ टक्के श्रीमन्तान्कडे ६७ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे, व ७० टक्के लोकांकडे केवळ ४ टक्के मालमत्ता आहे. त्यानी रवींद्रनाथ टागोर यांचा वाक्य उद्धृत केला आहे ज्यात त्यांनी जपानी लोकांच्या पैशांसाठीच्या हव्यासाला ‘ मानवसमाजासाठी भयानक धोका’ म्हटलं आहे. मॉरिस हिल्क्विस्ट यांचे ‘मार्क्स ते लेनिन’ तून बुर्जुआ भांडवलशाही बद्दलचे संदर्भ आहेत. भगतसिंह नास्तिक असल्याने त्यांनी ‘धर्म – स्थापित व्यवस्थेचे समर्थक : ‘गुलामगिरी’ शीर्षकात नोंद केली आहे, ‘बायबलच्या जुन्या व नव्या धर्मग्रंथांमध्ये गुलामगिरीचे समर्थन करण्यात आले आहे, ईश्वराची सत्ता त्याची निंदा करत नाही.’ धर्माची उत्पत्तीची कारणं व त्याचे कांगावे समजून घेत असताना ते कार्ल मार्क्स कडे वळतात. ‘हेगेलच्या न्याय दर्शनच्या सामालोचानाचे प्रयत्न’ लिखाणातून धर्म विषयक मार्क्सचे विचार शीर्षकात ते लिहितात – ‘मनुष्य धर्माची रचना करतो, धर्म मानवाची रचना करत नाही. मनुष्य होण्याचा अर्थ म्हणजे मनवी जग, राज्य, समाज. राज्य व समाज मिळून धर्माचा एक विकृत विश्व्दृष्टीकोनाला जन्मी घालतात...’. भांडवलशाहीच्या उन्मुनासाठी शास्त्रीय समाजवादाच्या उभारणीसाठी त्यांचा कल सामाजिक सुधारणावादी दिसून येतो. कम्युनिस्ट पक्षाच्या जाहीरनाम्यातून त्यांनी काही उद्धरणे त्या वहीत आहेत. सर्वहारा गीत ‘इंटरनॅशनल’च्या ओळी त्यांनी वहीत लिहिल्या आहेत. फ्रेडरिक एंगल्स यांची रचना जर्मनीत क्रांती व प्रतिक्रांतीच्या उद्धरणातून त्यांनी त्यांच्या साथीदारांच्या क्रांतीविषयक उथळ संकल्पनांचा प्रतिवाद करताना दिसतात.    
 
धर्म, जात आणि गायीच्या नावावर देशात जे मॉब लीन्चिंग म्हणजे गर्दी कडून करण्यात येत असलेल्या हत्यांचे सत्र सुरु झाले आहेत त्यावर टी.पेन यांच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ पुस्तकातून त्यांनी उचलेले संदर्भ आजही लागू आहेत. वहीत लिहिले आहे, -‘ते हे त्याच सरकारांकडून शिकतात ज्यांच्या अंतर्गत ते जगत असतात. बदल्यात ते तीच शिक्षा देतात ज्याची त्यांना सवय झालेली असते.... जनमानसासमोर प्रदर्शित क्रूर दृश्यांचा प्रभाव संवेदनशीलता खतम करणे किंवा प्रतिशोध भडकावण्याच्या स्वरुपात केले जाते. विवेक ऐवजी दहशतीच्या माध्यमातून लोकांवर राज्य करण्याच्या ह्याच निकृष्ठ आणि खोट्या धारणांचा आधार घेऊन ते आपली प्रतिमा निर्मित करतात.’
 
‘प्राकृतिक आणि नागरिक अधिकार’ संदर्भात त्यांनी नोंद केली, ‘माणसाचे प्राकृतिक अधिकारच सर्व नागरिकांच्या अधिकारांचा आधार आहेत.’ जपानी बौद्ध भिक्षु कोको होशीचे वाक्य त्यांनी नोंदले, - शासकासाठी हेच योग्य आहे कि कोणताही माणूस थंडी व भुकेने व्याकूळ राहू नये. जेव्हा माणसाकडे जगण्याचा साधारण साधन देखील राहत नाही तेव्हा तो नैतिक स्तर राखू शकत नाही.’ ‘समाजवादाचा लक्ष्य  -क्रांती’, विश्व्क्रांतीचा लक्ष्य, सामाजिक एक्य आदी अनेक विषयांवर त्यांनी लेखकांचे संदर्भ दिले आहेत.
 
भगतसिंहच्या सहकार्यांनी नमूद केले आहे कि भगतसिंह यांनी जेलमध्ये असताना ४ पुस्तकं लिहिलीत. त्यांचा नाव १. आत्मकथा, २. भारतात क्रांतिकारी आंदोलने, ३.समाजवादाचे आदर्श, ४.मृत्युच्या दारावर अस आहे. ती पुस्तकं जेलच्या बाहेर गेल्यावर इंग्रजांच्या कारवाईच्या भीतीने नष्ट करण्यात आली. भगतसिंह यांच्या दृष्टीकोन भविष्यात स्वातंत्र्यानंतर जातीवाद, सांप्रदायिकता, असमानता मुक्त न्यायपूर्ण समाजवादी भारताच्या निर्माणाचा होता. भगतसिंहचे लिखाण त्यांचे लेख याची दिशा दाखवतात. जेल नोटबुक त्यांच्या गहन अध्ययनाचा पुरावा आहे. शहीद दिनानिमित्त नोटबुक प्रसंग माहिती असावा म्हणून हा लेख. 
 
कल्पना पांडे (सदस्य, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना)