'मराठीच्या मृ्त्यूची भीती शहरी मंडळींना'
मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे, अशी भीती गेल्या अनेक वर्षांपासून वाटते आहे. पण हे फक्त शहरी लोकांना वाटते आहे. कारण शहरात मराठीचं स्वतंत्र रूप नाहीसं होतं आहे. इंग्रजीच्या अतिवापराने ती भ्रष्ट होते आहे. मात्र, खेड्यात मराठी मूळ आणि शुद्ध स्वरूपात टिकून आहे. त्यामुळे मराठी टिकून राहील का ही भीती शहरांत वाटते. खेड्यात तसे अजिबात चित्र नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांनी केले. कुसुमाग्रजांची जयंती 'मराठी दिन' म्हणून साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शेवाळकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वरील मत मांडले. महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढताहेत. त्याचवेळी मराठी शाळा मात्र बंद पडत आहेत. या मुद्याकडे लक्ष वेधले असता, शेवाळकर म्हणाले, की इंग्रजी शिकण्याची धडपड सध्या शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आहे. ही प्रतिष्ठेची धडपड आहे. नोकरी मिळविण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे, या भावनेतून इंग्रजीत शिक्षण घेण्याचा प्रकार वाढत चालला आहे. थोडक्यात काय तर इंग्रजी हे चांगली नोकरी व पर्यायाने उच्च रहाणीमान मिळविण्याचे साधन आहे. नोकरी मिळवून देण्यात मराठीला मर्यादा आहेत, हे खरे. पण केवळ त्यामुळे इंग्रजी स्वीकारून मराठीला लाथाडणे योग्य नव्हे. प्रसारमाध्यमातून होणार्या बेसुमार इंग्रजीच्या वापराबद्दलही शेवाळकरांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मराठी भ्रष्ट होते आहे, हे सांगून दूरचित्रवाणीवरून ऐकविल्या जाणार्या मराठीवरही आक्षेप घ्यायला पाहिजे असे मत व्यक्त केले. मराठी भाषा समृद्धीसाठी राज्य सरकारनेही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असताना हे सरकार पहिलीपासून इंग्रजी शिकवायला सुरवात करत असेल तर त्यापुढे काय बोलणार या शब्दांत प्रा. शेवाळकरांनी आपली खंत व्यक्त केली. ज्यांचा जयंतीदिन मराठी दिन म्हणून साजरा केला जातो, त्या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या आठवणीही शेवाळकरांनी जागवल्या. नाशिकमधील कुसुमाग्रजांचे घर म्हणजे तीर्थक्षेत्र होते. ते समाजशील साहित्यिक होते. समाजाविषयी त्यांना खूपच ममत्व होते. म्हणूनच साहित्याशी संबंध असलेल्या आणि नसलेल्या लोकांचा त्यांच्या घरी कायम राबता असे.