सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2019 (16:11 IST)

पबजीसारख्या मोबाईल खेळाचे करायचे काय?

दक्षिण कोरियामधील शाळकरी विद्यार्थी आणि तरूण स्मार्टफोनच्या इतके आहारी गेले आहे की तेथील सरकारने शाळेमध्ये स्मार्टफोन कौन्सिलिंग सेंटर उघडले आहे.
 
तेथील प्रत्येक शाळेत सायकॉलॉजिस्टची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे समुपदेशन चालू आहे.
 
हीच परिस्थिती भारतामध्ये येण्याच्या स्थितीमध्ये आहे. नुकतेच नाशिकमध्ये एक अल्पवयीन मुलगा पबजी मोबाइल गेम खेळत होता. तो त्या गेम मध्ये इतका गुंगून गेला होता की आईने मोबाईल हातातून काढून घेतल्यावर त्याने रागाच्या भरात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
 
प्रश्न हा आहे की पबजी सारखा गेम ने विद्यार्थी या टोकाला का जातात?
खरंतर पबजी सारखे गेम हे हिंसात्मक असतात. पबजी गेम मधे १०० खेळाडू एका बेटावर शस्त्र वापरून इतरांशी लढाई करतात.. एकमेकांना मारून स्वतःला वाचवायचे असते. जो जिवंत राहील तो जिंकला..
यासारख्या गेम ने विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये सातत्याने दुसऱ्यांना मारण्याचे प्रोग्रामिंग होते. आपला मेंदू कॉम्प्युटर सारखाच काम करत असतो. त्याला जे प्रोग्रामिंग करू तसेच तो वागतो.
 
पालकांनो, मला सांगा तुम्ही एखाद्या अनोळखी माणसाला घरात बोलून सांगाल का की माझ्या मुलाला मर्डर कसा करायचा? रेप कसा करायचा? हे शिकव. नाही ना.. पण तुम्ही ते शिकवताय. 
 
मोबाईल वरील गेम मुलांना वाईट मूल्य जास्त शिकवतो. भरपूर वेळा मोबाईल गेम मधील अनियमित ड्रायव्हिंग, करकचून ब्रेक दाबणे, अतिवेगाने गाडी चालवणे, गोळ्या मारणे, मालमत्तेचे नुकसान करणे या प्रकारच्या दृश्यात (गेम मधे) जखमा, मरणे हे अधिक असते व त्याबद्दल शिक्षा दाखवली जात नाही.
 
एका घरामध्ये एक वयस्कर आजी रात्री झोपेमध्ये मरण पावली. दुसऱ्या दिवशी त्या घरातील एक लहान मुलगा विचारतो की Who killed Grandma?
माणसाचे आयुष्य हे नैसर्गिकरीत्या संपू शकते हे त्या लहान मुलाला माहितीच नव्हते. तो गेम मध्ये सातत्याने बंदुकीने गोळ्या मारून ठार करत असतो. त्याची ही धारणा पक्की झाली होती की, मरण हे कोणाची गोळी लागूनच होत असते.
 
जे सातत्याने स्मार्टफोनवर व्हिडिओ गेम खेळतात तेव्हा मेंदूमध्ये एक प्रकारचे केमिकल वाहते. ते केमिकल वाहू लागले की मेंदूला प्लेझर आनंद मिळतो व हे प्लेजर सातत्याने मिळावे म्हणून तो अधिकाअधिक त्या गेम मध्ये आडकतो.
 
जेव्हा एखादा तरुण ड्रक्स हीरोइन घेतात तेव्हा सुरुवातीला त्याला जे प्लेझर मिळते त्याच प्रकारचे प्लेझर व्हिडिओ गेम मध्ये मिळते व तसे मिळालं नाही तर तो तरुण वेडीपिसा होतो.. हिंसक होतो.. त्याच्या वर्तणुकीत बदल होत जातो. तसेच व्हिडिओ गेम खेळायला मिळाले नाही तर विद्यार्थ्यांचे सुद्धा असेच होते आणि एक वेळ अशी येते की ते संपूर्ण त्याच्या आहारी गेलेले असतात.
 
मग त्यांना यापासून कोणी थांबवायचा प्रयत्न केला तर समोरच्या ला तरी मारतात किंवा रागात स्वतःचे आयुष्य तरी संपवतात जसे नाशिक मधील विद्यार्थ्यांनी केले.
 
आजकाल शाळेतील विद्यार्थ्यांची मारामारीसुद्धा खूप वाढली आहे. एकमेकांना ते असे हावभाव करून मारतात की संवेदनशील शिक्षकांना ते बघवत सुद्धा नाही. मोबाईल गेम ला आहारी गेलेले मुलांचा गेम सोडून दुसरे कडे कुठेही एकाग्रता होत नाही. ते 15 मिनिटांपेक्षा जास्त एका ठिकाणी शांत बसू शकत नाही. त्यांच्यात संवाद कौशल्य विकसित होत नाही. नेहमी भांडण, चिडचिड, रडणे यासारखे व्यक्तिमत्व बनते.
मुळात असे व्यक्तिमत्व का बनते?
त्याचे मूळ कारण संस्कार.. मग संस्कार म्हणजे काय? तर..जसं झाडाची मुळे जमिनीतील पाणी शोषून घेतात तसं त्या मुलांच्या आयुष्यात जे जे लोक जास्त वेळ देतात, त्यांच वागणं बोलणं मुलांचं मन शोषून घेतं.. जसे झाडाची मुळे जमिनीतील पाणी शोषून घेतात. 
म्हणजे आपलं वागणं हेच संस्कार आहे. याचाच दूसरा अर्थ मुलांच्या आयुष्यात जे जे लोक येतात त्यांचं वागणं म्हणजे संस्कार. 
 
संस्कार चांगले आणि वाईट दोन्ही असतात. आता मुलांच्या आयुष्यात जास्त वेळ देणारे कोण??
१) आई वडील, २) शिक्षक आणि ३) मोबाईल किंवा टीव्ही किंवा व्हिडिओ गेम. म्हणजे मुलांचे पालक तीन आहेत. यातील सर्वात जास्त वेळ कोण देतं.. त्याचे संस्कार अधिक.. दुर्दैवाने मोबाईल गेम, टीव्ही, फेसबुक हे जास्त वेळ मुलांच्या सनिध्यात असतात. 
एका सर्वे नुसार प्रायमरी पासून १८ वर्षापर्यंत एखादा विद्यार्थी जेवढा वेळ शाळेत घालवतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ तो किंवा ती विद्यार्थी स्मार्टफोन, मोबाइल, टीव्ही (ज्याला स्क्रीन टाईम म्हणतात) वर घालवतात.
 
आता या सर्वातून मुलांना वाचवायचे असेल तर पालकांनी जागृत राहून मुलांना मोबाईलवर कुठलीही गेम खेळायची सवय लावू नये. या बाबत हट्ट पुरवून नये.
 
ते मोबाईलवर काय पाहतात.. काय खेळतात.. हे डोळ्यात अंजन घालून लक्ष ठेवावे.
 
शक्यतो विद्यार्थ्यांना अठरा वर्ष होईपर्यंत स्मार्टफोन देऊ नये. 
 
स्मार्टफोन दिला असेल तर त्याचा वापर आणि नियंत्रण पालकांच्या देखरेखीखाली आणि कडक शिस्तीमध्ये ठेवावे.
 
मुलांना भरपूर मैदानावर खेळू द्यावे विविध ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवून ठेवावे विविध अनुभवांचे विश्व त्यांच्यासमोर सादर करावे जेणेकरून मोबाईलच्या खेळाकडे ते आकर्षित होणार नाही.
 
खर तर यावर रामबाण उपाय एवढाच आहे की आपल्या पाल्याला स्क्रीन टाईम कमीत कमी कसा राहील याकडे याबाबत दक्ष राहवे नाहीतर पबजी सारखे गेम मुलांना आयुष्यातून उठून काढतील.
 
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक