रोज 7 तासांची झोप हृदयाला ठेवते तरुण
दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला विश्रांतीची नितांत गरज असते. हीच विश्रांती झोपेच्या माध्यमातून मिळत असते. म्हणजेच शरीर आरोग्यदायी ठेवण्यात झोपेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असते; पण काही लोक रोज प्रमाणापेक्षा जास्त, तर काही जण कमी झोप घेत असतात. याचा परिणाम मात्र त्यांच्या आरोग्यावर होत असतो.
यासाठी आवश्यक तेवढीच झोप घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात. या तज्ज्ञांच्या ते, रोज सात तास झोप घेणार्या लोकांचे हृदय एकतर तरुण राहतेच, शिवाय यामुळे हृदयासंबंधीच्या आजारांचा धोकाही कमी असतो. रोज सात तासांपेक्षा कमी अथवा जास्त झोप, याचा थेट संबंध हृदयाच्या तारुण्याशी येतो. जो कोणी रोज सात तासांपेक्षा कमी झोप घेतो, त्याचे हृदय वृद्धत्वाकडे असल्याचे दिसून आले. झोपेचा कालावधी, हृदयाचे आयुष्य याचा मिलाफ करून हृदयासंबंधीचे आजार, झोपेच्या अवधीचे फायदे व तोटे याचे विश्लेषण या संशोधनात करण्यात आले आहे.
अमेरिकेतील जॉर्जियामधील 'इमोरी युनिव्हर्सिटी'तील ज्यूलिया दूरमर यांनी सांगितले की, संशोधनात काढण्यात आलेले निष्कर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. 'स्लिप' या पत्रिकेत प्रसिद्ध झालेले हे संशोधन 12,775 वयस्क लोकांवर करण्यात आले आहे. संशोधनात सहभागी झालेले हे लोक 30 ते 74 वर्षे या वयोगटातील होते.