मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : रविवार, 28 ऑगस्ट 2022 (10:11 IST)

प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्यानं कॅन्सर होऊ शकतो का?

water
खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकमुळे आरोग्याची हानी होते, असे दावे नेहमीच केले जातात. काही दिवसांपूर्वी एक ई-मेल व्हायरल झाला. प्लास्टिकच्या बाटल्या उन्हात ठेवल्यावर त्यातून पाण्यात विरघळू शकतात, अशी रसायने बाहेर पडतात आणि शरीरात पोहोचतात. यामुळे कर्करोग होऊ शकतो. असा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला.
 
या ईमेलमध्ये एका विद्यापीठाच्या शोधनिबंधाचा अनेक वेळा उल्लेख करण्यात आला आहे. पण हा ई-मेल खोटा आहे.
 
बिस्फेनॉल-ए बद्दल थोडी चिंता
बिस्फेनॉल-ए (बीपीए) नावाच्या रसायनाबद्दल काही वैज्ञानिक चिंता व्यक्त करत आले आहेत.
 
बीपीए हे पॉली कार्बोनेट कंटेनर, जेवणाच्या डब्याचं अस्तर, तसंच पावत्या आणि स्टॅम्पमध्ये वापरल्या जाणार्‍या कागदामध्ये आढळून येतं.
 
बीपीए एका स्त्री संप्रेरकाप्रमाणे त्याचा परिणाम दाखवून नुकसान करू शकतं, असा दावा केला जातो. असं असलं तरी यामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात, हे अद्याप सिद्ध झालेलं नाहीये.
 
पण ही रसायनं धोकादायक असू शकतात, याचा पुरावा आहे का?
 
अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, बीपीए जास्त प्रमाणात सेवन केलं तर त्याचा लहान उंदरांना त्रास होऊ शकतो.
 
पण माणूस हा बीपीएसारखी रसायनं वेगळ्या पद्धतीने पचवतो. आपल्या शरीरात दररोज किती प्रमाणात बीपीए जातं आणि त्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं का, याचा कोणताही भक्कम पुरावा सध्या उपलब्ध नाही.
 
वर्षानुवर्षं बीपीएचा वापर पॅकेजिंगच्या कामात केला जात आहे. विकसित देशांमध्ये बहुतेक प्रौढांच्या मूत्रात बीपीए आढळतं, असं एका अभ्यासात समोर आलं आहे.
 
प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये बीपीए न वापरल्यास त्याचे धोके टाळता येऊ शकतात. बहुतेक प्लास्टिकवर एक आकडा छापलेला असतो, ज्यावरून त्यामध्ये बीपीए आहे की नाही हे शोधता येतं.
 
बीपीए कसं शोधायचं?
हे आकडे एका त्रिकोणी चिन्हामध्ये (♲) नोंदवलेले असतात जातात. 1, 2, 4 किंवा 5 म्हणजे ते 'बीपीएमुक्त' प्लास्टिक आहे.
 
तर 3 किंवा 7 म्हणजे प्लास्टिकमध्ये बीपीए असू शकतं. तुम्ही प्लास्टिक गरम केल्यास किंवा त्यावर डिटर्जंट टाकल्यास त्यातून बीपीए निघू शकतं. प्लास्टिकवर 6 हा आकडा असल्यास ते पॉलीस्टाइनिन बनलेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो.
 
युरोपियन युनियनमध्ये मुलांच्या बाटल्या आणि खेळण्यांसाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक 'बीपीएमुक्त' असणं आवश्यक आहे.
 
असं असलं तरी अन्नाच्या डब्ब्यांचं अस्तर आणि पावत्यांमध्ये अजूनही बीपीए आढळतं. त्यामुळे सामान्य जीवनात बीपीएचा वापर टाळणं जवळजवळ अशक्य आहे.