शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 28 एप्रिल 2022 (18:28 IST)

उष्णता लाट भारत : यंदा ऊन जरा जास्तच आहे का?

"आज ऊन जरा जास्तच आहे." यंदाच्या उन्हाळ्यात तर प्रत्येकाच्या तोंडी हेच वाक्य आहे. खरं तर दरवर्षी कुणी ना कुणी वाढत्या उन्हाविषयी तक्रारींचा पाढा वाचताना दिसतो. पण यंदा हे वाक्य जरा जास्तच लोकांच्या कानी पडत आहे.
 
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदीही असं बोलण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. बुधवारी (27 एप्रिल) नरेंद्र मोदी यांची देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक झाली. या बैठकीत मोदी म्हणाले, देशातलं तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढू लागलं आहे."
 
याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, भारतात आलेली उष्णतेची लाट. देशातील सर्वच भागांमध्ये नागरिकांना यंदा उन्हाची झळ बसत आहे. वाढलेल्या उन्हामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे.
 
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशात तापमानवाढीचं हे सत्र येत्या आठवडाभर सुरू राहणार आहे. विशेषतः देशाच्या वायव्य आणि मध्य भागात ही तापमान वाढ प्रकर्षाने जाणवेल. तापमानात 2 ते 4 अंश सेल्सियसची तापमान यादरम्यान जाणवेल. आगामी काही दिवस हीच स्थिती कायम राहील, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.
 
भारतात उष्णतेची लाट ही सामान्य बाब आहे. दरवर्षी मे-जूनदरम्यान भारतात तापमानवाढ दिसून येते. मार्च महिन्यापासूनच उन्हाच्या झळा बसण्यास सुरू होतात.
 
मात्र यंदाचा मार्च महिना उन्हाच्या बाबतीत विक्रमी ठरला. गेल्या 122 वर्षांमधील तापमानाचा उच्चांक यंदाच्या वर्षी देशाने गाठला.
 
द सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरनमेंट या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने देशात तब्बल 15 राज्यांना उन्हाची झळ बसली. महत्त्वाची बाब म्हणजे थंड हवामानासाठी ओळखलं जाणारं हिमाचल प्रदेश हे राज्यही या यादीत होतं.
 
गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीचा पारा 44 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याचं नोंदवण्यात आलं.
 
भारतीय हवामान विभागात वरीष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम पाहणारे नरेश कुमार यांनी याविषयी अधिक माहिती दिली.
 
त्यांच्या मते, "उष्णतेची लाट येण्याचं कारण म्हणजे वातावरणात अचानक झालेला बदल होय. यामध्ये प्रमुख कारण कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्स.
 
भूमध्य क्षेत्रात निर्माण होणाऱ्या वादळांमुळे वायव्य तसंच मध्य भारतात पाऊस पडत असतो. पण कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हा पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे मार्च महिन्यात उष्ण आणि कोरडं वातावरण निर्माण झालं आहे."
 
या बदलाचे परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे पीकावरही त्याचा परिणाम झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. या सगळ्याचा पुरवठा साखळीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
उष्णतेत वाढ झाल्यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. परिणामी काही राज्यांमध्ये वीज आणि कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याचं दिसून येतं.
 
उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी भारतात अनेक उपाय केले जातात. मातीच्या डेऱ्यात पाणी साठवणं. शरिरावर कैरीचा लेप लावणं अशा गोष्टी ग्रामीण भागात केल्या जातात.
 
भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेत हवामान शास्त्रज्ञ म्हणून काम पाहणारे रॉक्सी मॅथ्यू कोल म्हणतात, "भारतात उष्णतेची लाट येण्याची अनेक कारणे आहेत. पण या सगळ्यांचं मूळ कारण ग्लोबल वॉर्मिंग हेच आहे. या विषयाबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे."
 
इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेट चेंज स्टडीजचे डी. शिवानंद पै यांच्या मते, हवामान बदलासोबतच लोकसंख्या वाढ आणि त्यामुळे संसाधनांवर पडणारा अतिरिक्त ताण हे यामागचं कारण मानलं जाऊ शकतं.
 
या कारणांमुळे जंगलतोड, वाढतं दळणवळण, नागरीकरण यांच्यात वाढ होऊ लागली आहे, असं ते सांगतात.
 
ते म्हणतात, "आपल्याकडे सर्वत्र काँक्रीटचे रस्ते तयार झाले आहेत. त्यामुळे उष्णता शोषून घेतली न जाता पृष्ठभागावरच अडकून राहते. यामुळे हवाही गरम होते."
 
वातावरणात उष्णता वाढल्याचा फटका सर्वाधिक कुणाला बसत असेल तर ते म्हणजे गरिबांना. याविषयी बोलताना इंडियन इन्स्टीट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट अँड इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजमध्ये वरीष्ठ संशोधक म्हणून काम करणाऱ्या डॉ. चांदनी सिंह यांच्याशी बीबीसीने चर्चा केली.
 
त्या म्हणतात, "गरिबांकडे उष्णतेविरोधात लढा देण्यासाठी खूपच कमी संसाधने असतात. उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्याचं गंभीर नुकसान होऊ शकतं. त्यातही त्याचा परिणाम गरिबांना जास्त दिसून येतो. प्रशासनाने हवामानात होणाऱ्या तीव्र बदलांमुळे लोकांच्या आयुष्य कसं बदलतं, याकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे."
 
त्या पुढे सांगतात, "रात्रीच्या वेळीही तापमान जास्तच असेल तर शरीर ते सहन करू शकत नाही. यातून आजारपण आणि मग हॉस्पिटलचा अतिरिक्त खर्च या समस्या पुढे उभ्या होतात."
 
कोल यांच्या मते, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी दूरगामी दृष्टीकोन ठेवणं गरजेचं आहे.
 
ते म्हणतात, भारतात अशीही काही ठिकाणे आहेत, जिथे उष्णता जास्त नाही. पण हवामानातील आर्द्रतेमुळे इथलं आयुष्य कठीण आहे. याठिकाणी उष्णतेची लाट आणि आर्द्रता यांचा एकत्रित परिणाम कसा होतो, हे तपासणंही गरजेचं आहे."
 
याशिवाय प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असलेल्या ठिकाणांकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.
 
ते पुढे सांगतात, "भारतात ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला एखादं छप्पर टाकून, झाडाखाली कित्येक शाळा चालतात. अशा उन्हात याठिकाणी शिक्षण घेणं अतिशय अवघड आहे."
 
2015 पासून देशातील केंद्र आणि राज्य सरकारांनी उष्णतेच्या लाटेचे परिणाम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उदा. उष्णतेच्या वेळांमध्ये बाहेर काम करण्यावर आळा घालणे इ.
 
परंतु कामगार कायद्यात योग्य प्रकारे बदल करून त्याची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने झाली, तरच हे शक्य होणार आहे, असं डॉ. सिंग यांना वाटतं.
 
याशिवाय डॉ. सिंग यांनी इतर काही मुद्द्यांकडेही लक्ष वेधलं. त्या म्हणतात, "आपल्या देशात इमारतींचं बांधकाम करताना उष्णता आतमध्येच अडकून राहील, अशा पद्धतीने केलं जातं. ही पद्धत बदलायला हवी. घरांमध्ये हवा खेळती राहावी, याला पहिलं प्राधान्य असावं. जगभरात याबाबत विविध संशोधन होत आहे, त्यांचा विचार आपल्यालाही करता येऊ शकतो."
 
त्या पुढे म्हणतात, "आपण काही गोष्टी योग्य करत आहोत. पण काही गोष्टींच्या बाबतीत एक पाऊल पुढे जाऊन विचार करणं आवश्यक आहे. कारण आगामी काळात उष्णतेसोबत जगणं आपल्याला शिकून घ्यावं लागणार आहे."