रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (08:49 IST)

सूर्यप्रकाशामुळे आपल्या आरोग्याला 'हे' 4 अत्यंत महत्त्वाचे फायदे

निरभ्र आकाश आणि प्रसन्न सूर्यप्रकाश हे समीकरण अनेकांचं आरोग्य उत्तम करतं. आपल्या आयुष्यात प्रकाशाची नेमकी भूमिका काय आहे? आपल्या हाडांसाठी आणि मेंदूसाठी प्रकाश किती आवश्यक असतो?
 
प्रकाश आणि शरीरचक्राचं गणित
आपल्या शरीरात 24 तासांचं जैवचक्र असतं. पृथ्वीला स्वत:भोवती फिरण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यानुसार जैवचक्राचं काम चालतं. या शरीरचक्राचा आणि आपल्या शरीरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा संबंध असतो. आपण काय खातो, कधी झोपतो, संप्रेरकांची निर्मिती या सगळ्याचा आणि शरीरचक्राचा घनिष्ट संबंध असतो.
 
बंदिस्त ठिकाणी राहणाऱ्या माणसांचं शरीरचक्र व्यवस्थित कार्यरत राहतं. मात्र आपलं शरीर प्रकाशाला त्वरित प्रतिसाद देतं. प्रकाशाच्या आगमनासह आपल्या शरीरातली अनेक कार्य सुरू होतात.
 
1) प्रकाशामुळे झोप लागते, जागे होतो आपण
प्रकाशामुळे आपल्या शरीरात झोपेची प्रक्रिया सुरू होते. प्रकाशामुळे आपल्या मेंदूत जागं राहण्यासाठीची केंद्र सक्रिय राहतात. प्रकाश कमी झाला किंवा अंधार झाला की आपल्या शरीरात मेलाटोनिन नावाचं रसायन स्रवतं.
काही एअरलाईन्स कंपन्या जेट लॅग टाळण्यासाठी केबिन लायटिंगचा उपयोग करत आहेत. बोर्डिंगवेळी प्रखर प्रकाश, जेवणादरम्यान दिवे मंदावले जातात. सूर्यास्ताचा भास निर्माण करतील अशी प्रकाशयोजना प्रवासी झोपताना केली जाते. जेणेकरून त्यांना सहज झोप लागू शकेल.
 
2) प्रकाश निद्रानाश टाळू शकतो
आपण रात्री झोपण्याआधी स्मार्टफोन वापरत असतो. काहीजण लॅपटॉप किंवा टॅब्लेट वापरतात. या उपकरणांमधून निळा प्रकाश बाहेर पडत असतो. या प्रकाशामुळे शरीरात झोपेसाठी तयार होणारं संप्रेरक स्रवत नाही. त्यामुळे मेंदूकडून झोपेसाठी आज्ञा दिली जात नाही. युकेतील वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार आपण झोपण्यापूर्वी काही तास गॅझेटविरहित राहायला हवं.

याव्यतिरिक्त बेडरूममध्ये गॅझेट्स नसणं आणखी फायदशीर ठरू शकतं. एलईडी प्रकाश झोप लागण्यासाठी पूरक ठरू शकतो मात्र न्यूरोसायंटिस्ट मॅथ्यू वॉकर प्रकाशाचं आणि झोपेचं नातं समजावून सांगतात. दिवसा मिळणारा प्रकाश आपल्या झोपेचं गणित ठरवतो. तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल, तर तुम्ही सकाळच्या वेळी तासभर सूर्यप्रकाशात काढला तर तुमच्या मेंदूला योग्यवेळी झोपेचं समीकरण उलगडेल. सकाळच्या वेळी पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला असेल तर रात्री झोपल्यावर लगेच झोप येते.
 
3) प्रकाश मूड बदलवतो
नैसर्गिक प्रकाश आपला स्वभाव पालटवू शकतो. प्रकाशाची वारंवारता आपल्याला आनंदी करू शकते. जेव्हा आपलं शरीर प्रकाशाला सामोरं जातं तेव्हा मज्जासंस्थेच्या माध्यमातून मेंदूला सूचना मिळते. त्यावेळी मेंदूत सेरॅटॉनिन हे संप्रेरक स्रवतं. या संप्रेरकामुळे आनंदलहरी उमटतात. तसंच जी माणसं शिफ्टमध्ये काम करतात, त्यांचा प्रकाशाशी संपर्क मर्यादित राहतो. त्यामुळे त्यांना नैराश्याचा त्रास होऊ शकतो.

थंडीत दिवस छोटा होत जातो त्यावेळी शरीराला नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळण्याचं प्रमाण कमी होत जातं. त्यावेळी सीझनल अफेटिक्व्ह डिसऑर्डर अर्थात SAD हा आजार होऊ शकतो. हा आजार म्हणजे आपलं शरीरचक्र विस्कळीत होणं. थेट सूर्यप्रकाश मिळण्याचं प्रमाण कमी झाल्याने या आजाराची शक्यता बळावते.
 
हा आजार तुम्हाला झाला असेल तर SAD लॅम्प मिळतो. या मशीनद्वारे नैसर्गिक प्रकाशाशी साधर्म्य साधणारा प्रकाश बाहेर सोडला जातो. अर्धा तास सकाळी लख्ख सूर्यप्रकाशात काढला तर हा आजार होण्याची शक्यता कमी होते.
 
4) सूर्यप्रकाश आपली हाडं बळकट करतो
कॅल्शिअम आणि फॉस्फेट ग्रहण करण्यासाठी आपल्या शरीराला 'ड' जीवनसत्वाची आवश्यकता असते. निरोगी हाडं, दात आणि स्नायूंसाठी महत्वपूर्ण असलेली प्रथिनं.

'ड' जीवनसत्वाची कमतरता असेल तर हाडं ठिसूळ आणि कमकुवत होऊ शकतात. ड जीवनसत्वाचा सगळ्यात मोठा स्रोत सूर्यप्रकाश आहे. म्हणूनच या जीवनसत्वाला सनशाईन जीवनसत्व असंही म्हणतात. आश्चर्य म्हणजे शरीराला सूर्यप्रकाश मिळाला की 'ड' जीवनसत्वाची निर्मिती होते. म्हणूनच थोडा वेळ सूर्यप्रकाशात उभं राहिलं तरी पुरेसं होतं. मात्र अति सूर्यप्रकाश घातक ठरू शकतो. सनस्क्रीन लावायला विसरू नका आणि टळटळीत उन्हात जाणं टाळा.