शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (10:11 IST)

National Cancer Awareness Day : लस घेतल्याने कमी होतो ‘या’ कॅन्सरचा धोका

मयांक भागवत
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे Cervical Cancer. जगभरात स्त्रियांमध्ये सामान्यत: हा कॅन्सर चौथ्या क्रमांकावर आढळून येतो.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे दरवर्षी 3 लाखांपेक्षा जास्त महिलांचा मृत्यू होतो. यातील 85 टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये होतात.
 
तज्ज्ञ सांगतात, Cervical Cancer चा धोका कमी करण्यासाठी 'लस' उपलब्ध आहे. पण लोकांमध्ये या लशीबाबत जनजागृती नाही. अनेक महिलांना लस घेतल्याने 'Cervical Cancer' टाळता येणं शक्य आहे याची माहितीच नाही.
 
कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी 7 नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक कॅन्सर जनजागृती दिन' म्हणून साजरा केला जातो. आज आपण तज्ज्ञांकडून गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि त्याचा धोका कमी करण्यासाठी उपलब्ध लस याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
 
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे काय?
गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे 'Cervix' (सर्व्हिक्स) किंवा ग्रीवा.
 
हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. स्त्रीयांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो.
मुंबईतील झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वीणा औरंगाबादवाला म्हणतात, "भारतातील लाखो महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर काय आहे याची माहिती नाही."
 
गर्भाशयाच्या मुखाशी असलेल्या पेशींमध्ये अचानक होणारी वाढ Cervical Cancer साठी कारणीभूत ठरते.
 
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याची कारणं?
डॉ. राजश्री कटके मुंबईतील सर जे.जे रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्राध्यापक आहेत. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याची तीन कारणं त्या सांगतात.
 
'Human papillomavirus' चा संसर्ग
अनुवंशिक किंवा जेनेटिक कारणं
योगीमार्गाची स्वच्छता नसणं
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे 'Human papillomavirus' (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस).
लैंगिक संबंधातून झालेल्या संसर्गामुळे हा व्हायरस परसतो ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, लैंगिक दृष्ट्या अति-सक्रिय असणाऱ्या स्त्रिया आणि पुरुषांना त्यांच्या आयुष्यात एकदातरी या व्हायरसचं संक्रमण होतं.
 
डॉ कटके पुढे सांगतात, "Human papillomavirus चे अनेक स्ट्रेन असतात. यातील काही स्ट्रेन घातक आहेत. याचा संसर्ग झाल्यास गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते." पण 'Human papillomavirus' चा संसर्ग झालेल्या प्रत्येकालाच कॅन्सर होत नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनाच त्रास होण्याची शक्यता असते.
 
"गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्यासाठी Human papillomavirus चे स्ट्रेन (प्रकार) 6, 11, 16 आणि 18 प्रामुख्याने कारणीभूत आहेत," डॉ. वीणा पुढे सांगतात.
 
गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची लक्षणं कोणती?
गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणं सुरूवातीला काहीच दिसून येत नाहीत.
 
डॉ. वीणा औरंगाबादवाला म्हणतात, "गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर हा अत्यंत हळूवार पद्धतीने वाढणारा कॅन्सर आहे.
 
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची खालील लक्षणं सामान्यत: आढळून येतात,
 
मासिकपाळीच्या दिवसात अति-रक्तस्राव होणं
पाळी वारंवार येणं
लैंगिक संबंध ठेवल्यानंतर होणारा रक्तस्राव
योनीमार्गातून सतत निघणारा पांढरा द्रव (याला White Discharge म्हणतात)
योगीमार्गातून निघणाऱ्या द्रवाला वास येणं
वारंवार योनीमार्गाचं इंन्फेक्शन
डॉ. राजश्री कटके म्हणाल्या, भारतातील स्त्रियांसोबत त्यांच्या कुटुंबियांनी जागृत व्हायला पाहिजे. निदान तात्काळ झालं तर क्वॉलिटी ऑफ लाईफ खूप छान होतं.
 
लशीने टाळता येतो गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचा धोका?
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्यास कारणीभूत 'Human papillomavirus' विरोधात लस उपलब्ध आहे. ही लस घेतल्याने गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं प्रमाण 90 टक्के कमी होऊ शकतं.
 
ह्युमन पॅपिलोम व्हायरसचे जवळपास 25 विविध स्ट्रेन आहेत. यातील प्रत्येक प्रकार गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतोच असं नाही.
भारतात सद्य स्थितीत दोन लशी उपलब्ध आहेत. एक लस कॅन्सरसाठी कारणीभूत Human papillomavirus च्या दोन प्रकारांविरोधात संरक्षण देते. तर दुसऱ्या लशीतून प्रामुख्याने कारणीभूत चार प्रकारांपासून संरक्षण मिळतं.
 
भारतात गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळापासून गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरविरोधात लस उपलब्ध आहे. ही लस ह्युमन पॅपिलोमा व्हायरसविरोधात प्रभावी असल्याचं संशोधनात आढळून आलंय.
 
डॉ. वीणी औरंगाबादवाला पुढे सांगतात, "ही लस 100 टक्के प्रभावी आहे असं म्हणता येणार नाही." याचं कारण कॅन्सरसाठी प्रामुख्याने कारणीभूत प्रकारांविरोधात ही लस आहे. पण इतरही प्रकार काही प्रमाणात कर्करोगासाठी कारणीभूत असू शकतात. ज्यांच्याविरोधात अजूनही लस उपलब्ध नाही.
 
ही लस कोणाला दिली जाऊ शकते?
कोणतीही लस व्हायरसचा संसर्ग किंवा संक्रमण होण्यासाठी दिली तर जास्त प्रभावी ठरू शकते.
 
डॉ. कटके सांगतात, "वयात आलेल्या (puberty) मुलींना HPV लस देण्यात आली पाहिजे." मुलगी किंवा महिला लैंगिक दृष्ट्या सक्रिय होण्याआधी लस दिली पाहिजे.
 
डॉ. औरंगाबादवाला पुढे माहिती देतात
 
9 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना ही लस देणं सर्वात चांगलं. याचं कारण मुली लैंगिक दृष्ट्या सक्रिय नसतात आणि व्हायरसला एक्सपोज झालेल्या नसतात
या मुलींना दोन डोसमध्ये लस दिली जाते. शून्य दिवस आणि सहा महिन्यानंतर
ज्यामुलींना ही लस देण्यात आली नसेल त्या वयाच्या 25 वर्षापर्यंत लस घेऊ शकतात. त्यांना लशीचे तीन डोस घ्यावे लागतील
25 वर्षानंतरही मुली लस घेऊ शकतात. पण याचा प्रभावीपणा हळूहळू कमी होतो
ही लस ह्युमन पॅपिलोला व्हायरसचा संसर्ग बरा करू शकत नाही किंवा कॅन्सरवर उपचार म्हणून वापरता येत नाही.
 
"मी माझ्या मुलीला दिली HPV लस"
गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला कारणीभूत ह्युमन पॅपिलोमा व्हायरस विरोधातील लस भारतात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत येत नाही. त्यामुळे डॉक्टर्स मुलांना ही लस अतिरिक्त लस म्हणून देतात.
 
नागपूरच्या जॅस्मिन चौधरी यांनी त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरविरोधात उपलब्ध HPV लस दिलीये.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "कॅन्सरविरोधात 100 टक्के प्रतिबंधक उपाय नाही. त्यामुळे डॉक्टरांनी मुलीसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळावं यासाठी लस घेण्याची सूचना केली." काही महिन्यांपूर्वीच जॅस्मिन यांनी त्यांच्या मुलीला ही लस दिलीये.
 
त्या पुढे सांगतात, "मुलगी असणाऱ्या प्रत्येक पालकाला माझं आवाहन आहे. मुलांना ही लस नक्की द्या. यामुळे त्यांना गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरविरोधात संरक्षण मिळेल."
 
"लशीबद्दल लोकांमध्ये जनजागृती नाही"
भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरविरोधात उपलब्ध लशीची जनजागृती नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरबद्दल नसलेली जनजागृती.
 
लस घेतली तर साईड-इफेक्ट होतील
मुलीला पुढे जाऊन त्रास तर होणार नाही
लस प्रभावी आहे का?
अशा अनेक प्रश्नांमुळे लोक ही लस आपल्या मुलांना देण्यासाठी तयार होत नाहीत. लस घेतल्यामुळे काही वाईट परिणाम झाला का? जॅस्मिन चौधरी म्हणतात, "माझ्या मुलीला लस घेतल्यामुळे कोणताही साईड-इफेक्ट झाला नाही."
 
गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं भारतातील प्रमाण
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार,
 
•साल 2012 च्या माहितीनुसार, दरवर्षी 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं निदान होतं
 
•यातील 67 हजारपेक्षा जास्त महिलांचा मृत्यू होतो
 
•भारतात महिलांमध्ये आढळून येणाऱ्या कॅन्सरमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर दुसऱ्या क्रमांकावर आहे
 
•15 ते 44 वर्ष वयोगटातील मुली आणि महिलांना हा कॅन्सर होतो
 
तर जागतिक पातळीवर साल 2018 मध्ये 5 लाख 70 हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचं निदान झालं होतं. यातील 3 लाखापेक्षा जास्त महिलांचा मृत्यू झाला.
 
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा ओळखावा?
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ओळखण्यासाठी पॅप स्मअर टेस्ट सर्वात महत्त्वाची आहे. त्याचसोबत HPV डीएनए, कोल्पोस्कोपी या तपासण्यादेखील करता येतात.
 
डॉ. कटके सांगतात, "पॅप स्मिअर टेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दरवर्षी एकदा ही टेस्ट केली पाहिजे. भारतात साधारणत: वयाच्या 28 वर्षापासून ही टेस्ट केली जाते."
 
गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची लक्षणं उशीरा दिसून येत असल्याने निदान लवकर झालं तर उपचार करता येतात. गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर पहिल्या टप्प्यात असेल तर ऑपरेशन करणं शक्य होतं. पण कॅन्सर अडव्हान्स असेल तर केमोथेरपी आणि रेडिएशन घ्यावं लागतं.
 
डॉ. वीणा पुढे म्हणाल्या, "पॅप स्मिअर टेस्ट बाह्यरुग्ण विभागात ओटीपोटाचा भाग तपासून करता येते. यात रुग्णाला पाठीवर झोपवून पाय फाकवून स्पेकलमच्या साह्याने गर्भाशयाची तपासणी केली जाते. गर्भाशयाच्या काही पेशी खरवडून काढल्या जातात आणि त्यांना मायक्रोस्कोपखाली तपासले जाते."
 
तज्ज्ञ म्हणतात, लस घेतल्यानंतरही वेळोवेळी तपासणी महत्त्वाची आहे. त्यामुळे महिलांनी लक्षणं आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावं.