1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 20 जानेवारी 2024 (10:10 IST)

मासिक पाळी नीट राहावी म्हणून कोणता आहार घ्यावा कोणता घेऊ नये

menstrual diet
मासिक पाळी हा कोणत्याही महिलेसाठी जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येक महिलेला निदान 30-35 वर्षं दर महिन्याला पाळी येते आणि त्यासोबत येणारे त्रासही सहन करावे लागतात.
पाळी फक्त गर्भधारणेशी संबंधित नसून मासिक पाळीचं चक्र नियमित राहिलं तर महिलांचं इतर आरोग्यही चांगलं राहातं.
 
शारीरिक तसंच मानसिक आरोग्य आणि पाळीचा संबंध असतो.
 
मासिक पाळी सुरळीत राहाण्याचा आणि तुम्ही काय आहार घेताय याचाही फार जवळचा संबंध असतो.
 
समतोल आहारामुळे पाळीचं चक्र नियमित राहातं. पाळीमध्ये अगोदरपासूनच गुंतागुंत असेल तर आहारात योग्य बदल केल्यानं फायदा होऊ शकतो. जंक फूडमुळे मासिक पाळी नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो आणि त्यामुळे पाळी उशिरा येणं किंवा वेळेपेक्षा जास्त लांबणं असे प्रकार घडू शकतात.
 
अन्नात हिमोग्लोबिनची कमतरता असेल पाळीच्या वेळी कमी रक्तस्राव होऊन त्रास होऊ शकतो.
 
मुंबईस्थित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ विक्रम शहा म्हणतात की, "पाळी संदर्भात आहाराचं खूपच महत्त्व आहे, पण अनेक महिलांना हे माहितीच नसतं की आपण जे खातोय त्याने आपल्या पाळीवर परिणाम होतोय. सतत शिळं अन्न खाणं किंवा चौरस आहार न घेणं यामुळे तुमची पाळी अनियमित होते, उशिरा येते."
 
मासिक पाळी सुरळीत होण्यासाठी काय खाऊ नये?
डॉ शहा सांगतात की, मासिक पाळी नियमित असावी यासाठी आहारातलं फॅट्सचं प्रमाण कमी करायला हवं. तुमच्या जेवणात खूप तेलकट पदार्थांचा समावेश असेल तर त्याने हार्मोनल बदल होऊन पाळीवर परिणाम होतो.
"गोड पदार्थांचं अतिसेवन करणंही टाळावं. अनेकदा असं लक्षात आलं आहे की, मासिक पाळी सुरू असताना जर तुम्ही गोड जेवण केलत तर तुम्हाला होणारा त्रास वाढतो. तुमच्या आहारातल्या कॅलरीचं प्रमाण खूप वाढलं तर शरीरात हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. कधी कधी शरीरात पुरुषी हार्मोन्सचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे स्कीन खराब होणं, मासिक पाळी अनियमित होणं असे साईड इफेक्ट होतात."
 
खूप मसालेदार, खूप गरम जेवण करू नये असा सल्लाही ते देतात. यामुळे मासिक पाळीच्या काळात अतिरक्तस्राव होऊ शकतो किंवा पाळीचा कालावधी लांबू शकतो.
 
पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करायचा असेल, पाळी नियमित यावी असं वाटत असेल तर आहाराची काही महत्त्वाची सूत्रं पाळली पाहिजेत, असं डॉ शहा म्हणतात.
 
दिवसात तीन आहार घेतलेच पाहिजेत. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण नियमितपणे, ठरलेल्या वेळेला करा. पण दोन जेवणांच्यामध्ये शक्यतो काहीही खाणं टाळा.
रात्रीचं जेवणं शक्यतो झोपण्याच्या तीन तास आधी घ्या. रात्री जेवल्याजेवल्या लगेच झोपू नका.
रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता यात कमीत कमी 12 तासांचं अंतर ठेवा.
या गोष्टी पाळल्या तर आपल्या पचनसंस्थेचं कार्य सुधारतं आणि आपण जे अन्न घेतोय त्याचं चरबीत रुपांतर होत नाही.
 
पाळी नियमित यावी म्हणून काय खावं?
डॉ शहा म्हणतात की, अनेक स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं त्यामुळे त्यांना पाळीच्या काळात रक्तस्राव कमी होतो किंवा पाळीच अनेकदा येत नाही.
 
अशा परिस्थितीत कोथिंबीर, पालक, बीट यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
 
त्याच बरोबर जेवताना डाळी, शेंगदाणे, सोयबीन, वाटाणे अशा प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असायला हवा, असंही डॉ शहा म्हणतात.
 
पनीर, मासे, चिकन असा प्रोटीनचा साठा असणारे पदार्थही आहारात अधून मधून असायला हवेत. रोजच्या जेवणात कोशिंबीरी असाव्यात.
 
मासिक पाळी येण्याच्या आधी आहार कसा असावा?
पाळी आधी, पाळी दरम्यान आणि पाळीनंतर आहारात थोडे बदल करावेत असं तज्ज्ञ सांगतात. यूकेच्या नॅशनल हेल्थ सिस्टिमने याबद्दल काही मार्गदर्शक तत्वंही जारी केली आहेत.
 
पाळीच्या आधी तुमच्या शरीरात काही बदल होत असतात, प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोममधून शरीर जात असतं. याकाळात शारिरीक तसंच मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. अनेक महिलांना मुड स्विंग्स, थकवा, चिडचिड अशी लक्षणं जाणवतात.
 
याकाळात भूकही जास्त लागते. विशेषतः गोड किंवा चटपटीत, मीठाचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते.
 
याच कारणं म्हणजे पाळी यायच्या काही दिवस आधी तुमच्या रेस्टिंग मेटॅबोलिझम रेटमध्ये तात्पुरती वाढ झालेली असते. त्यामुळे काही रिसर्च असं सुचवतात की या काळात दिवसाला 100 ते 300 कॅलरी जास्त घेतल्या तरी चालू शकतं.
 
"भुकेच्या बाबतीत तुमच्या शरीराचं ऐकणं ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळते आणि आपलं शरीर नीट काम करू शकतं," लंडनमध्ये आहारतज्ज्ञ असलेल्या रो हंट्रीस म्हणतात.
 
पण त्याही सांगतात की, या काळात फायबरयुक्त कार्बोहायड्रेड्स (जसं की बाजरी, गव्हाचे जाडसर पीठ, ज्वारी, नागली अशी धान्यं) किंवा प्रोटीनयुक्त आहार घ्यायला हवा.
 
"गोड पदार्थ किंवा जंक फुड खाण्याची या काळात इच्छा होते पण त्याचा शरीराच्या गरजेशी संबंध नसतो तर ते आपल्या मुडवर अवलंबून असतं. या काळात आपल्याला असं अन्न खाण्याची इच्छा होते ज्याने आपल्याला आनंद होईल. पण त्यामुळे उलट थकवा, वेदना, झोप न येणं अशी लक्षणं जाणवतात," हंट्रीस म्हणतात.
 
काही संशोधनांमधून असंही लक्षात आलंय की फळं खाल्याने महिलांना पाळीआधी आणि पाळीदरम्यान होणापा त्रास कमी होऊ शकतो.
 
चॉकलेटपैकी फक्त डार्क चॉकलेट (ज्यात 70 टक्के कोको असतो), ज्यात साखर कमी असते, खाता येऊ शकतं. इतर चॉकलेट्सने त्रास होण्याची शक्यता असते.
 
हंट्रीस म्हणतात या काळात कॉफीचं प्रमाणही कमी केलं पाहिजे.
मासिक पाळीच्या काळात पाणीही जास्त प्यायला हवं असं तज्ज्ञ सांगतात. हंट्रीस म्हणतात, "या काळात जास्त पाणी प्यायलत तर अतिरक्तस्राव होत नाही. तसंच पाळीच्या काळात ज्या कळा येतात त्याही कमी होऊ शकतात."
 
पण हंट्रीस स्पष्टपणे सांगतात की या काळात कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल घेता कामा नये.
 
Published By- Priya Dixit